Last Update:
 
मुख्य पान

आंबेडकरी चळवळीचे फाटाफुटीमुळे नुकसान
(सकाळ वृत्तसेवा)
Wednesday, July 11, 2012 AT 01:45 AM (IST)

नामदेव ढसाळ यांची खंत; दलित पॅंथरचा वर्धापन दिन साजरा

मुंबई - फाटाफुटीच्या राजकारणामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले असून भविष्यात फाटाफुटीच्या राजकारणाला लगाम घालणे आवश्‍यक आहे. तसेच जोपर्यंत देशातील जातिव्यवस्था नष्ट होत नाही, तोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही. त्यामुळे दलित पॅंथरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जातीप्रथेचे निर्मूलन करण्याचा संकल्प आहे, असे प्रतिपादन दलित पॅंथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी केले.

दलित पॅंथरच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ढसाळ बोलत होते. संसदीय राजकारणापेक्षा रस्त्यावरील संघर्षाला अधिक महत्त्व देण्याचे सूतोवाच त्यांनी केले. राजा ढाले यांनी दलित पॅंथरला एकजातीय बनविण्याचा अट्टहास केला, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. 40 वर्षांच्या प्रवासानंतर पॅंथर पुन्हा उभी राहणार असून जातीअंताचा लढा देणार आहे, असे त्यांनी सांगितले. अस्पृश्‍यांचा आणि दलितांचा लढा पॅंथरने चाळीस वर्षे दिला, भविष्यातही तो अधिक जोमाने देण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी केला.

या वेळी रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, बाबासाहेब गोपले, लक्ष्मण माने, दिलीप जगताप, चंद्रकांत कांबळे, यशवंत नडगम, जयदेव गायकवाड, रमेश कांबळे, सुरेश केदारे, रमाकांत यादव, मदनानी आदी उपस्थित होते. दलित तरुणांमध्ये क्रांतीच्या ठिणग्या पेरणाऱ्या दलित पॅंथरमध्ये फूट पडणे, ही दुर्दैवी घटना होती. ढसाळ आणि राजा ढाले यांनी एकत्र राहणे, ही काळाची गरज होती; मात्र पॅंथरमध्ये फूट पडल्याने आंबेडकरी समाजाची मोठी हानी झाली, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली. फूट पडली नसती, तर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले असते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. आठवले म्हणाले की, आंबेडकरी चळवळ राजकीयदृष्ट्या सशक्त झाली नाही. त्यामुळे यापुढे आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्यासाठी संसदीय राजकारणाला दूर लोटून चालणार नाही. ढसाळांच्या नेतृत्वाखाली पॅंथरची चळवळ तब्बल 40 वर्षे सुरू राहिली, हे कौतुकास्पद असल्याचेही आठवले म्हणाले. बाबासाहेब गोपले यांनी, दलित समाजातील सर्व जातींनी एकत्र येऊन समाजाचे हित साधावे, असे आवाहन केले.

पॅंथरने आपल्याला राजकीय आणि सामाजिक शिक्षण दिले असे नमूद करून, पॅंथर कधीही थकणार नाही, थांबणार नाही, पराभूत होणार नाही, असा विश्‍वास "उपरा'कार लक्ष्मण माने यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वामन केंद्रे दिग्दर्शित "प्रिया बावरी' या नाटकाचा प्रयोग झाला; तर कार्यक्रमाचा शेवट सुरेखा पुणेकर यांच्या लावणीने झाला.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: