Last Update:
 
ऍग्रो गाईड

जनावरातील जंतनिर्मूलन कसे करावे?
-
Monday, July 09, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro guide

महेश गुरव, यवतमाळ

जंतांचे कित्येक प्रकारे जनावरांच्या शरीरात वास्तव्य असतो. काही जंत पोट, आतड्यात आणि यकृतात वास्तव्य करतात. हे जंत अन्न घटक खातातच, त्याचबरोबरीने पोट व आतड्यातील त्वचेला इजा करतात. काही जंत आतड्याला चिकटून रक्ताचे शोषण करतात. यकृतातील जंत यकृताच्या पेशींचा नाश करून कालांतराने यकृत निकामी करतात. जंतांमुळे जनावरांच्या उत्पादनावर परिणाम जाणवतो. जंत पोट व आतड्याला इजा करतात. त्यामुळे अन्न पचन होत नाही. परिणाम स्वरूप तीव्र रक्तक्षय व अशक्तपणा जनावरांत दिसून येतो. याचबरोबरीने हगवण अशक्तपणा, सूज ही लक्षणे दिसतात. जनावराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते.

जंतबाधेचे परिणाम : जंतांच्या प्रकारानुसार व संख्येनुसार, जठर व आतड्याच्या अंत त्वचेला सूक्ष्म इजा होऊन, पाचक रस निर्माण होण्याचे प्रमाण कमी होणे व त्यामुळे भूक मंदावते.

-आतड्याच्या अंतर्त्वचेच्या जखमांमुळे जनावरास अतिसार होतो.
-शरीरातील प्रथिने, शर्करा, क्षार मोठ्या प्रमाणावर शरीराबाहेर गेल्याने जनावराला अशक्तपणा येतो.
-पचनक्रिया बिघडून शेणाला दुर्गंधी येते न पचलेले खाद्य शेणात दिसते व शेण नरम, पातळ, दुर्गंधीयुक्त व काळ्या रंगाचे दिसते.
-रक्त शोषण करणाऱ्या कृमीची बाधा झाली असल्यास शेण काळे व कधी कधी हगवणीबरोबर आवदेखील होतो.
-यकृतातील कृमींमुळे यकृताची कार्यक्षमता कमी होऊन प्रथिनांचा नाश होतो. त्यामुळे रक्ताची घनता कमी होऊन रक्तपेशीचा नाश होते आणि अशाप्रकारे जनावराला रक्तक्षय झाल्यामुळे जनावराला जबड्याखालील सूज येणे, पाठीचा कणा व बरगड्या वर दिसू लागतात. या सर्व प्रकारांमुळे गाई म्हशींच्या उत्पादनात व बैलांच्या कार्यक्षमतेत कमालीची घट होते.
-लहान वासरात व शेळ्या, मेंढ्यांच्या पिल्लांत रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, रक्तक्षय उद्‌भवतो, वासरांची वाढ होत नाही. रक्तशोषक प्रकारचे जंत असतील तर तीव्र रक्तक्षयामुळे वासरं मृत्युमुखी सुद्धा पडू शकतात.
-कालवडींची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. वयात येऊनसुद्धा कालवडी माजावर येत नाहीत.
-गाई व म्हशींतदेखील प्रजननक्षमता कमी होते व माजावर न येणे, गर्भधारणा न होणे व वारंवार उलटणे यांसारख्या तक्रारी दिसू लागतात.
-जंतबाधित जनावरांच्या शेणाद्वारे चाऱ्याच्या क्षेत्रात सतत जंतांची अंडी पसरविण्याचे कार्य होत राहते, त्यामुळे चांगल्या जनावरांना जंतांची बाधा होते. भूक न लागणे, दूध उत्पादनात घट, वाढ खुंटणे, शेणाला दुर्गंधी, शेणात जंत आढळणे, त्वचा खडबडीत होणे इ. प्रमुख लक्षणांवरून जंतबाधा झाल्याचा अनुमान काढता येऊ शकतो.

उपाययोजना :
-पशुपालकांनी आपल्या भागात कोणत्या प्रकारचे जंत आहेत याची माहिती करून घ्यावी. जंतांचे प्रकार जाणून घेण्यासाठी आपल्या सर्व जनावरांच्या शेणाची तपासणी करून घ्यावी. जंतांचे प्रकार समजल्यावर त्यांच्या नियंत्रणासाठी व प्रतिबंधात्मक उपायांसाठी उपयुक्त व प्रभावी औषधे निवडणे व व्यवस्थापन करणे सुलभ होते.
-जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढवावी. जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर जंतांच्या वाढीला आळा बसतो. त्यांचे नियंत्रण होते. याकरिता जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा.
-जनावरांचे ऊन, थंडी व पाऊस यांपासून संरक्षण करावे. जेणेकरून जनावरांना वातावरणाचा ताण उद्‌भवणार नाही.
-जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवणे व वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे.
-गावातील सर्वच पशुपालकांनी एकाचवेळी जंत निर्मूलन मोहीम राबवावी. त्यामुळे शेणाद्वारे चराई जमिनीवरील पडणाऱ्या जंतांच्या अंड्यांची संख्या कमी होईल, त्यामुळे पुन्हा पुन्हा नव्याने होणारी जंतबाधा थांबेल.
-पशुवैद्यकाच्या सल्ल्याने नियमित प्रभावी व परिणामकारक जंतनाशक औषधांचा वापर करावा.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: