साताऱ्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करा
- (प्रतिनिधी)
Monday, July 23, 2012 AT 01:45 AM (IST)
खासदार राजू शेट्टी - भरपाई, कर्जमाफीसाठी आंदोलनाचा इशारा
सातारा - जिल्ह्यात दुष्काळामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी व शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करावे. येत्या आठ दिवसांत या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी यांना मागण्यांचे निवेदन दिले, या वेळी श्री. शेट्टी यांनी हा इशारा दिला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानदेव कदम, पांडुरंग शिंदे, बजरंग साळुंखे, मच्छिंद्र घाडगे, बाळासाहेब कदम उपस्थित होते. या वेळी खासदार शेट्टी यांनी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही अद्याप दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. पावसाने ओढ दिल्याने ऊस व फळबागा वाळून गेल्या आहेत. खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांची वीजबिले, सोसायट्या व बॅंकांची कर्जे माफ करावीत. शासनाने या सर्व मागण्यांबाबत येत्या आठ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असे शेट्टी यांनी सांगितले.
"सह्याद्री' वगळता एकाही साखर कारखान्याने उसाचा दुसरा हप्ता दिलेला नाही, असे शंकर शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हा प्रशासनाने कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी अशी समोरासमोर बैठक घेऊन याप्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.