Last Update:
 
मुख्य पान

भारिप युवक आघाडी'ने भरला रिक्‍त पदाचा अनुशेष!
- (प्रतिनिधी)
Thursday, July 12, 2012 AT 02:30 AM (IST)
Tags: akola,  

अकोला - ग्रामीण भागातील जनतेसाठी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतील वर्ग एक व दोनच्या तब्बल 28 रिक्‍त पदांचा प्रभारी पक्ष पदाधिकाऱ्यांना सोपवीत भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीने मंगळवारी (ता.10) अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला.

अकोला जिल्हा परिषदेत भारिप बहुजन महासंघाची सत्ता आहे. जिल्हा परिषदेतील अतिराजकारणामुळे अनेक महत्त्वाच्या पदांचा प्रभार घेण्यास अधिकारी इच्छुक नाहीत. त्यासोबतच कुरघोडीच्या राजकारणामुळे कामाविषयी अनास्था निर्माण झाल्याने अनेक अधिकारी बदलीच्या मनःस्थितीत आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत वर्ग एक व दोनची तब्बल 28 पदे रिक्‍त असल्याने त्याचा दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. ग्रामीण जनतेशी निगडित अनेक योजनाही यामुळे रखडल्याने ग्रामीण जनतेमध्ये जिल्हा परिषदेच्या एकंदरीत कार्यप्रणालीविषयी रोष निर्माण झाला आहे. या बाबीची दखल घेत भारिप बहुजन महासंघाच्या युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता. 10) अभिनव आंदोलन करण्यात आले.

"महाराष्ट्र शासना'च्या धर्तीवर "लोकशासन' असा उपक्रम त्यांनी रिक्‍त पदे भरण्यासंदर्भाने राबविला. पक्ष पदाधिकारी असलेले डॉ. डी. वाय. खान यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बुद्धरत्न इंगोले, पंचायत समिती अकोला व अकोटचे गटविकास अधिकारी अनुक्रमे सुरेंद्र तेलगोटे व धीरज शिरसाट, निरंतर शिक्षणाधिकारी राजेश तायडे, समाज कल्याण अधिकारी ----अश्‍वजित---- शिरसाट, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश ठाकरे, लेखा व वित्त अधिकारी म्हणून ज्ञानेश्‍वर इंदूरकर याप्रमाणे प्रतिकात्मक पदभार सोपवीत निषेध नोंदविण्यात आला. प्रतिकात्मक पद्धतीने मोठ्या पदावर नियुक्‍त करण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांना चारचाकी वाहने देण्यात आली. त्यावर महाराष्ट्र शासनाऐवजी "लोकशासन' असे नोंदविण्यात आले होते. नवनियुक्‍त अधिकारी वाहनाने जिल्हा परिषदेत प्रवेशकर्ते होताच त्यांचे फटाक्‍यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर या प्रतिकात्मक अधिकाऱ्यांचा स्वागत समारंभ जिल्हा परिषद परिसरात झाला. या अधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या कामकाजाची माहिती प्रत्येक विभागात जात घेतली. आठ दिवसांत सदरची रिक्‍त पदे न भरल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या कक्षाचा ताबा हे पदाधिकारी घेत कामकाज पार पाडतील, असा इशारा या वेळी राजेंद्र पातोडे यांनी दिला.

आंदोलनात भागमभाग -
नवनियुक्‍त प्रभारी अधिकाऱ्यांचा स्वागत समारोह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली असली तरी पावसाने या कार्यक्रमात रोडा आणला. जिल्हा परिषद परिसरातील या आंदोलनामुळे दोन वेळा आयोजकांना खुर्च्या टाकाव्या व आत न्याव्या लागल्या चांगलीच भागमभाग झाली होती.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: