Last Update:
 
मुख्य पान

माफूसच्या कुलगुरुपदासाठी 32 अर्ज
-
Wednesday, July 11, 2012 AT 01:15 AM (IST)
Tags: nagpur,   mafus,  

देवेन्द्र वानखेडे
नागपूर - महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठ कुलगुरुपदासाठी संपूर्ण देशातून 32 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 10 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या विद्यापीठाची दयनीय अवस्था पाहता या वेळी विद्यापीठाचा अनुभव असलेल्या व्यक्‍तीलाच ही संधी मिळावी, अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.

माफसूचे विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. ए. टी. शेरीकर यांनी सुरवातीला सहा वर्षे संस्थेला मूर्त स्वरूप देत नावलौकिक वाढविला. शासनानेही विद्यापीठाला भरघोस मदत केली. 1450 पदांना मान्यता दिली. पैकी 450 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, डॉ. ए. टी. शेरीकर निवृत्त झाले. त्यानंतर डॉ. निनावे त्यांच्या जागी आले. त्यांचा कुलगुरुपदाचा प्रवास वादग्रस्त ठरला. त्यांच्या कारकिर्दीची अखेर कुलगुरुपदावरून निलंबनाने झाली.

या वेळी निघालेल्या जाहिरातीत अनेक अनुभव मागविण्यात आले आहेत. संशोधन कार्यात अग्रेसर असणाऱ्यांना या वेळी संधी देण्याचा मानस निवड समितीने व्यक्त केला आहे. न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समिती राज्यपालांच्या मार्गदर्शनात हे कार्य पार पाडणार आहे. विद्यापीठात कर्मचारी व अधिकारी यांच्यात असलेली सुंदोपसुंदी विद्यापीठाला शैक्षणिक कामापेक्षा इतर कामांत व्यस्त राहण्यास भाग पाडते. वरिष्ठ प्राध्यापक शैक्षणिक कार्य सोडून अधिकारपदाच्या जागेवर वर्णी लावण्यात धन्यता मानतात. याचा परिणाम संपूर्ण शैक्षणिक कामावर झाला आहे.

विद्यापीठाचे खरे कार्य काय, याचाच विसर सध्या पडला असल्याचे चित्र आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत विद्यापीठीय संशोधनाचा लाभ मत्स्य व्यावसायिक व पशुपालकांना होणे गरजेचे आहे. नेमके हेच कार्य गेल्या चार वर्षांत झाले नसल्याने कोकणातील मत्स्य पालकांनी मत्स्य विद्यापीठ वेगळे देण्याची मागणी केली. ती पूर्णत्वास जात असल्याचे कळते. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येणार आहेत. शासनाने एक चांगली संधी दिल्यानंतरही त्याचे सोने करण्यात अपयश आल्याची खंत कायम राहणार आहे. त्यासाठी एक शेवटची संधी आता आहे. निवड समितीनेही या सर्व कारणांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: