Last Update:
 
ऍग्रो प्लस

खालावतो आहे वातावरणाचा दर्जा ...
-
Thursday, July 19, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro plus

डॉ. रामचंद्र साबळे
पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. त्यातूनच पृथ्वीवरील जीवसृष्टीला उपयुक्त वातावरण तयार झालेले आहे. मात्र दिवसेंदिवस या वातावरणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावत आहे. याचबरोबरीने हवा, पाणी, माती, झाडे, वृक्ष, जंगले, नद्या-नाले आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीचा दर्जा खालावत आहे. त्यामुळे प्राणी आणि मानवी जीवनावर परिणाम होत आहे. या सर्व परिस्थितीचा अभ्यास संयुक्त राष्ट्र संघाचे तज्ज्ञ यावर अभ्यास करीत आहेत. पर्यावरणात होणाऱ्या बदलाने साऱ्या जीवसृष्टीस उपयुक्त असे वातावरण कमी प्रमाणात निर्माण होत असल्याची चिंता जगभरातील शास्त्रज्ञांकडून व्यक्त होत आहे. वातावरणातील बदल आणि मानवाच्या आरोग्यावर होणारे परिणाम हा विषय आता महत्त्वाचा आहे. आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि मानवी आजारांचे प्रकारही वाढत आहेत. त्यातूनच रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. खराब हवामानाच्या परिणामाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जगातल्या काही गरीब राष्ट्रांमध्ये पाचास एक या प्रमाणातील मुले पाचव्या वर्षीच विविध कारणांमुळे मृत्युमुखी पडत आहेत. याचे मुख्य कारण आहे हवेतून प्रसार होणाऱ्या रोगांचा प्रसार. मलेरिया आणि श्‍वासोच्छ्वासाचे आजार व जुलाब यामुळे बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मलेरियाने आजारी असणाऱ्यांचे प्रमाण मुंबईत वाढत आहे, तर काविळीसारख्या रोगाचाही प्रसार होत आहे.

स्वच्छ पाण्याची कमतरता -
स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मानवी वस्त्यांना करणे हे खरोखर ध्येय असले तरी सध्या पिण्याच्या पाण्याचा दर्जा जगभर खालावत आहे. शहरांना धरणे बांधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. बहुतांशी शहरे ही नदीकाठच्या जवळ वसलेली आहेत. शहरांना धरणे बांधून पाण्याचा पुरवठा होत असला तरी त्याच नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात शहराचा मैला सोडला जात आहे. त्याच नदीच्या खालच्या भागातील शहरांना, गावांना आणि वस्त्यांना अशा प्रकारचे दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्याने असंख्य आजारांना तोंड द्यावे लागत आहे. जगभरची ही समस्या बनता असून, स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

