Last Update:
 
राज्य

साखर कारखान्यांनाही मुदतवाढीचा "बोनस'?
- (प्रतिनिधी)
Wednesday, July 04, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: pune,   baramati

माळेगाव, जि. पुणे - बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वर, माळेगाव आदी सहकारी साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढील दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यानुसार या संस्थांच्या निवडणुकीचे वेध अनेकांना लागले असतानाच, शासनाने दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकेची निवडणूक किमान सहा महिन्याने पुढे ढकलली आहे. त्यामुळे वरील साखर कारखान्यांच्या निवडणुकाही पुढे जाऊ शकतात का? याबाबत सध्या संबंधित कारखान्याचे सभासद व पदाधिकारी संभ्रमात आहेत.

सोमेश्‍वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 12 ऑक्‍टोबर 2012 रोजी; तर त्या पाठोपाठ "माळेगाव'च्या संचालकांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांबाबत निर्णायक भूमिका घेतली होती. त्या अनुषंगाने मतदारयाद्या तयार करण्याबाबत त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कारखाना प्रशासनाने बारामतीच्या सहायक निबंधकांच्या (सहकारी संस्था) मार्गदर्शनाखाली मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू केले होते; परंतु शासनाने दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर 31 जुलैअखेर कामकाज स्थगित केले होते. त्यात शासनाने जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे बॅंकेच्या विद्यमान संचालकांना साधारणतः सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळाली. त्याचपद्धतीने माळेगाव व सोमेश्‍वर कारखान्यांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळू शकते का? हा प्रश्‍न सध्या सभासदांना व पदाधिकाऱ्यांना सतावत आहे.

याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयांच्या सूत्रांनी सांगितले की, मुळातच दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने "जुलै'अखेर सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या कामकाजाला स्थगिती दिलेली आहे; परंतु स्थगितीचा कालावधी संपताच ज्या संस्थांच्या संचालक मंडळाचा ठरवून दिलेला कार्यकाल संपलेला आहे, अशा संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांचे कामकाज नियमानुसार पुन्हा सुरू केले जाईल.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: