काम कठीण आहे; मात्र अशक्य नाही
-
Saturday, July 07, 2012 AT 01:45 AM (IST)
पंचायतीत बसलो होतो. निवडून आलो आहे. पंच आहे. निवडणुकीत विजयी झालो. माझ्या जातीचे एकही मत या वॉर्डात नाही. त्यामुळे मला यश मिळणार नाही असे सगळ्यांनाच वाटत होते. गावातील लोक मत आणि मुलगी जातीबाहेर देत नाहीत ही तर काळ्या दगडावरील रेघ आहे. पण कधी लोक अपवाद करतात. अपवाद हा काही नियम नाही. एक खरं आहे, कोणताही नियम अपवादामुळेही सिद्ध होतो. माझा विजय हा अपवाद आहे, की एक अपघात आहे, हे कोडं अनेकांना पडलं आहे. कारण जो निवडून येईल असं वाटत नाही पण निवडून यावा, असेही लोकांना वाटायचं ही भावना मी ओळखली होती. त्यामुळे मला आशा होती. लोकांसाठी काही करू शकतो. हे लोकांना पटलं होतं. अडचण एकच होती, मी त्याच्या जातीचा नाही. जातीचा नेता हा जातीचं भलं करतोच असं नाही. त्याच्या पुढे उदाहरण होतं. ज्याला आपण जातीचा म्हणून निवडून देतो. तो तर आपला स्वार्थच बघतो. लोकांसाठी त्याने काही केले नाही. केले नाही यापेक्षा लोकांसाठी त्याने काही करावं अशी त्याची भावनाही नाही. ही वाईट गोष्ट होती. "ही कोंडी कशी फोडायची. हा लोकांपुढे प्रश्न होता. माझ्या विरोधी जो होता त्याच्या जातीतील काहींनी मला मतदान केलं. माझं पारडं जड झालं बहुमताने मी निवडून आलो नाही. पण निसटता विजय मिळवला. मी जिंकलो. एका मताने का असेना जिंकणे हे महत्त्वाचे आहे. दुसरं एक झालं, आपल्या जातीचे लोक त्यांच्यासाठी काही जरी केलं नाही तरी डोळा झाकून मत देतील, हा अंध विश्वास ठरला. मी माझी निवडणूकही खेळीमेळीतच घेतली आहे. कारण जय-पराजय जो काही असेल तो स्वीकारला पाहिजे. तरी अपयशाने खच्चीकरण होते. मला यश मिळाले. मला संधी मिळाली. या संधीचे मी सोने करावे अशी जरी लोकांची अपेक्षा असली तरी मी केवळ संधीचे सोने करणार नाही. तर मी दागिनाही करणार आहे.
राजकारणात केवळ पैसा खर्च करून यश मिळत नाही. राजकारणात वेळ खर्च करावा लागतो. जो वेळ खर्च करू शकतो तो कार्य करू शकतो. त्यामुळे मी ठरविले आहे. लोकांसाठी ठराविक वेळ हा द्यायचा. माझी शेतीची कामे करून मला वेळ खर्च करायचा आहे, यासाठी मी ठरवत आहे. एक ठराविक वेळ ठरवून पंचायतीत हजर राहायचं. ज्याचे काम असेल त्याचे काम करायचे. मला एक जाणवले, ज्यांनी मला उघड विरोध केला ते अडचण आली तरीही माझ्याकडे येत नाहीत. त्यांना अपराध्यासारखं वाटतं. मी काही तरी बोलून त्याचा अपमान करेन असं त्यांना वाटतं. एक आहे जरी माणूस गरीब असला तरी त्याला आपला अपमान होऊ नये असेच वाटते. गरिबाला तर फार अभिमान असतो. मला हे जेव्हा जाणवलं तेव्हा मी आपणहून त्यांना मदत केली. मला काहींनी सांगितलं. जरी त्याचे काम केले, तरी ते पुढेही मत देणार नाहीत. मी ठरवलं आहे, ज्याचे काम मी करू शकतो, त्यांचे काम करायचं. ज्याचं काम करू शकत नाही. तेही त्यांना सांगून टाकायचं ! कारण नसताना लोकांना नादी लावायचं नाही. आपण स्पष्ट असलेले कधीही चांगले. थोडी नाराजी होऊ शकते. एक तर सगळ्यांनाच मी काही खूष करू शकत नाही, माझ्याकडे अशी काही जादूची कांडी नाही. जे खरे गरजू आहेत, ते काही माझ्यापर्यंतही अजून पोचले नाहीत. त्यासाठी लोकांपर्यंत आपणाला जावे लागेल. जेथे अंधारच आहे. तेथे प्रकाशाची गरज आहे. जेथे प्रकाश आहे तेथेच मी प्रकाश देत आहे. काम तर कठीण आहे, अशक्य आहे असं काही वाटत नाही.