Last Update:
 
मुख्य पान

येत्या रविवारपर्यंत पावसाची दडी
- (प्रतिनिधी)
Thursday, July 12, 2012 AT 02:15 AM (IST)
Tags: pune,   monsoon
- मॉन्सून पोचला देशभर
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी सकाळपर्यंत गुजरात व राजस्थानच्या उर्वरित भागासह संपूर्ण देश व्यापला. सर्वसाधारणपणे 15 जुलैपर्यंत मॉन्सून देशभर पोचत असतो. यंदा त्याने चार दिवस आधीच ही मजल मारली आहे. पाच जूनला मॉन्सून केरळात दाखल झाला होता. आता दक्षिण व मध्य भारताप्रमाणेच उत्तरेकडील राज्यांनाही मॉन्सूनचे आगमन झाल्याबरोबर पावसाने दडी मारण्याचा अनुभव येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे - नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्यांचा जोर व त्यासाठीची अनुकूल स्थिती कमी झाली आहे. यामुळे किमान येत्या रविवारपर्यंत (ता. 15) राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता मावळली आहे. तोपर्यंत कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा व राज्याच्या उर्वरित भागात विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भात मॉन्सून सक्रिय होता. कोकणातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, त्याचा जोर ओसरल्याचे चित्र होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. बहुतेक ठिकाणी ढगाळ हवामानात घट झाली असून, स्वच्छ सूर्यप्रकाश पडू लागला आहे.

हवामान खात्याच्या उपमहासंचालिका (हवामान अंदाज) डॉ. मेधा खोले म्हणाल्या, ""मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने व त्यास बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील अनुकूलतेची साथ मिळाल्याने मध्य व उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरू होता; मात्र आता कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्याने पाऊस घटणार आहे.''

मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्याने मध्य भारतात सक्रिय असलेला मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे, शिवाय बंगालच्या उपसागरातही हवेचा दाब जास्त आहे. अरबी समुद्रात उत्तर कोकणापासून केरळपर्यंत किनारी कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मात्र, त्याचा जोर कमी असल्याने राज्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता नाही, असे डॉ. खोले यांनी सांगितले.

बुधवारी (ता. 11) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) - अकोला 10.2, अमरावती 23.8, बुलडाणा 41, नागपूर 2.4, वर्धा 3.6, यवतमाळ 33.2, औरंगाबाद 4.1, जळगाव 8.2, कोल्हापूर 1.6, मालेगाव 4, महाबळेश्‍वर 13.5, मुंबई 12.4, अलिबाग 6.4, भिरा 6, देवगड 24, रत्नागिरी 14.6, डहाणू 21.1, वेंगुर्ला 7.4, बेलापूर 19.6


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: