कोकणात पावसाचा जोर ओसरला
- (प्रतिनिधी)
Saturday, July 14, 2012 AT 02:30 AM (IST)
पुणे - मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यानंतर कोकण किनारपट्टीवरील किनारी कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता ओसरल्याने राज्यात सर्वत्र पावसात घट झाली आहे. कोकण व विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे.
सोमवारपर्यंत राज्यात कोठेही पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा अभाव असल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले म्हणाल्या, ""मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने ईशान्य व उत्तरेकडील राज्यांमध्ये मॉन्सून सक्रिय राहील. महाराष्ट्रात फारसा पाऊस होणार नाही. कोकण वगळता इतर भागांत पावसाचे प्रमाण खूपच कमी असेल. येत्या सोमवारपर्यंत राज्यात पाऊस वाढण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नाही.''
कोल्हापुरात ऊन-सावल्यांचा खेळ
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 13) दुपारपर्यंत पश्चिमेकडील गगनबावडा, राधानगरी तालुक्यात थांबून थांबून पावसाची रिपरिप राहिली. उर्वरित तालुक्यात मात्र ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक 49 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चंदगडमध्ये 11 व राधानगरीत 10 मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांत सरासरी पाच ते सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शुक्रवारी (ता.13) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत प्रमुख ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) - कोकण - कुडाळ 60, वैभववाडी, चिपळूण प्रत्येकी 50, तलासरी, कर्जत, श्रीवर्धन प्रत्येकी 40; मध्य महाराष्ट्र - गगनबावडा व सोयगाव प्रत्येकी 50, भडगाव व जाफराबाद प्रत्येकी 30, इगतपुरी व महाबळेश्वर प्रत्येकी 20; मराठवाडा - सिल्लोड 20, कन्नड 10; विदर्भ - अहेरी व भामरागड प्रत्येकी 60, इटापल्ली 50, कुरखेडा 40, तिवसा, देऊळगाव राजा, कोरची, पातूर, कळमेश्वर व काटोल प्रत्येकी 30; घाटमाथा - खोपोली 50, लोणावळा, डुंगेरवाडी प्रत्येकी 30, भिरा, भिवपुरी, कोयना, तामिनी प्रत्येकी 20.