Last Update:
 
फुलोरा

पूर्वजांचा वारसा माझ्याकडे आला आहे
-
Monday, July 09, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: fulora

माझ्या वाट्याला एक एकर शेती आली आहे. आम्ही सहा भाऊ आहोत. अलीकडेच वडिलांचं निधन झालं. बरेच दिवस ते आजारी होते. आजारपणात त्यांनी सगळ्या शेतीची वाटणी पंचांकरवी करून घेतली. त्यांचं मत असं होतं, माझ्यानंतर मुलांमध्ये शेतीवरून मतभेद होऊ नयेत. वडिलांची वडिलोपार्जित एक एकर शेती होती. त्यांनी पाच एकर शेती एकाच ठिकाणची विकत घेतली होती. ज्यांची ते शेती कसत होते, त्यांना शेती विकायची होती. त्याच्यात तीन वाटेकरी होते. दोन भाऊ आणि एक बहीण. दोघा भावांनी बहिणीला सांगितलं, जो आजवर शेती कसतो आहे, त्यालाच आपण शेती विकावी. त्या वेळी सहा मुलांमध्ये दोघेच कमावणारे होते. त्यांची कमाईही तशी काही फार नव्हती. कुटुंबाचा वाढता खर्च होता. अशा परिस्थितीत शेती विकत घेणे शक्‍यच नव्हतं. कसातरी प्रपंच चालू होता. एक मात्र होतं, मुलं काहीतरी प्रगती करतील अशी सगळ्यांना आशा होती. कारण सगळ्यांना कष्टाची सवय त्यांनी लावली होती. आपलं सगळं आयुष्य हे राबण्यातच गेलं, त्यामुळे मुलांना थोडंतरी शिक्षण मिळालं पाहिजे, असा त्यांनी विचार केला. एकाने त्यांना मार्ग दाखवला. फार शिक्षण घेणं आपल्या आवाक्‍याबाहेर आहे. दोन मुलं आता दहावी झाली आहेत, त्यांना काहीतरी व्यावसायिक शिक्षण द्या. वर्ष - सहा महिन्यांचं शिक्षण घेतलं, की कंपनीत कुशल कामगार म्हणून लागणं सोपं आहे. कारण, आजूबाजूला वेगवेगळ्या कंपन्या सुरू होत आहेत. त्यांची ही गरज आहे. वडिलांना हा मार्ग पटला. कारण आपली कुवत बघूनच उडी घ्यावी लागते. दोघांना त्यांनी आयटीआयचं शिक्षण दिलं. त्यांना लगेच नोकरी मिळाली. कमाई सुरू झाली. आता जरी कमी असली, तरी पुढे वाढत जाणार आहे. मिळकत सुरू झाल्याने त्यांची लग्नंही लगेच झाली. वय वाढू दिलं नाही. योग्य वयातच लग्न केलं पाहिजे. मुलांना वाटायचं, आपली घडी बसू द्या, आता लगेच लग्न करण्याची घाई कशाला? वडिलांनी सांगितलं, लग्न केलं की आपोआप घडी बसते. दोनाचे चार हात काम करणारे होतात. आपण कष्टकरी आहोत, त्यामुळे कामासाठी मनुष्यबळ मिळतं. मुली निवडताना त्यांनी एकच अट ठेवली होती, मुलींना शेतात काम करण्याची सवय असली पाहिजे. शेतात काम केल्याने आरोग्यही आपोआप चांगलं राहतं. त्यांचा विचार बरोबर होता. त्याचा फायदाही झाला. लग्न झाल्यावर मुलांना वेगळं ठेवलं होतं. शेती मात्र एका ठिकाणी त्यांच्याच नावावर होती. त्यात त्यांना वाटा दिला नाही. मुलांनी आपल्या पायावर उभं राहावं, त्यांनी आपली मिळकत वाढवावी, असं त्यांना वाटायचं. जी मी कमावलेली मिळकत आहे, ती शेवटपर्यंत माझ्याच नावावर असेल, असं त्यांनी सांगितलं होतं. आई वारल्यानंतर त्यांची जगण्याची इच्छाच उरली नव्हती, कारण दोघांनी फार कठीण परिस्थितीतून संसार केला होता.
पाच एकर शेती विकत घेण्याची ऐपत नसताना शेतीच्या मालकांनी वडिलांना शेती दिली. जसे पैसे मिळतील तसे द्या, असं सांगितलं. गावात एक तर शेती विकायला निघत नाही. जर कोणाची विकायला निघाली, तर विकत घेण्यास चढाओढ लागते. अशा परिस्थितीत वडिलांना एका ठिकाणची बागायती शेती मिळाली. आजवर त्यांनी शेतीत जी कमाई होत होती, त्याचा काडीकाडीचा हिशेब मालकांना दिला आहे, त्याचीच ही पावती आहे. आपण जर चांगली वर्तणूक ठेवली, तर त्याचं फळ हे मिळतंच. चांगलं पेरलं की चांगलंच उगवत. तसं त्यांनी जे पेरलं होतं, ते उगवलं होतं.

शेतीची वाटणी करताना मला एक एकर शेती दिली. सर्वांत लहान आहे, त्याला पाच एकर शेती दिली. मला कमी पगाराची नोकरी आहे. पुढे पगार वाढणार आहे. चार भाऊ आपल्या पायावर उभे आहेत. त्यांना काहीच दिलं नाही. त्यांनी तक्रारही केली नाही. मला त्यांची वडिलोपार्जित एक एकर शेती दिली. ही आपल्या पूर्वजांपासूनची शेती आहे, ती कधीच विकायची नाही, असं त्यांनी जगाचा निरोप घेताना मला सांगितलं आहे. हे मी माझ्या मुलाला मी जगाचा जेव्हा निरोप घेईन तेव्हा सांगेन. तो आपल्या मुलाला हे सांगेल. पूर्वजांचं काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: