ऑनलाइन प्रणालीमुळे ग्रामपंचायत विकासाला गती
- (प्रतिनिधी)
Monday, July 02, 2012 AT 01:15 AM (IST)
मांजरी, जि. पुणे - ऑनलाइन प्रणालीमुळे ग्रामपंचायतींच्या विकासाला चांगली गती मिळत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे येत्या काळात राहिलेल्या सर्वच ग्रामपंचायती अधिकाधिक माहिती असलेल्या प्रणालीसह ऑनलाइन करण्यात येतील. असे मत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शेवाळेवाडी ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या संकेत स्थळ व पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन, तसेच गावातील शालान्त परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले होते.
माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे, सरपंच मंगल कोद्रे, हवेली पंचायत समितीचे सभापती अशोक खांदवे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, तालुकाध्यक्ष राहुल चोरघडे, माजी सभापती अशोक मोरे, माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे, प्रतिमा शेवाळे, पुष्पलता शेवाळे, बाळासाहेब मोरे, भारती शेवाळे, वसंत शेवाळे आदी या वेळी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले,""राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींपैकी सुमारे पंचवीस हजार ग्रामपंचायती ऑनलाइन झालेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या पारदर्शी कारभाराला गती मिळाली आहे. नव्याने उपलब्ध करण्यात आलेल्या संगणक प्रणालीत शेती विषयक माहितीसह विविध प्रकारची माहिती देण्यात आली आहे. त्याचा चांगला फायदा ग्रामस्थांना होणार आहे. तहसीलदार कार्यालयातील सेतू प्रकल्पाप्रमाणे ग्रामपंचायत पातळीवरही तशी सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना गावातच सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध होऊ शकतील. जिल्हा परिषद शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी 200 गुणांची पुस्तिका काढण्यात येणार आहे. शौचालय, शाळा इमारत, क्रीडांगण, शिक्षक-पालक समन्वय आदी बाबींवर आधारित व दर्जानुसार अ, ब, क, ड या प्रमाणे श्रेणी देण्यात येणार आहे. एखादा शिक्षक दहा वर्षांपेक्षा अधिक काळ एका जागेवर राहणार नाही याची दक्षताही यापुढे घेतली जाणार आहे. शाळांचा दर्जा सुधारण्यास त्याचा चांगला उपयोग होईल. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना शहराप्रमाणे सर्व सुविधा कशा मिळतील याकडे लक्ष द्यावे. विकासाबरोबरच शिक्षणालाही ग्रामपंचायतींनी प्राधान्य दिले पाहिजे.'' असेही श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले. उपसरपंच राहुल शेवाळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
शेवाळेवाडी ग्रामपंचायतच्या www.shewalewadigram.com या संकेत स्थळावर गावच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावातील आरोग्य, पाणी, रस्ते व इतर सुविधा, पर्यावरणपूरक उपक्रम आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यासाठीचा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे.