Last Update:
 
ऍग्रो व्हिजन

वयस्कर मधमाश्‍या करतात तारुण्याकडे प्रवास
-
Monday, July 09, 2012 AT 01:15 AM (IST)
Tags: agro vision

नर्सिंग करणाऱ्या वयस्कर मधमाश्‍यांच्या प्रथिनांत होतात बदल, मेंदूच्या कार्यक्षमतेत होते वाढ

माणसांमध्ये वयस्कर व्यक्तीच्या मेंदूची कार्यक्षमता वाढत्या वयाबरोबर कमी होत जाते. हे सर्व सजीवांमध्येही कमी अधिक प्रमाणात सत्य आहे. मात्र, त्याच्या नेमकी उलटी स्थिती मधमाश्‍यांमध्ये आढळली आहे. म्हाताऱ्या किंवा अधिक वयाच्या मधमाश्‍या पुन्हा कार्यरत होऊन तरुण मधमाश्‍यांचे काम करू लागताच त्यांच्या मेंदूचे वाढलेले वय पुन्हा तारुण्याकडे प्रवास करू लागते, असे ऍरिझोना राज्य विद्यापीठ व नॉर्वे जीवनशास्त्र विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. वार्धक्‍यातील डिमेंशियासारख्या रोगावर उपचार शोधण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो. भविष्यामध्ये या प्रक्रियेमागील तत्त्व उलगडण्यात यश आल्यास वार्धक्‍याशी संबंधित अनेक रोगांचा इलाज करणे शक्‍य होणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष "एक्‍सपेरिमेंटल जेरॉन्टोलॉजी' या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

सोने आणि अमरत्व मिळविण्यासाठी किमयागारांनी केलेल्या प्रयत्नांनी शास्त्राच्या विकासात मोलाची भर घातली आहे. तारुण्य मिळविण्यासाठी माणूस सातत्याने संशोधन करत आहे. अगदी भारतीय पुराणशास्त्रामध्येही स्वतःच्या मुलाकडून त्याचे तारुण्य मागणाऱ्या ययाती या वृद्ध पित्याची कथा प्रसिद्ध आहे. माणसांमध्ये वाढत्या वयासोबत मेंदूच्या काही पेशी, प्रक्रिया नष्ट होत जातात. त्यात पुन्हा नव्या पेशी तयार होत नाहीत; मात्र अमेरिकेतील ऍरिझोना राज्य विद्यापीठ आणि नॉर्वेयन जीवनशास्त्र विद्यापीठातील संशोधकांनी ग्रो ऍमडॅम यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या संशोधनात वसाहतीमध्ये वयस्कर असलेल्या मधमाश्‍यांना काही कारणामुळे जर वसाहतीच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या, तर त्यांच्या मेंदूमध्ये मूलद्रव्यीय पातळीवर बदल घडून येत असल्याचे आढळले आहे. त्याबाबत माहिती देताना संशोधक ऍमडॅम म्हणाले, की वसाहतीमध्ये मधमाश्‍यांच्या अळी अवस्थेची काळजी घेण्यासाठी, त्यांना खाद्य पुरवण्यासाठी थांबलेल्या वयस्कर मधमाश्‍यांच्या मेंदूची कार्यक्षमता निरीक्षण काळामध्ये तशीच राहिल्याचे दिसून आले आहे. मात्र, जेव्हा त्या मधमाश्‍या अन्य कामासाठी बाहेर पडतात, त्या वेळी त्यांच्या मेंदूचे वय पुन्हा वाढायला लागते. त्यानंतर केवळ दोन आठवड्यांतच या मधमाश्‍यांचे पंख गळून गेले, शरीरावरील केस कमी झाले आणि मेंदूची कार्यक्षमता कमी झाल्याचे दिसून आले. त्यांच्या नवी गोष्ट शिकण्याच्या क्षमतेची चाचणी यामध्ये घेण्यात आली होती. म्हणजेच मधमाश्‍यांमध्ये मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये लवचिकता असल्याचे दिसून आले.

...असे झाले प्रयोग
मधमाश्‍यांच्या अळ्यांची आणि लहान मधमाश्‍यांची काळजी घेण्यासाठी असलेल्या तरुण मधमाश्‍या वसाहतीतून काढून घेण्यात आल्या. वसाहतीमध्ये राणी माशी आणि लहान मधमाश्‍या ठेवण्यात आल्या. जेव्हा अन्न आणण्यासाठी बाहेर पडलेल्या वयस्कर मधमाश्‍या परत आल्यानंतर त्यांच्यातील काही मधमाश्‍या अळ्या आणि लहान मधमाश्‍यांची काळजी घेण्यासाठी वसाहतीमध्ये थांबल्या. काही पुन्हा अन्न गोळा करण्यासाठी बाहेर पडल्या. त्यानंतर दहा दिवसांनी संशोधकांना लहान मधमाश्‍यांची काळजी घेणाऱ्या वयस्कर मधमाश्‍यांच्या मेंदूच्या नवीन गोष्टी शिकण्याच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे आढळले. मेंदूतील प्रथिनांमध्ये झालेले बदलही टिपण्यात यश आले आहे. अन्य मधमाश्‍यांशी तुलना केली असता, या मधमाश्‍यांच्या मेंदूमध्ये पीआरएक्‍स 6 व चापेरॉन या प्रथिनांत बदल झालेले दिसले.

मानवातील मेंदूशी संबंधित रोगामध्ये संशोधन ठरेल उपयुक्त
- पीआरएक्‍स 6 हे प्रथिन मानवामध्येही आढळून येते. हे प्रथिन अल्झायमर रोगासह अन्य डिमेंशिया रोगापासून वाचविण्याचे काम करते; तसेच चापेरॉन हे प्रथिन मेंदूतील पेशींच्या ऱ्हासापासून वाचविण्याचे काम करते. विशेषतः अतिताणामुळे मेंदूच्या पेशींवर पडणाऱ्या परिणामांपासून वाचविण्याचे काम करते.
- गेल्या तीस वर्षांपासून माणसामध्ये मेंदूशी संबंधित रोगांसाठी उपचार शोधण्यासाठी वैद्यकीय संशोधक प्रयत्न करत आहेत. या संशोधनाबाबत संशोधक ऍमडॅम म्हणाले, की सामाजिक परिस्थितीमध्ये बाह्य तणावांशी माणूस कोणत्या प्रकारे तोंड देतो, यावर मेंदूची कार्यपद्धती ठरत असते. मधमाश्‍या आणि माणूस यांच्या मेंदूतील काही प्रथिने सारखी असून, त्यांच्यामुळे विशिष्ट सामाजिक परिस्थितीत द्यावयाच्या प्रतिक्रिया ठरवल्या जातात. मधमाश्‍यांमध्ये आढळून आलेले बदल हे उंदीर व अन्य सस्तन प्राण्यांमध्ये अधिक अभ्यास करून तपासण्याची गरजही ऍमडॅम यांनी व्यक्त केली. त्यांच्यामध्ये हे शक्‍य झाल्यास माणसामध्ये या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल.

अन्न गोळा करण्याच्या कामाची सुरवात मधमाश्‍या तीन ते चार आठवड्यांच्या असल्यापासून होते. त्यानंतर त्यांचे वय वाढल्यानंतर त्यांचे पंख आणि केस गळून जातात. नवीन काही शिकण्याची त्यांची क्षमता कमी होत जाते. छायाचित्रात वयस्कर मधमाश्‍या पराग आणि मध गोळा करताना. (स्रोत - ख्रिस्तोफर बॅंग)

जर्नल संदर्भ - Nicholas Baker, Florian Wolschin, Gro V. Amdam. Age-related learning deficits can be reversible in honeybees Apis mellifera. Experimental Gerontology, 2012;


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: