Last Update:
 
फुलोरा

लहान शेतकरी अजून तरी एकत्र आले नाहीत
-
Tuesday, July 17, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: fulora

एकर, दीड एकरच मालकीची शेती असणारे गावात आता ऐंशी टक्के आहेत. एक तर एवढ्या शेतीवर त्यांचा काही घर प्रपंच चालत नाही, त्यामुळे शेतीखेरीज इतर उद्योग - धंद्यात जे मिळेल ते काम करणारांची संख्या वाढली आहे. पूर्वीची पिढी केवळ शेतीवर अवलंबून होती. फार तर शेतीपूरक काही तरी उद्योगधंदा, तोही जोडधंदा म्हणून करीत होते; पण अशांचीही संख्या गावात फारच कमी होती. अशी काही फार धडपड करावी, असं वाटायचं नाही. याचं कारण पोटापुरतं शेतातून मिळतं, यातच बरेच समाधानी होते. समाधानी होते याचं दुसरं एक कारण होतं. त्यांच्या गरजाही फार कमी होत्या. खरं तर कमी होत्या, असं म्हणणंही बरोबर नाही. गरजा काहीच नव्हत्या. चैनीची गरज म्हणजे तंबाखू किंवा विडी, यापलीकडे फार कोणी गेला नव्हता. एक दोघे दारू पीत होते; पण त्यांना तशी गावात किंमत नव्हती. त्यांना सगळे दारूडे म्हणूनच ओळखीत होते. त्यांना तशी किंमत नसल्याने त्या वाटेने फारसं कोणी जात नव्हतं. आता परिस्थिती पालटली आहे. मायबाप सरकारचा परवाना घेऊन गावात देशी दारूचं दुकान गावाच्या मध्यभागीच सुरू केलं आहे. त्याचं उद्‌घाटन करण्यासाठी पुढारी आले होते. एवढा टोकाचा बदल लोकांनी कसा काय स्वीकारला, याचं एखाद्याला आश्‍चर्य वाटेल. काहींना हे खरंही वाटणार नाही. आपणास खरं न वाटणाऱ्या अनेक गोष्टी खऱ्या असतात. एवढंच नव्हे, तर आपल्या डोळ्यांसमोरच घडतानाही आपण रोजच बघत असतो. जे आपण रोजच बघतो, ते बघून बघून आपल्या डोळ्यांनाही सवय होऊन जाते. त्यामुळे सगळं बघून आपली नजर मेली आहे, असं कुणी जर म्हटलं, तरी त्याला आपण नाक मुरडून कसं काय चालेल? पण असंही चालतं. काही तरी उलाढाल करून कमाई करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. पण एक होत आहे. कमाईच्या पैशांतील बराच भाग हौसेमजेसाठी खर्च होत आहे. याला एक सार्वजनिक प्रतिष्ठा आता मिळत आहे. एवढंच नव्हे, तर यात काही आपण चुकीचं करीत आहोत, हे करणं गैर आहे, असं नव्या पिढीला वाटत नाही. जे जुने आहेत, त्यांचं ऐकण्याच्या मनःस्थितीत कुणीच नाही, याचं कारण नवी पिढी जुन्या पिढीला विचारते, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कमवलं? ज्या पोरांना अजून मिसरूटही फुटली नाही, आयुष्यातील कोणत्याही कठीण परिस्थितीशी ज्यांनी सामना केला नाही, बरंच ज्यांना अत्यंत मिळालं आहे, अशा पोरासोरांनी परिस्थितीशी सामना करून आपलं सत्त्व कधीच विकत नाहीत, अशा चारित्र्यवान लोकांना, तुम्ही आयुष्यात काय कमवलं, असा प्रश्‍न विचारायचं धाडस केलं जातं. याचं कारण आता सगळ्यांनाच वाटत आहे, कोणत्याही मार्गाने कमाई करायची असते, यात काही गैर नाही.

गावातील जे एकर - दीड एकराखालील लहान शेतकरी आहेत, त्यांचं शेतीकडे फारसं लक्ष नाही. गावातील अशा शेतकऱ्यांना एकत्र करून सोसायटी तयार करता येईल का? हा विचार काहींनी सुरू केला आहे. सहकाराने एकत्र काम करण्याची आता गावात संस्कृती राहिलेली नाही. जी भूमी काही तरी देऊ शकते, ती कसली पाहिजे. कारण बरीच शेती पिकाऊ आहे. प्रयत्न चालू आहे. अजून तरी यश मिळालेलं नाही. याचं कारण त्यावर कोणीच अवलंबून नाही. एके दिवशी बाहेरील कोणीतरी शेती विकत घेईल.



 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: