Last Update:
 
मुख्य पान

परप्रांतीय व्यापाऱ्यांचा द्राक्ष उत्पादकांना गंडा
-
Wednesday, July 11, 2012 AT 02:30 AM (IST)
Tags: nashik,   grapes,   fruite

ज्ञानेश उगले
नाशिक : नुकत्याच सरलेल्या द्राक्ष हंगामात नाशिक भागातून द्राक्षमाल खरेदी करणाऱ्या बिहार, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल येथील व्यापाऱ्यांनी द्राक्ष उत्पादकांना किमान पाच कोटी रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे. सलग काही वर्षे शेतकऱ्यांशी व्यवहार करीत हळूहळू विश्‍वास संपादन करायचा व उधारीवर घेतलेल्या मालाची अधिक रक्कम साठली, की गुंगारा भरायचा, हा सिलसिला दरवर्षी होत असताना गतवर्षी तर त्यात भरच पडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी या द्राक्ष उत्पादक तालुक्‍यांतील दीडशेहून अधिक शेतकऱ्यांचे किमान पाच कोटी रुपये परप्रांतीय व्यापाऱ्यांकडे अडकले आहेत. व्यापाऱ्यांचे मोबाइल्स "स्विच्ड ऑफ' झाले असून, भरवशावर झालेल्या व्यवहाराचा कोणताही पुरावा तसेच व्यापाऱ्याचे कोणतेही तारण नसल्याने प्रतीक्षेशिवाय शेतकऱ्यांसमोर कुठलाही पर्याय उरलेला नाही. देशांतर्गत द्राक्ष व्यवहारात कोट्यवधीची उलाढाल होत असून, येथील 90 टक्‍क्‍यांहून अधिक माल बांग्लादेशासह, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगाल येथील बाजारपेठेत पाठविला जातो. साहजिकच या द्राक्ष व्यापारावर या परराज्यांतील व्यापाऱ्यांचा वर्षानुवर्षे पगडा राहिलेला आहे. उधारीवर माल घेऊन वर्षाच्या अंतराने शेतकऱ्यांचे पैसे नियमित देणारे व्यापारीही यात आहेत. मात्र, हीच या व्यवहारातील जोखमीची बाजू बनली आहे. चार दिवसांच्या बोलीवर उधार माल नेऊन गुंगारा देण्याचे प्रकार या व्यापाऱ्यांमधून वाढले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मनस्तापाशिवाय काहीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

निफाड तालुक्‍यातील मिग सोकोरे येथील शशिकांत बोरस्ते यांच्या द्राक्षबागेचा बिहार येथील आझाद या व्यापाऱ्याशी व्यवहार ठरला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या - दुसऱ्या आठवड्यात त्याने जवळपास दोन प्लॉटचा 200 ते 300 क्विंटल माल खरेदी केला व या मालाचे रोख पैसे दिले. मात्र, शेवटच्या टप्प्यातील 275 क्विंटल खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे चार दिवसांत देतो म्हणून सांगितले. मात्र त्यानंतर तो जो गायब झाला, तो आजतागायत भेटलाच नसल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. या व्यापाऱ्याकडे आठ लाख रुपये अडकून पडले आहेत. तो टोमॅटोच्या हंगामात परत येतो असे आश्‍वासन देऊन गेला आहे. द्राक्षपिकाच्याच उत्पन्नावर कर्जादी देणे देण्याचे नियोजन असलेल्या बोरस्तेंचे मात्र अर्थकारणच कोसळून गेले आहे.

नाशिक तालुक्‍यातील सय्यदपिंप्री, चिंचोले येथील बाळू तुकाराम ढिकले, संतोष चांडक, सुनील ढिकले, सोमनाथ ढिकले, दत्ता ढिकले या व इतरही शेतकऱ्यांचे दीड ते तीन लाख रुपये असे एकूण 35 लाख रुपये घेऊन हंगामाच्या अखेरीस बिहारमधील एका व्यापाऱ्याने पोबारा केला आहे.

दिंडोरी तालुक्‍याच्या वणी भागातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे किमान दोन कोटी रुपये मध्यप्रदेशातील शिवदास, विकास, शिवशिंग या नावाच्या व्यापाऱ्यांकडे अडकून पडले आहेत. मध्यप्रदेशातील हे व्यापारी नाशिकहून कोलकता येथे माल पाठवीत होते. बहुतांश व्यापारी हंगामाच्या अखेरीस पैसे घेऊन पळ काढतात. मात्र, वणी या भागातून माल घेतलेल्या या व्यापाऱ्यांनी हंगामाच्या सुरवातीला फेब्रुवारी महिन्यातच शेतकऱ्यांना धक्का दिला. मागील चार वर्षांत या व्यापाऱ्यांनी स्थानिक भागात विकत घेतलेले प्लॉट व घर त्यांनी तातडीने विकून टाकल्याचे नंतर आढळून आल्याचे वणी येथील द्राक्ष उत्पादक अण्णा चव्हाणके यांनी सांगितले.

