Last Update:
 
मुख्य पान

"महिको'वर बंदी घालणार - कृषिमंत्री विखे
-
Thursday, July 12, 2012 AT 02:15 AM (IST)
Tags: mahiko,   mumbai,   farmers
विजय गायकवाड
मुंबई : शेतकऱ्यांना वेठीला धरणारी बीटी बियाणे उत्पादक महिको कंपनीला इशारा देऊनही वर्तणूक सुधारत नाही. महिको कंपनी स्वतःला कायद्यापेक्षा मोठी समजत आहे, त्यामुळे कंपनीवर राज्यभर बंदी घालण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, कठोर कारवाईसाठी मागेपुढे पाहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (ता. 11) विधानसभेत दिली. महिकोच्या वाणांपेक्षा इतर चांगले वाण असूनही कृषी विभागच प्रचार - प्रसिद्धीत कमी पडल्याची कबुली कृषिमंत्र्यांनी काल (ता. 11) विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य ऍड. उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, मंगेश सांगळे, वसंत गिते, प्रकाश भोईर, कृषिभूषण साहेबराव पाटील आणि हर्षवर्धन जाधव यांनी बीड जिल्ह्यातील बीटी बियाणे वितरणात गैरव्यवहारासंबंधी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. उत्तरामध्ये कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी बीड जिल्ह्यातील तीन लाख 30 हजार हेक्‍टर क्षेत्रासाठी 13 लाख 20 हजार बीटी पाकिटांची मागणी नोंदविल्याचे सांगितले. जून 2012 अखेर बीडमध्ये 12 लाख 41 हजार पाकिटांचा पुरवठा झाला. यापैकी महिको कंपनीने एमआरसी 7351 वाणाचा 65 हजारांचा आराखडा निश्‍चित करूनही 45 हजार 800 पाकिटे दहा वितरकांमार्फत परस्पर विकल्याचे सांगितले.

बीटी बियाण्याचा गैरव्यवहार करण्यासाठी बियाणे परस्पर विकल्याने महिको कंपनीविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे, शिवाय जादा दराने बियाणे विक्री, शेतकरी गावात राहत नसणे, काल्पनिक नावे व जिल्ह्याबाहेर विक्री अशा त्रुटींमुळे बीडमधील 36 कृषी विक्रेत्यांविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, दोषींविरोधात बियाणे अधिनियम 1966 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 नुसार कारवाई करण्यात येईल, असे राज्यमंत्री देवकर यांनी स्पष्ट केले.

सदस्य ऍड. ढिकले यांनी बीटी बियाणे घोटाळा करणाऱ्या कंपनीच्या दहा विक्रेत्यांवर काय कारवाई केली, असा प्रश्‍न केला; तर नितीन भोसले यांनी महिको कंपनी आणि वितरकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मंगेश सांगळे यांनी बीटी बियाण्यांचा मोठा काळाबाजार झाल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, सर्व बीटी बियाणे वितरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणत्याही चौकशीला विरोध नाही असे सांगितले.

कृषिमंत्री विखे पाटील म्हणाले, ""महिको कंपनीविरोधात सातत्याने तक्रारी येत आहेत. गतवर्षी कृषी विभागाने 16 ठिकाणी कारवाई केली. यंदा देखील महिकोविरोधात "एफआयआर' दाखल केला आहे. महिकोच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करून न्यायालयाने जामीन देखील नाकारला आहे.''

बीटी बियाण्याची "ऍडव्हॉन्स बुकिंग' पद्धत म्हणजे कीड होती. यंदापासून आगावू नोंदणी बंद करून कीड संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
सूचना देऊनही महिको कंपनीची वर्तणूक सुधारत नाही. ते कायद्यापेक्षा मोठे असल्यासारखे वावरत आहेत. महिकोचे वाण गेले तर फार फरक पडणार नाही. बाजारात चांगले वाण असूनही कृषी विभागच प्रचारात कमी पडला, अशी कबुली कृषिमंत्री विखे पाटील यांनी या वेळी दिली. शेतकरीहित जोपासण्यासाठी दोषींवर निश्‍चित कारवाई करणार, असे विखे पाटलांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात शेवटी सांगितले.

""महिको कंपनी 80 लाख बीटी पाकिटे पुरवणे अपेक्षित असताना फक्त दहा लाख पाकिटांचीच विक्री करतेय, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झालीय. शिवाय, महिकोच डीलरना जास्त दराने बियाणे विक्रीसाठी प्रवृत्त करत आहे. महिकोविरोधात विक्रीबंदी कारवाई करून दोषी वितरकांचे परवाने निलंबित करून एफआयआर दाखल करणार आहे.''
- राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: