म्हशी हटविल्या, पण अद्याप तक्रार नाही!
- (प्रतिनिधी)
Saturday, July 07, 2012 AT 02:15 AM (IST)
पुणे - पुणे कृषी महाविद्यालयाच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने म्हशींच्या मालकाला समज देऊन काढण्याची कारवाई केली, तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे. महाविद्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांची तपासणी करण्यासाठी रस्त्यावर अडथळे निर्माण करून सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
"पुणे कृषी महाविद्यालयाची सुरक्षा चव्हाट्यावर' या शीर्षकाखाली बुधवारी (ता. 4) दै. ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे होऊन सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. बैठकीत संध्याकाळपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरले. याबाबत शुक्रवारी (ता. 6) प्रभारी प्राचार्य डॉ. ए. आर. कराळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""पोलिस ठाण्यात तक्रार कशाप्रकारची द्यायची याबाबत पाहावे लागणार आहे. सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करून तक्रार देण्यात येणार आहे. यासाठी काही कालावधी जावा लागणार आहे.''
दरम्यान, 31 मार्च रोजी झालेल्या महाविद्यालयाच्या सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये विविध विभागांमध्ये होणाऱ्या चोऱ्या, गुन्हेगारी घटना याबाबत संबंधित विभाग प्रमुखांनी पोलिसांमध्ये तक्रारीचे पत्र द्यावे, यासाठी सुरक्षा पर्यवेक्षक आणि आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी असे ठरले होते. मात्र प्रक्षेत्रावरील विहिरीच्या थ्री फेज विद्युत मोटारीच्या केबलचोरी संदर्भात कृषिविद्या विभागाने 13 हजार 500 रुपयांच्या केबलची चोरी झाली असून, ही रक्कम सुरक्षा पुरवठादारांकडून वसूल करावी, अथवा स्थावर मालमत्ता (इस्टेट) विभागाने पोलिस तक्रार द्यावी, असे पत्र दिले आहे. या पत्रावरून जबाबदारी कोणी घ्यावयाची हा प्रश्न कायम राहिला आहे.
दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रशासनाचे शिष्टमंडळ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पुणे शहराचे विद्यमान पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेऊन यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. यावर सुरक्षेची जबाबदारी महाविद्यालयाचीच असल्याचे सांगत आयुक्त पोळ यांनी "जबाबदारीची समज' दिल्याचे समजते.
पुणे - "पुणे कृषी महाविद्यालयाची सुरक्षा चव्हाट्यावर' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या सचित्र वृत्तांताची दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने खासगी म्हशी बाहेर काढल्या. तर महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अभ्यागतांच्या चौकशीसाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे.