चांगलं वातावरण तयार झालं आहे
-
Wednesday, July 18, 2012 AT 02:00 AM (IST)
पावसाची वाट पाहात बसलो आहोत. खरं तर आभाळाकडे डोळे लावून बसलो आहोत, असंच म्हणायला पाहिजे. एकतर पहिल्यांदा सगळीकडे असं वातावरण होतं, यंदा वेळेला मृग येणार आहे, नेहमीप्रमाणे यंदा तो चकवा देणार नाही. अशा सगळ्या वातावरणामुळे यंदा थोडी आशा वाटत होती. आशा वाटायचं कारण म्हणजे मॉन्सूनपूर्व थोडा पाऊस झाला. हवेत गारवा तयार झाला. जे काही होणार आहे याची ही चाहूल आहे असं वाटलं. त्यामुळे यंदा सरासरीइतका वेळेला पाऊस पडणार आहे, असा अंदाज जो काही सांगितला जात आहे, तो खरा वाटत होता. काही ठिकाणी पाऊस झाला आहे; पण आमच्या भागात अजून पाऊस झालेला नाही.
आमचा भाग नेहमीचा दुष्काळी भाग आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर झाला नाही, तरी काही वेगळं घडलं असं वाटत नाही. शेती तशी चांगली आहे, तरी आमच्याकडे अशी परिस्थिती आहे. तरुण पोरं काही गावात थांबत नाहीत. थोडा कळता-सवरता झाला, की जो तो काही तरी कामधंदा करण्यासाठी मोठ्या शहरांची वाट धरतो. तेथे त्याला काही ना काही तरी रोजगार मिळतो. एकदा त्याला शहराची सवय झाली की तो काही गावाकडे फिरकतही नाही. त्यामुळे ज्यांची चार - दोन एकर शेती आहे, असे शेतकरी आता पेरणीही करीत नाहीत. त्यांची मुलं शहरात गेली आहेत. ती काही ना काही मदत पाठवतात. अशा मदतीवरच गावातली काही कुटुंबं तग धरून आहेत. आता खरं तर पाऊस झाला नाही तरी त्यांना तसं काही वाटत नाही. तरी त्यांनाही ठाऊक आहे, शेतात पिकल्याखेरीज बाजारात कसं काय येणार आहे?
गावातील जे शेतकरी अशा परिस्थितीमुळे पेरणीही करीत नाहीत, त्यांची शेती कसण्याची जबाबदारी मी घेतली आहे. एक तर माझी शेती वीस एकर आहे. मी गेल्या वर्षी विहीर काढली आहे. विहिरीला पाणी लागलं आहे. मी विहीर काढायला मुहूर्त केला तेव्हा मला अनेकांनी वेड्यात काढलं. पाणी कसं काय लागणार, असं त्यांना वाटायचं! मी गेली चार-पाच वर्षे पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्याचा कार्यक्रमच हाती घेतला आहे. सरकारातूनही मी खटपट लटपट करून मदत मिळविली आहे. सरकारातून मदत मिळविणे किती कठीण आहे, हे ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना सांगण्याची गरज नाही; पण मी तशी खटपट सुरू केली. मला काही चांगल्या लोकांची मदत झाली. याचं कारण त्यांना वाटत होतं, दुष्काळी भागात असा काही कार्यक्रम कोणीतरी हाती घेतला पाहिजे. एकतर कुठल्याही सार्वजनिक कामात लोकांची उदासीनता असते. तो मला अनुभव आला. तशी मी माझ्या मनाची तयारी ठेवली होती; पण मला जो दुसरा अनुभव आला, तसा मी कधी विचारही केला नव्हता. मी जे काही सार्वजनिक काम करीत आहे, यातून मी फार तर स्वतःचा स्वार्थ साधत आहे. एवढेच नव्हे, तर सरकारी पैशांतून मी भ्रष्टाचार करीत आहे, असा आरोप काहींनी केला. त्याचं मला फार वाईट वाटलं. याचं कारण तसं मी काही केलेलं नाही. तरी नंतर एकाने मला सांगितलं, लोक अशी बदनामी करीत असतात. अशा वेळी नाराज न होता काम करायचं. मला हे थोडं जड गेलं, तरी मी तसं केलं. त्याचा सगळ्यांनाच आता फायदा झाला आहे. पाणी जिरवल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी सुधारली आहे. माझं बघून इतरही काही जण आपापल्या शेतीत सुधारणा करीत आहेत. चांगल्याचं अनुकरण होत आहे, ही तर चांगलीच गोष्ट आहे. चांगलं वातावरण तयार झालं आहे, हे चांगलं आहे.