सांगलीत बेदाणा वधारला
-
Tuesday, July 10, 2012 AT 02:00 AM (IST)
शशिकांत शिंदे
सांगली - आगामी रमझान, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे दरही वधारले असून प्रति किलोमागे 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत बेदाण्याला चांगली मागणी राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्या शिवाय हळद, गुळाची आवक पावसाळ्यातही स्थिर आहे.
यंदा द्राक्षाचे पीक चांगले आल्याने बेदाणा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. सांगली, सोलापूर व विजापूर जिल्ह्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत बेदाणा उत्पादनांत 30 टक्के वाढ झाली आहे. आवक वाढल्याने शीतगृह बेदाण्याने "फुल्ल' झाली आहेत. आवकेत वाढ झाली असली तरी मागणी असल्याने उठावही चांगला आहे. आखाती देशात सुमारे 250वर कंटेनर बेदाणा निर्यात झाला आहे. त्या शिवाय गणेशोत्सव, रमझान या सणासाठी आता बेदाण्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. बेदाण्याचा कमाल दर 140 रुपये झाला आहे.
मार्केट यार्डात पावसाळा सुरू झाला की हळदीच्या आवकेत घट होते. मात्र यंदा उत्पादन जास्त असल्याने पावसाळ्यातही चांगली आवक आहे. गेल्या सप्ताहात राजापुरी हळदीची 14 हजार, तर परपेठ हळदीची दोन हजार क्विंटल आवक झाली. हळदीला 2500 ते 6500 रुपये प्रति क्विंटल असा दर आहे. गुळाची 16 हजार क्विंटल आवक झाली.
गुळाला 2600 ते 3400 रुपये क्विंटल असा दर आहे. शाळू ज्वारीची आवक 478 क्विंटल झाली. शाळूला सरासरी 2300 रुपये क्विंटल असा दर मिळाला. हायब्रीड ज्वारीची 852 क्विंटल आवक झाली. हायब्रीडला 1100 रुपये क्विंटल असा दर राहिला.
भाज्यांच्या तरवांची मोठ्या प्रमाणात आवक
पावसाळा सुरू झाल्याने वांगी, कांदा, मिरची या भाज्यांचे तरू आठवडेबाजारात मोठ्या प्रमाणात आले होते. वांग्याला 10 रुपये, कांद्याला 15 रुपये प्रति पेंडी असा दर होता. ज्वाला मिरचीचे तरू 30 रुपये शेकडा होते.
""बेदाणा उत्पादनात वाढ झाली असली तरी मागणीही चांगली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याचा चांगला उठाव होईल. त्यामुळे वाढलेले दर स्थिर राहतील. ''
- राजेंद्र कुंभार, बेदाणा व्यापारी, सांगली