संरक्षणाची यंत्रणा नाही
दरवर्षी कोट्यवधींचे द्राक्ष व्यवहार होत असताना फसवणुकीचे प्रकार वाढतानाच दिसत आहे. रोख पैसे मागण्याचा आग्रह धरलेला असतानाही व्यापारी मात्र नवनवीन क्‍लृप्त्या वापरून शेतकऱ्यांची रक्कम अडकवून ठेवतात. नाशवंत माल असल्याने उत्पादक तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करतो. यासाठी पणन मंडळ, बाजार समित्या, कृषी विभाग व प्रशासन यांच्याकडून संरक्षण यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावा करणाऱ्या या संस्था मात्र दरवर्षी याकडे दुर्लक्षच करीत असल्याने फसवणुकीच्या प्रकारांत वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


सांगली जिल्ह्यातील तीन कोटी रुपये अडकले

महादेव अहीर
वाळवा, जि. सांगली - द्राक्ष व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना अडकवल्यामुळे द्राक्ष उत्पादक अस्वस्थ आहेत. परिसरात उसानंतर द्राक्ष हे मुख्य पीक आहे; मात्र व्यापारी व दलालांकडून पैसे देण्याबाबत टाळाटाळीचे वाढते प्रकार द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी ठरत आहे. परिसरात दरवर्षी निव्वळ द्राक्षाची उलाढाल सव्वाशे कोटींच्या घरात आहे. परिसरात सुमारे तीन हजार एकर द्राक्ष शेती आहे. दहा गुंठ्यांपासून शंभर एकरांपर्यंत द्राक्षबागा असणारे शेतकरी आहेत. द्राक्ष उत्पादनाला पाच दशकांची परंपरा आहे. सरासरी प्रति एकरी आठपासून बारा टनांपर्यंत द्राक्ष उत्पादन होते. जिल्ह्याच्या पूर्व भागाच्या तुलनेत या ठिकाणी प्रति एकरी साठ ते ऐंशी हजार रुपये इतका उत्पादन खर्च येतो. दरवर्षी द्राक्ष शेतीत वाढच होत आहे.

द्राक्षबागेला सुरवातीचा खर्च प्रति एकरी सरासरी पाच ते सहा लाख रुपये येतो. पूर्वमशागत, चर खोदाई, मांडव यासाठी हा खर्च येतो. त्यासाठी बहुतांश शेतकरी विविध बॅंकांकडून कर्ज घेतात. दरवर्षी द्राक्षाची विक्री झाल्यानंतर प्रामुख्याने पीक कर्ज भागवण्याचा शेतकरी प्रयत्न करतात. मात्र, द्राक्ष खरेदी करणाऱ्या व्यापारी व स्थानिक दलालांनी पैसे देण्यास टाळाटाळ होण्याचे प्रकार वाढल्यामुळे एकूणच शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. दक्षिण भारत व राज्यातील विविध ठिकाणचे व्यापारी परिसरात द्राक्ष खरेदीसाठी दरवर्षी येतात. बरेच व्यापारी वर्षानुवर्षे अगदी प्रामाणिकपणे आर्थिक व्यवहार करीत आहेत. सुरवातीच्या काळात व्यापारी व शेतकरी असा सौदा व्हायचा. अलीकडच्या काळात मात्र व्यापाऱ्यांनी स्थानिक एजंट हाताशी धरून द्राक्षाचे व्यवहार सुरू केले आहेत. शेतकरीही एजंटांकडे बघून द्राक्ष विक्री करतात. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे लांबल्याचे प्रकार आतापर्यंत तुरळक होते. यंदाच्या हंगामात मात्र तब्बल तीन कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी अस्वस्थ आहेत. पैसे अडकवण्याचे प्रकार वाढल्यास द्राक्ष उत्पादनावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. या परिसरातील बहुतांश द्राक्षे देशी व जागतिक बाजारपेठेत जातात. यंदाच्या हंगामात मात्र सुमारे शंभर शेतकरी कोट्यवधी रुपयांना अडकले आहेत. प्रत्येकजण आपापले पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अनेकांनी दक्षिण भारतात हेलपाटेही घातले आहेत. मात्र, अद्यापही या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.

एका उत्पादकाचे 22 लाख अडकले?
एका उत्पादकाचे तब्बल 22 लाख रुपये अडकल्याची चर्चा आहे, त्यामुळे या शेतकऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे. कृष्णा, कोयना खरेदी - विक्री संघाच्या पुढाकाराने आता हे पैसे मिळवण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. या संघामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: