गोठ्यात ठेवा दुधाळ जनावरे
-
Wednesday, July 18, 2012 AT 02:00 AM (IST)
गाई, म्हशींची त्वचा ही पातळ, सैल व चमकदार असावी. शरीराचा मागील भाग रुंद व पुढील भाग निमुळता असावा. कासेवर ठळक शिरा असाव्यात, दुधाची शिर ठळक असायला हवी. यासारखी लक्षणांचा अभ्यास करून दुधाळ जनावरांची निवड करावी.
डॉ. मधुकर महाजन
दुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी गोठ्यात जातिवंत दुधाळ गाई, म्हशी असणे गरजेचे आहे. यासाठी पशुपालकांनी दुधाळ जनावरांची निवड जागरूकपणे करावी. गाई, म्हशींची निवड करताना त्याचे बाह्य स्वरूप, वंशावळ, प्रजननक्षमता, धार काढण्याच्या सवयी आणि दुग्ध उत्पादन, जनावरांच्या खोड्या (उदा. पान्हा सोडणे, लाथा मारणे), जनावरांचे वय, वेताचा क्रमांक या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
गाई, म्हशी खरेदी करताना हे तपासा...
1) बाह्य स्वरूप -
* जनावरांची त्वचा ही पातळ, सैल व चमकदार असावी. शरीराचा मागील भाग रुंद व पुढील भाग निमुळता असावा.
* मागील दोन्ही पायांतील अंतर योग्य प्रमाणात असावे. चारी सडे ही शक्यतो एकाच आकाराची व एकसारखी असावीत.
* कास फारशी लोंबती नसावी, अंगास चिकटून असावी. कासेवर ठळक शिरा असाव्यात, दुधाची शिर ठळक असायला हवी.
* त्वचेचा आजार नसावा व गोचीड, गोमाशी नसावी. त्वचेवरील केसांची लव चांगली असावी.
2) वंशावळ, प्रजननक्षमता -
* गाय, म्हैस खरेदी करताना त्याची वंशावळ पाहावी. मागील वेतातील दूध पाहणे गरजेचे आहे. दोन वेतातील अंतर किती आहे. वारंवार उलटते का हे पाहणे गरजेचे आहे.
3) जनावरांच्या खोडी -
24 तासांची धार पाहताना आपणास जनावरांच्या खोडी कळू शकतात. पान्हा केव्हा सोडते हे समजते. कोणत्याही व्यक्तीस धार काढू देते का? ठराविक व्यक्तीच हवी आहे हे पाहावे. गाय, म्हैस धार काढताना लाथ मारते, उड्या मारते, दूध सांडते का, हे तपासून पाहावे.
4) धार काढण्याची सवय व वेळ -
* सध्या दूध डेअरीजमध्ये दूध घालण्याची पद्धत जादा असल्याने व दूध दोहनाच्या वेळा स्वतंत्र असल्याने त्या त्या भागात त्या त्या वेळेनुसार धार काढली जाते. त्या वेळा वेळेतील जादा अंतर हे देखील पान्हा सोडण्यास कारणीभूत असते ते पाहावे.
* गाय/ म्हैस खरेदीपूर्वी स्वतः सकाळ, संध्याकाळ, सकाळ म्हणजे 24 तासांची धार पाहूनच नक्की दूध किती मिळते हे पाहता येईल.
* सडातील काही दोष असल्यास पाहता येईल (दूध पातळ, गाठी येणे)
गायी व म्हशींच्या महत्त्वाची जाती आणि दुग्ध उत्पादन -
संपर्क - डॉ. महाजन - 9422092653
(लेखक जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, औंध, पुणे येथे सहायक आयुक्त, पशुसंवर्धन म्हणून कार्यरत आहेत.)