Last Update:
 
ऍग्रो मार्केट

फ्युचर्स किमतींमध्ये वाढीचा कल...
-
Friday, July 20, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: agro market

पावसाच्या ओढीमुळे सर्वच वस्तूंच्या फ्युचर्स व स्पॉट किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. अमेरिकी कृषी खात्याच्या जागतिक शेती उत्पादन व मागणीच्या नवीन अहवालानुसार पुढील वर्षी शेतीमालाचा जागतिक पुरवठा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचाही परिणाम किमती वाढण्यावर झाला आहे.
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

गेल्या सप्ताहातही मॉन्सूनची प्रगती समाधानकारक नव्हती. 10 जुलै ते 17 जुलै या कालावधीतील पर्जन्य निर्देशांक 81 होता. म्हणजे सरासरीपेक्षा या सप्ताहात 19 टक्के पाऊस कमी पडला. त्यामुळे 1 जून ते 17 जुलै या संपूर्ण मॉन्सूनच्या कालावधीतील पर्जन्य निर्देशांक 73 पर्यंत पोचला. थोडक्‍यात, देशातील आतापर्यंतचा एकूण पाऊस अजूनही सरासरीपेक्षा 27 टक्‍क्‍यांनी कमी आहे. आसाम वगळता सर्व शेती उत्पादनासाठी महत्त्वाच्या प्रदेशात आतापर्यंतचा पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. गुजरात, सौराष्ट्र, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, पश्‍चिम राजस्थान व कर्नाटक येथील एकूण पाऊस 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथे तो अनुक्रमे 41, 31 व 19 टक्‍क्‍यांनी सरासरीपेक्षा कमी आहे.

पावसाच्या या ओढीमुळे सर्वच वस्तूंच्या फ्युचर्स व स्पॉट किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली (आलेख 1 पहावा)
11 जुलै 2012 रोजी अमेरिकेच्या कृषी खात्याने जागतिक शेती उत्पादनाचा व मागणीचा नवीन अहवाल (World Agricultural Supply and Demand Estimates) प्रसिद्ध केला. या अहवालानुसार बहुतेक शेतीमालाचा जागतिक पुरवठा पुढील वर्षी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचाही परिणाम किमती वाढण्यावर झाला आहे.

10 जुलै ते 17 जुलै 2012 दरम्यान "एनसीडीईएक्‍स'मधील निरनिराळ्या किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

तांबडी मिरची -
पाच जूनपर्यंत मिरचीच्या (ऑगस्ट 2012) फ्युचर्स किमती उतरत त्या 4,820 रुपयांपर्यंत आल्या होत्या. नंतरच्या सप्ताहात त्या चढून रु. 5,442 रुपयांपर्यंत पोचल्या. गेल्या सप्ताहात त्या 6.2 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत दोन टक्‍क्‍यांनी कमी झाल्या. पावसाने अजून ओढ दिली तर पुढील काही दिवस किमती वाढण्याची शक्‍यता आहे.

गूळ -
एक जूनपर्यंत गुळाच्या (सप्टेंबर 2012) किमतीचा कल उतरता होता. त्यानंतर त्या वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 2.8 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 2.8 टक्‍क्‍यांनी वाढल्या. सध्या मागणी व पुरवठा स्थिर आहे; पण पावसाच्या प्रगतीवर पुढील वाढ अवलंबून आहे.

कपाशी -
दोन जूननंतर कपाशीच्या (फेब्रु. 13) फ्युचर्स किमती वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 4.8 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 5.7 टक्‍क्‍यांनी वाढल्या. आंतरराष्ट्रीय किमतीतील वाढ व आपल्याकडील अपुरा पाऊस ही प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेच्या कृषी खात्याने जागतिक उत्पादन तसेच भारत आणि पाकिस्तानमधील उत्पादनात घट येईल असा अंदाज केला आहे. गुजरात, विदर्भामधील अपुरा पाऊस यामुळे पुढील दोन सप्ताहांत किमतीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मका -
मक्‍याच्या (ऑगस्ट 2012) किमती पाच जूननंतर वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या पाच टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या विक्रमी 10 टक्‍क्‍यांनी वाढल्या. आपल्याकडील अपुरा पाऊस व अमेरिकेच्या कृषी खात्याच्या उत्पादनातील घट होण्याचा अंदाज यामुळे ही वाढ झालेली आहे. पावसाने अशीच ओढ दिली तर किमती पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

साखर -
साखरेच्या (ऑगस्ट 2012) किमती सहा जूननंतर वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या 4.35 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 4.2 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. सप्ताहातील कलसुद्धा सतत वाढता आहे. ब्राझीलमध्ये सुद्धा उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. पावसाने जर पुढील दोन सप्ताहांत ओढ दिली तर साखरेच्या किमतीत वाढ संभवते.
 
सोयाबीन -
सोयाबीनच्या ऑगस्ट 2012 च्या फ्युचर्स किमती दोन मेपर्यंत सतत वाढत होत्या व त्यांनी रु. 3,806 ची पातळी गाठली होती. नंतर त्या घसरल्या व रु. 3,400 च्या आसपास त्यांच्यात चढ-उतार होत होते. 16 जूनपासून मात्र या किमती मोठ्या प्रमाणावर चढत आहेत (आलेख 2). गेल्या सप्ताहात त्या 7.9 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा 6.6 टक्‍क्‍यांनी वाढल्या. 16 जून रोजी सोयाबीनची किमती रु. 3,380 होती. ती चढत 16 जुलै 2012 रोजी रु. 4,692 झाली. थोडक्‍यात, एका महिन्यात सोयाबीनच्या किमती 39 टक्‍क्‍यांनी वाढल्या. आपल्याकडील असमाधानकारक पाऊस, अमेरिकेतील कोरडे हवामान व ब्राझीलमधील अधिक प्रमाणात झालेली दृष्टी या कारणांमुळे ही वाढ होत आहे. या वर्षीचा अमेरिकेतील उत्पादनाचा अंदाज कमी होण्याचा संभव आहे. आपल्याकडेही सोयाबीन खालील क्षेत्र कमी होण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेच्या कृषी खात्याने जागतिक पातळीवर सोयाबीनमध्ये व एकूण तेलबियांच्या पुरवठ्यात घट येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पाऊस जर समाधानकारक झाला नाही तर पुढील दोन सप्ताहांत या किमतीतसुद्धा आणखी वाढ होण्याचा संभव आहे. ही वाढ रोखण्यासाठी 18 जुलैपासून स्पेशल मार्जिन पाच टक्‍क्‍यांवरून 20 टक्‍क्‍यांवर वाढवले आहे.

हळद-
पाच जूनपर्यंत हळदीच्या किमतीत (ऑगस्ट 2012) सतत उतरण होत होती. त्या दिवशी किमतीने 3,612 रुपयांची पातळी गाठली होती. त्यानंतर मात्र त्या चढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 16 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. ही वाढ सर्वस्वी अपुऱ्या पावसामुळे होत आहे. पावसात अशीच ओढ पुढील काही दिवसांत राहिली तर किमतीतील वाढ पुढील सप्ताहातही दिसून राहील. ही वाढ रोखण्यासाठी सहा जुलैपासून हळदीवरील मार्जिनसुद्धा 20 टक्के केले आहे.

हरभरा -
हरभऱ्याच्या किमती (ऑगस्ट 2012) आठ मेनंतर 16 जूनपर्यंत सतत उतरत होत्या, त्यांनी रु. 4,577 रुपयांवरून 4,174 रुपयांची पटली गाठली होती. गेल्या सप्ताहात मात्र त्या पाच टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. याही सप्ताहात त्या किंचित (0.5 टक्‍क्‍यांनी) वाढल्या. शासनाच्या नवीन अंदाजानुसार या वर्षी हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी होणार आहे. पुढील वर्षासाठी खरीप कडधान्यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. त्यात पावसाच्या अनिश्‍चिततेची भर पडली आहे. डॉलर महागल्यामुळे आयात किंमत पण वर जात आहे. या सर्वांमुळे व पुढील काही महिन्यांतील वाढत्या मागणीमुळे, हरभऱ्याचा लांबवरचा कल वाढता राहील असे दिसते.

गहू -
10 एप्रिल 2012 रोजी गव्हाची (ऑगस्ट 2012) किंमत रु. 1,338 होती. त्यानंतर ती सतत उतरत होती. मात्र गेल्या काही दिवसांत गव्हाच्या किमती वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या सहा टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 6.4 टक्‍क्‍यांनी वाढल्या. गहू जरी रब्बी पीक असले तरी मॉन्सूनच्या असमाधानकारक प्रगतीचा परिणाम आता गव्हावर सुद्धा जाणवू लागला आहे. पुढील काही दिवस किमती वाढण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेच्या कृषी खात्याच्या अंदाजानुसार मागील अंदाजापेक्षा जागतिक पातळीवर गव्हाचे उत्पादन कमी होण्याचा संभव आहे. ही घट मुख्यत्वे रशिया, चीन व काही प्रमाणात कॅनडा येथील कमी उत्पादनामुळे होईल.
 
बटाटा -
बटाट्याच्या (ऑगस्ट 2012) किमती 10 जानेवारी 2012 (679 रुपये) पासून सतत वाढत त्यांनी 15 मार्च रोजी रु. 1,500 रुपयांची पातळी गाठली होती. नंतर त्या रु. 1,078 रुपयांपर्यंत घसरल्या. सात जून (1,105 रुपये)नंतर मात्र त्या परत वाढू लागल्या आहेत. गेल्या सप्ताहात त्या एक टक्‍क्‍याने वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 2.2 टक्‍क्‍यांनी वाढल्या. एकूण कल वाढीचा आहे. पाऊस जर समाधानकारक झाला, तरच ही वाढ रोखली जाईल.

दोन आलेख आहेत.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: