मजुरांना हवीय तासिका तत्त्वावर मजुरी
-
Saturday, July 21, 2012 AT 02:00 AM (IST)
राज्यातील शेतकरी मजूरटंचाईने घायकुतीला
औरंगाबाद - मजुरांना आजच्या प्रचलित अपेक्षेनुसार मजुरी मिळणे क्रमप्राप्त मानले तरी एकूणच व्यवस्था जगाच्या पोशिंद्याला घायकुतीला आणण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र खरिपाच्या पृष्ठभूमीवर संपूर्ण राज्यात दिसत आहे. पूर्वी रोजंदारीवर काम करणारे मजूर आज तासिका तत्त्वावर मजुरी आकारू लागले आहेत. शेतकरी मात्र आर्थिक अडचणींचा सामना करतो आहे.
शेतीला लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत कागदावर उत्पन्न वाढलेले दिसत असले, तरी यांत्रिक शेतीच्या या युगात जी कामे हातानीच करावी लागतात, त्यासाठी मजूरच मिळत नसल्याने, ती कामे निर्धारित वेळेत करून घ्यावी तरी कशी, हा यक्षप्रश्न राज्यातील शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
केंद्रापासून राज्यापर्यंत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी योजनांची घोषणा व त्यांची प्रत्यक्ष होणारी अंमलबजावणी मजुरांना मोहात टाकते. मोठ्या शहरांचे आकर्षण, त्यामधील उपलब्ध रोजगाराच्या संधीचा लाभ घेऊन वर्षभरात चार महिने काम करून, उर्वरित वेळात योजनांचा आधार घेत जीवनक्रम चालविण्याची भूमिका मजुरांनी घेतल्याने, शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मजूरटंचाई समस्येवर संयुक्त कुटुंबपद्धती हाच एकमेव रामबाण उपाय आहे. कुटुंबातील सदस्याकडील जबाबदाऱ्यांची विभागणी केली, तर मजूरटंचाईवर सहज मात करता येईल.
सुधाकर खेडकर,
तिंतरवणी ता. शिरूरकासार, जि. बीड
असे ठरतात मजुरीचे दर
पुरुष मजूर ....... 200 रुपये
महिला मजूर...... 150 रुपये
फवारणी खर्च एकरी......400 ते 500 रुपये *पंपानुसार*
पाणी देणे ........ 200 रुपये