Last Update:
 
प्रादेशिक

कपाशीवर आकस्मिक मर (पॅराविल्ट)
-
Sunday, July 22, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: jalgaon,   kapashi
ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राचा निष्कर्ष; उपाययोजनेबाबत मार्गदर्शन

भुसावळ, जि. जळगाव (प्रतिनिधी) ः जळगाव जिल्ह्यात कपाशीची लागवड सुमारे चार लाख हेक्‍टरपर्यंत पोचली आहे. त्यापैकी उन्हाळी कपाशी सद्यःस्थितीत ऐन भरात असून, फूल-पात्या लगडण्यास सुरवात झाली आहे. या अवस्थेत हिरवीगार पाने अचानक पिवळी पडून संपूर्ण झाड कोमेजण्याचे व फूल-पात्या गळण्याचे प्रकार वाढले आहेत. ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने ही आकस्मिक मर (पॅराविल्ट)ची विकृती असल्याचे सांगून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

जून व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. पूर्वहंगामी कपाशीवर त्यामुळे पाण्याचा मोठा ताण पडला. मातीतील तापमानही दरम्यान वाढले होते. आता दीर्घ कालावधीनंतर पाऊस आला आहे. या सर्व प्रक्रियेत जोमदार वाढीसाठी आवश्‍यक अन्नद्रव्ये शोषण्यात मुळांना मर्यादा आल्या. त्याचा परिणाम पानांसह फूल-पात्यांवर झाला. पुरेसे पोषण न झालेली हिरवीगार झाडे पिवळी पडून कोमेजण्याचे प्रमाण वाढले. काहींनी बुरशीचा प्रादुर्भाव समजून उपाययोजना केल्या; पण काहीच उपयोग झाला नाही. शेतकरी हवालदिल झाले. ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने ही कपाशीवर आकस्मिक मर नावाची विकृती असल्याचे सांगितले असून, तातडीच्या उपाययोजना देखील सुचविल्या आहेत.

उपाययोजना
कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. संजीव पाटील यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कपाशीचे पीक पिवळे पडणे, हळूहळू मलूल होऊन वाळणे किंवा संपूर्ण पाने व खोडे लाल पडून पिकाची वाढ थांबल्याची लक्षणे दिसल्यास दीड टक्का युरिया (शंभर लिटर पाण्यात दीड किलो युरिया) किंवा दीड टक्का म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी. रोगग्रस्त झाडाच्या खोडाभोवती त्या द्रावणाची आळवणी (ड्रेचिंग) करावी. त्यानंतर पिकाला हलके पाणी द्यावे. 15 दिवसांनंतर दोन टक्के डाय- अमोनिअम फॉस्फेटच्या द्रावणाची (प्रति शंभर लिटर पाण्यात दोन किलो) आळवणी करावी व पाणी द्यावे. ओलावा नसताना रासायनिक खतांची मात्रा जमिनीतून न देता फवारणीच्या माध्यमातून द्यावी. तण हे पिकाशी स्पर्धा करते, त्यामुळे शेत तणविरहित ठेवणे केव्हाही चांगले असते. पावसाचा खंड पडल्याच्या स्थितीत उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी दिल्यावर कपाशीवरील ताण कमी होऊ शकेल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: