नाशिक बाजार समितीत घेवडा, आले, कोथिंबीर तेजीत
-
Tuesday, July 24, 2012 AT 02:00 AM (IST)
ज्ञानेश उगले
नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात श्रावण महिन्याच्या प्रारंभीच घेवडा, आले, कोथिंबीर, भुईमूग शेंगा, बटाटे, हिरवी मिरची या शेतीमालाला मागणी वाढली. या फळभाज्यांची आवक कमी व मागणी अधिक असल्याने तेजीचे दर मिळाले.
श्रावण महिना लागूनही पुरेसा पाऊस नसल्याने नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली आहे. घेवड्याची आवक सरासरी 50 क्विंटल राहिली असताना क्विंटलला 2000 ते 4000 व सरासरी 3000 रुपये दर राहिले. मागील महिन्यापासून कोथिंबिरीची आवक व दर वाढतेच राहिले आहेत. गत सप्ताहातही कोथिंबीर व इतर पालेभाज्यांच्या दरातील तेजी कायम राहिली. या वेळी दिवसाला 82 हजार जुड्यांची आवक होत असताना कोथिंबिरीला प्रति शंभर जुडीस 600 ते 5000 व सरासरी 3000 रुपये दर निघाले. या काळात लिंबू आणि आल्याच्या दरात लक्षणीय घट राहिली. या वेळी आल्याची आवक 45 क्विंटल झाली, तर लिंबाची आवक अवघी 18 क्विंटल राहिली. लिंबाला क्विंटलला 2100 ते 3300 व सरासरी 2700 रुपये दर मिळाले. आल्याच्या दरात गत सप्ताहात 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली. आल्याला प्रति क्विंटलला 1500 ते 3800 व सरासरी 3000 रुपये दर निघाले. दरम्यान मेथी, वांगी व लवंगी मिरची यांच्या दरातही स्थिरता राहिली. मेथीची आवक 123 क्विंटल झाली असता क्विंटलला 800 ते 2100 व सरासरी 1500 रुपये दर निघाले. गत सप्ताहात वांग्याची 315 क्विंटल आवक झाली. वांग्याला क्विंटलला 1000 ते 2900 व सरासरी 1900 रुपये दर निघाला. मागील पंधरवड्यापासून लवंगी मिरचीच्या आवकेत व दरात वाढ झाली आहे. व्रतवैकल्याच्या दिवसांत मिरचीला मागणी वाढत असल्याने या काळात मिरचीचे दर वाढतात. गत सप्ताहात 1400 क्विंटल आवक मिरचीची झाली. या वेळी मिरचीला क्विंटलला 1600 ते 3500 व सरासरी 2000 रुपये दर निघाले. श्रावण महिन्यात भाजीपाल्याची आवक कमीच राहणार असल्याने दर टिकून राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले
""श्रावण महिन्यामुळे आले, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर या शेतीमालाला मागणी वाढली आहे. अजून महिनाभर ही परिस्थिती असल्याने दर टिकून राहण्याची शक्यता आहे.''
- अशोक खकाळे, सचिव, नाशिक बाजार समिती