पृथ्वीवरील केवळ 2.5 टक्केच ताजे पाणी म्हणून उपलब्ध आहे, उरलेले खारवट पाणी आहे. अटलांटिका आणि ग्रिनलॅंडमध्ये 70 टक्के ताजे पाणी बर्फरूपात साठवले जात आहे. त्यामुळेच 2.5 टक्के उपलब्ध ताज्या पाण्यापैकी 30 टक्के पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. पृथ्वीवरील जनजीवन हे ताज्या पाण्यावर अवलंबून असून ते मर्यादित स्वरूपात आहे. तसेच त्याची शुद्धता टिकवणे कठीण जात आहे. अन्नद्रव्ये आणि रसायने ही पाण्यामध्ये मिसळून जातात. त्यातूनच वनस्पती आणि प्राणिजीवन यांना अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो, शेतीसाठी होतो आणि कारखानदारीसाठी होतो. जगातील तीन लोकांपैकी एकास पाण्याची कमतरता भासत आहे. जगातील 25 टक्के लोक हे पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात राहतात. त्यांना पाणी समस्येला दररोज तोंड द्यावे लागते आहे. हे सर्व लोक विकसनशील देशांतील असून, त्यांना त्यांच्या भागातील नद्यांचे पाणी साठविण्याकामी अनुदान नसल्यानेच हे प्रश्‍न निर्माण होताना दिसत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष हे प्रामुख्याने लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होत आहे, तसेच शहरीकरण आणि शहराच्या आकारात होणारी बेसुमार वाढ, राहणीमानात होणारी वाढ आणि हवामानबदल या कारणांमुळे होत असल्याचे आता स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हवामानबदल आणि तापमान -
हवामानबदल हे फार महत्त्वाचे कारण पृथ्वीचे पाणीपुरवठ्यात अडथळा ठरत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. भूगर्भातील पाणीसाठ्यात होणारी घट, जागतिक तापमानवाढीने वाढणारा बाष्पीभवनाचा वेग आणि त्यातून निर्माण होणारी पाण्याची तूट ही सर्व परिस्थिती केवळ हवामानबदलाने होत असल्याचे जगभरचे चित्र आहे. पिकांच्या पानांमधून वाफ होऊन निघून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, पिकांना पाणी कमी पडत आहे. तापमानवाढीने हिवाळ्यात साचून राहणाऱ्या बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रमाण, त्याची जाडी कमी होत आहे, तर उन्हाळ्यात बर्फाचे पाणी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हवामानबदलास चालना मिळत आहे. त्यातूनच कोठे महापूर, तर कोठे दुष्काळी परिस्थिती उद्‌भवत आहे. थंड प्रदेशातील समुद्रातील बर्फ वितळत आहे. समुद्राचे किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात पाणी शिरून किनाऱ्यालगतच्या जमिनी खराब होत आहेत, तर वस्त्यांना उपद्रव जाणवत आहे. त्यातूनच थंड प्रदेशातील पाण्यातील बर्फाची पातळी खालावत आहे. हवामानबदलाने पर्यावरण चक्रावर परिणाम होतो. त्याचा परिणाम पाऊस आणि त्याच्या वितरणावर होत आहे. पाण्याचा दर्जा खालावण्यात हवेच्या तापमानवाढीनंतर पाण्याच्या तापमानात होणारी वाढ आणि त्या अनुषंगाने पाण्याची प्रत खालावण्यात होत आहे. त्यात काही जिवाणूंची वाढही होते. त्यानुसार पाण्याचा दर्जा खालावतो.

हवामानबदल आणि पाऊस -
तापमानवाढीने हवेचा दाब कमी होतो. यानंतर काही क्षेत्रात पावसात वाढ झाल्याचे दिसते. तर काही भागात दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे. जेथे पावसात वाढ होऊन अतिवृष्टी होते तेथे पाण्यामध्ये मातीचे कण, क्षार, अन्नद्रव्ये आणि इतर घटक मिसळून ते वाहून जातात आणि पाण्याची प्रतही खालावते. पाणी मोठ्या प्रमाणात वाहताना जमिनीच्या पृष्ठभागावरील मातीचा थर वाहून जातो. महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीस रशिया, चीन, इंग्लंड, अमेरिका या देशांत अतिवृष्टी झाली आणि महापुरांचे पाणी घरामध्ये, शेतीमध्ये घुसून मोठी हानी झाली. त्यात मनुष्यहानीही झाली. अशा प्रकारे नुकसान जगातील काही देशांत झाले तर भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तर भारतात अपुरा पाऊस होऊन दुष्काळी स्थितीचा सामना करण्याची वेळ आली. हवामानातील बदलाचे मुख्य परिणाम पाऊसमानावर आणि बाष्पीभवनाच्या वेगावर होत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत असून, तापमानवाढीमुळे पिकांची, जनावरांची आणि मानवाची पाण्याची गरज वाढत आहे.

उष्णकटिबंधीय विषुववृत्तीय क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचे संकेत मिळत असून, समशीतोष्ण प्रदेशात पावसाचे प्रमाण घटण्याचे संकेत मिळत आहेत. आक्षांशानुसार हा फरक वाढत जाण्याची भविष्यकाळात दाट शक्‍यता आहे. हिवाळ्यातही पावसाळा आणि उन्हाळी पावसातील वाढ हेही हवामानबदलाचे परिणाम आपल्या उष्णकटिबंधीय प्रदेशातही प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. त्यामुळे जगातील काही भागात पाण्याची उपलब्धता, तर जगातील काही भागात पाण्याची कमतरता असे चित्र प्रकर्षाने जाणवू लागलेले आहे. त्याचमुळे पृथ्वीवर पाण्याचे असमान वाटप होत असल्याचे चित्र आहे. त्या असमानतेत यापुढे वाढ होणे शक्‍य आहे.

पिकांच्या वाढीवर परिणाम -
पाऊसमानाच्या वितरणातील फरकाने सध्या पिकांच्या पेरणीच्या वेळेवर परिणाम होताना प्रकर्षाने जाणवत आहे. पिकांच्या वाढीवर आणि काढणीवर परिणाम होत आहे. अतिवृष्टी आणि महापुराने काही ठिकाणी मोठे नुकसान होत आहे, तर काही ठिकाणी मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आपल्याकडील दुष्काळी स्थितीने धरणे, तलाव, तळी कोरडी पडली आहेत. भूगर्भातील पाणीपातळी खालावलेली आहे. त्याचबरोबर बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, पिकातील पाणी कमी होऊन पिके वाळण्याच्या स्थितीत आहेत. भूगर्भाची पाण्याची पातळी खालावलेली आहे. हे सर्व परिणाम हवामान बदलाने घडत आहेत. याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत असून, त्याबरोबरच सर्व वातावरणावर परिणाम दिसून येत आहेत. बदलत्या हवामानामुळे वातावरण बदलत आहे. अनेक फळपिकांवर, बहर धरण्यावर मोठे परिणाम होत आहेत. एकूणच शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आहेत. पाण्याची प्रत प्रदूषणाने खालावत आहे. प्रदूषित पाण्याच्या वापराने मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्याचप्रमाणे जनावरांचे आरोग्य बिघडण्यावर परिणाम झाले आहेत. दुष्काळी पट्ट्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाबरोबरच चाऱ्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

विकसनशील राष्ट्रांत जगाची 79 टक्के लोकसंख्या आहे. विकसनशील राष्ट्रांतही शहरे वाढत आहेत. शहरातील राहणीमान खालावत असून, पिण्याच्या पाण्याचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. पिण्यायोग्य, गरजेपुरते पाणी सध्या शहरात पुरवले जात असले, तरी पुढील 25 वर्षांत शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या फार मोठ्या होणार आहेत.

कृषी क्षेत्रावरील परिणाम -
कृषी क्षेत्रातील पिकांना गरजेनुसार पाण्याची आवश्‍यकता असते. मात्र जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा उपलब्ध पाणी अपुरे पडते. ते सर्व हवामानाच्या अनुषंगाने घडते. शेतीक्षेत्रात पावसाचे पाणी फार महत्त्वाचे असते. पाऊसमानानुसार पिके घेतली जातात. प्रत्यक्ष पाऊसमानातील कमतरतेने पिकांच्या वाढीच्या काळात पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास त्याचा सरळ परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होताना दिसून येतो. त्यासाठी शेतीला पाणीपुरवठ्याची जोड असणे अत्यंत गरजेचे आहे. बागायत शेतीत क्षारांचे प्रमाण वाढण्याचे प्रश्‍न जसे भेडसावत आहेत, तसेच जिराईत शेतीतही ते भेडसावत असून, बाष्पीभवनाने पाणी निघून जात असताना जमिनीतील क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात जमत असून, जमिनीची आणि मातीची प्रत खालावत आहे.

सन 2050 मध्ये जगाची अन्नधान्याची गरज सध्यापेक्षा दुपटीने असेल. त्या वेळी अन्नसुरक्षेचे प्रश्‍न भेडसावतील. पाण्याची गरज दुपटीने वाढेल तेव्हा पिण्याचे प्रश्‍न जगभर मोठ्या प्रमाणात भेडसावतील. त्यासाठी आतापासून प्रत्येक देशाने, प्रांताने आपापले नियोजन करणे गरजेचे आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: