Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग

करून घ्या पाणी परीक्षण
-
Saturday, July 07, 2012 AT 02:15 AM (IST)
Tags: agro planing

पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले, की जमिनीची घडण बिघडते. पाण्याचा निचरा कमी होऊन पाण्याची जमिनीमध्ये पातळी वाढते. त्यामुळे हवा खेळती राहत नाही. त्या जमिनी चोपण होऊन जमिनीच्या सामूवर वाईट परिणाम होतो. बऱ्याच ठिकाणी पाणी खारट व मचूळ असल्याने त्याचा जमिनीवर आणि पिकावरही अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून पाणी परीक्षण करून घेणे अत्यावश्‍यक आहे.
भीमराव कांबळे

वनस्पतीच्या पेशीमध्ये 95 टक्केपेक्षा जास्त पाणी असते. वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी महत्त्वाची अन्नद्रव्ये प्रथम जमिनीतल्या पाण्यामध्ये विरघळून योग्य विद्युतभारीत स्वरूपात झाल्यावर वनस्पती शोषून घेतात. पाणी जर कमी असेल तर वनस्पती वाढीच्या सर्व प्रक्रिया मंद होतात. त्याबरोबरच उत्पादन घटते आणि प्रमाणापेक्षा जास्त झाले तर पिकांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो. पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले, की जमिनीची घडण बिघडते. पाण्याचा निचरा कमी होऊन पाण्याची जमिनीमध्ये पातळी वाढते. त्यामुळे हवा खेळती राहत नाही. त्या जमिनी चोपण होऊन जमिनीच्या सामूवर वाईट परिणाम होतो. जमिनीचे आरोग्य बिघडते आणि त्याचा पीक उत्पादनावर वाईट परिणाम होतो, जमीन नापिक होते. म्हणून प्रमाणातच पाणी देणे हिताचे ठरते.

पाण्याची उपलब्धता -
जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याचा प्रामुख्याने शेतीला वापर केला जातो. जमिनीतील असणारे नैसर्गिक, सेंद्रिय आणि खनिज पदार्थ पाण्यामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात आणि हे पाणी जमिनीस व पिकास योग्य आहे की नाही याची तपासणी करावी लागते. कारण नैसर्गिक पाण्यामध्ये क्षार विरघळलेल्या अवस्थेमध्ये असतात. त्यांचे प्रकार, प्रमाण आणि काही क्षारांचे ठराविक गुणोत्तर प्रमाणापेक्षा अधिक झाले तर ते पिकास व जमिनीस अपायकारक होऊ शकतात. शेतीसाठी वापरावयाचे पाणी प्रामुख्याने धरण, तलाव, नदी आणि विहिरीमधील असते. पावसाच्या पाण्याचा सामू सहा ते सात इतका असतो. पाण्याची क्षारता 0.01 ते 0.05 डेसी सायमन प्रति मीटर असून हे पाणी जमिनीवर पडून वाहू लागले, की जमिनीत क्षारांचे प्रमाण 25 ते 30 पटीने वाढू शकते. नदी व तलावामधून वाढणाऱ्या पाण्याचा सामू 7 ते 7.5 पर्यंत असून, क्षारांचे प्रमाण 0 ते 0.03 डेसी सायमन प्रतिमीटर आणि विहिरीतील पाण्याचा सामू साधारण सातच्या दरम्यान क्षारता 0.5 ते 12.0 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा अधिक असून, त्याची तीव्रता जमिनीच्या प्रकारावर व क्षारांच्या प्रमाणावर अवलंबून असते. विहिरीचे पाणी हे नदी, तलावातील पाण्यापेक्षा जास्त खारट असते.

पिकांच्या वाढीसाठी जमिनीतील लागणारे पाणी हे योग्य असणे गरजेचे आहे. परंतु कारणास्तव पाणी अयोग्य असते म्हणजेच त्यामध्ये विद्राव्य व खनिजे साठून विरघळतात आणि ते क्षारयुक्त बनते. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असते त्या जमिनीमध्ये विहिरी खोदून पिकास पाणी देणे गरजेचे असते. या विहिरीतील पाण्याची क्षमता वेगवेगळी असते. कारण यात खडकाची झीज होऊन बऱ्याच प्रमाणात क्षार विरघळलेले जातात. हे क्षारांचे प्रमाण खडकांच्या प्रकारावर अवलंबून असते. त्याबरोबरच जमीन व पिकास पाण्याचा मुबलक वापर, निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा जास्त वेग, रासायनिक खत व कोटक व रोगनाशके यांचा वापर यामुळे पाण्याची प्रत खराब होते आणि जमिनीतील पिकावर अनिष्ट परिणाम होतो.

