चारा पिकांची लागवड कशी करावी?
-
Monday, July 23, 2012 AT 01:30 AM (IST)
- गोवर्धन रासकर, येवला, जि. नाशिक
चा रा पिकासाठी ज्वारी पिकाची पेरणी जून व जुलै दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. चारापिकासाठी रुचिरा, फुले अमृता, मालदांडी 35-1, एसएसजी 59-3, एमपी चारी या जाती निवडाव्यात. ज्वारी चारापिकासाठी हेक्टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी हेक्टरी 10 ते 12 बैलगाड्या शेणखत, कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 40 किलो पालाश तसेच पेरणीनंतर 30 दिवसांनी 50 किलो नत्र अशी खतांची मात्रा द्यावी. प्रति हेक्टरी 50 ते 55 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
मका -
चारा पिकासाठी मका पिकाची पेरणी जून व जुलै दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. चारा पिकासाठी, आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-2 या जातीची निवड करावी. चारा पिकासाठी हेक्टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश अशी खतांची मात्रा द्यावी. उर्वरित 50 किलो नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. प्रति हेक्टरी 50 ते 60 टन हिरवा चारा मिळतो.
बाजरी -
चारा पिकासाठी बाजरीची पेरणी जून- जुलै दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. चारा पिकासाठी बाजरीच्या जायंट बाजरा या वाणांची निवड करावी. हेक्टरी 10 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी हेक्टरी 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश या खतांची मात्रा द्यावी. उर्वरित 30 किलो नत्र पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी द्यावा. प्रति हेक्टरी 45 ते 50 टन हिरवा चारा मिळतो.
चवळी -
चवळीची पेरणी जून ते ऑगस्ट दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. पेरणीसाठी श्वेता, ईसी 4216, यूपीसी 5286 या वाणांची निवड करावी. हेक्टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी हेक्टरी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद अशी खतांची मात्रा द्यावी. प्रति हेक्टरी 30 ते 35 टन हिरवा चारा मिळतो.
संकरित नेपियर -
जून ते ऑगस्ट दरम्यान पेरणी करावी. लागवड करताना 90 ु 60 सें.मी. अंतरावर करावी. फुले जयवंत (आरबीएन 13) या वाणाची निवड करावी. हेक्टरी 25,000 ठोंबे वापरावेत. पेरणीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 बैलगाड्या शेणखत/ कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 20 किलो पालाश तसेच प्रत्येक कापणीनंतर प्रति हेक्टरी 25 किलो नत्राची मात्रा द्यावी. प्रति हेक्टरी सहा ते सात कापण्यांमध्ये 200 ते 250 टन हिरवा चारा मिळतो.
: प्रा. एम. जी. मोटे, 9890123462
विभागीय विस्तार केंद्र,
कृषी महाविद्यालय, पुणे