शेतीसाठी खारट पाणी वापरताना घ्यावयाची काळजी -
1) ज्या जमिनीला खारट पाणी द्यायचे आहे. दुसरा पर्याय नाही अशा जमिनीच्या भौतिक गुणधर्मापैकी जमिनीची खोली, खनिजाचे प्रमाण, मातीच्या कणाचे प्रमाण, जडणघडण, जमिनीत तयार होणारा कडक थर आणि रासायनिक गुणधर्मामध्ये जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक जिप्सम, चुनखडी व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण इ. बाबी विचारात घेऊन शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.
2) खारट पाणी मध्यम किंवा भारी पोताच्या जमिनीला वापरावयाचे असल्यास तेथील जमिनीखालील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खोल असावी. पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी जमिनीच्या बाजूंनी चर खोदावेत.
3) खारट पाण्याचा सामू विम्ल आणि सोडिअमचे प्रमाण जास्त असेल तर त्या पाण्यामध्ये जिप्समची पावडर मिसळावी, तसेच जिप्समची बारीक पूड चार ते पाच टन प्रति हेक्‍टरी पाणी देण्याअगोदर जमिनीत पाण्याच्या प्रतीनुसार वापरावी. खारट पाण्याचा उपयोग पीक उत्पादनासाठी करावयाचा असल्यास त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी 25 ते 30 टन प्रति हेक्‍टरी, प्रति वर्षी चांगले कुजलेले सेंद्रिय खत जमिनीत द्यावे त्यामुळे जमिनीचा पोत चांगला टिकून राहतो. तसेच रासायनिक खतांचा समतोल वापर करावा. त्याबरोबरच हिरवळी खताची पिके म्हणजेच ताग, धैंचा इ. घेऊन फुलांवर असताना जमिनीत गाडून टाकली असता चांगला उपयोग होतो.
4) पाण्याचे बाष्पीभवन हे उन्हाळ्यात जास्त, पावसाळ्यात मध्यम आणि हिवाळ्यात कमी असून, ही क्रिया मंद करण्यासाठी झाडांच्या भोवती आणि पिकांच्या ओळींमधून पाचट किंवा पालापाचोळा इ. आच्छादन म्हणून टाकावे.
5) पिकांना सुरवातीच्या काळात चांगल्या प्रतीचे पाणी द्यावे आणि नंतरच्या काळात क्षारयुक्त पाणी कमी प्रमाणात द्यावे आणि पाणी हे एकाचवेळी मुबलक देण्यापेक्षा योग्य वेळी थोडे थोडे द्यावे. थोडक्‍यात आलटून पालटून पाणी दिल्यास क्षारांची तीव्रता कमी करता येईल.
6) पिकाची लागवड करताना वाफ्यात न करता सरीच्या बाजूला करावी म्हणजे खारट पाण्याचा आणि पिकांचा प्रत्यक्ष संबंध येणार नाही. पिकांची निवड लेखातील तक्‍त्यात दिल्याप्रमाणे करावी.
7) जर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी व काही प्रमाणात मुक्त कार्बोनेट्‌स असतील तर त्या पाण्यामध्ये 150-200 ग्रॅम फेरस अमोनिअम सल्फेट अधून मधून टाकावे.
8) क्षारयुक्त पाणी वापरून चांगले उत्पादन काढण्याकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पाणी परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा -
पाण्याचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ काचेची अथवा प्लॅस्टिकची बाटली घ्यावी. जे पाणी परीक्षण करावयाचे आहे, त्या पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा विसळून टाकावी. परीक्षणासाठी साधारण 750 ते 1000 मिलिलिटर पाणी घ्यावे. नदी, ओढे आणि कॅनॉल यांच्या वाहत्या पाण्यामधील मध्य भागातील नमुना घ्यावा. त्याबरोबरच ट्यूबवेल व विहिरीमधील नमुना घेताना पंप 15 ते 30 मिनिटे सुरू केल्यानंतर घ्यावा. बाटलीवर घट्ट बूच बसवून पाण्यातील कार्बोनेट्‌स, बायकार्बोनेट्‌स, सोडिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण रेसिड्यूल सोडिअम कार्बोनेट विनिमयात्मक सोडिअम टक्केवारी, सोडिअम अधिशोषित गुणोत्तर, बोरॉन, नायट्रेट, लिथीअम, सेलेनियम, फॉस्फेट्‌स, कोबाल्ट इत्यादींच्या प्रमाणावरून पाण्याची प्रत ठरवली जाते. चांगली उत्तम पाण्याची प्रत असणारे पाणी सर्व प्रकारच्या जमिनीस तसेच वेगवेगळ्या पिकास देता येते. त्याबरोबरच मध्यम प्रतीचे पाणी हलक्‍या जमिनीस चांगले असून, मध्यम व भारी जमिनीस द्यावयाचे असेल तर जमिनीतून चर खोदून पाण्याचा निचरा करून सेंद्रिय खताचा वापर करावा. जमीन विम्लयुक्त असेल तर जिप्समचा वापर करावा. तसेच कमी प्रतीचे पाणी सर्वसाधारण पिकासाठी व जमिनीसाठी उपयोगी नाही. पाण्याचे दुर्भिक्ष आणि दिवसेंदिवस पिण्यासाठी शेतीसाठी आणि औद्योगीकरणासाठी वाढत असलेली गरज विचारात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याची प्रत खराब असल्यास त्याचे प्रथम प्रयोगशाळेत पृथक्करण करावे.

संपर्क - श्री. कांबळे : 8275376948
(कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जिल्हा, सांगली येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: