Last Update:
 
फुलोरा

एक दिवस सोनेरी पावलाने माझ्या दारी आला
-
Tuesday, July 24, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro vision

गावदरीला माझी चार एकर शेती आहे. गावाशेजारीच शेती आहे. विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे. लहान - लहान मुंगळे झरे आहेत. माझी सगळी शेती विहिरीच्या पाण्याने भिजते. पहिल्यापासून मी उसाचं पीक घेत नाही. हंगामाप्रमाणे मी वेगवेगळी पिकं घेतो. दोन एकर भाजीपाला आहे. त्यातील भाजीपाला विकून रोज ताजा पैसा मिळतो. मी दोन एकर फुलशेती केली आहे. अलीकडे बरेच लोक आता फुलशेती करतात. पंचवीस - तीस वर्षांपूर्वी आमच्या भागात फुलशेती कोणीच करीत नव्हतं. मोठ्या शहरात फुलं चांगल्या भावाने विकली जातात, हे कुणाला ठाऊकही नव्हतं. दुसरी एक अडचण होती, गावाला त्याकाळी वाहतुकीची सोय नव्हती, त्यामुळे असं धाडस कुणी करीत नव्हतं. सुरवातीला मला अनेक अडचणी आल्या. कारण, वेळच्या वेळी बाजारात माल न्यावा लागतो. भाजीपाला हा तर नाशवंत माल आहे. तो फार दिवस टिकत नाही. एकंदरीत, यामध्ये फारच मेहनत होती. एवढा सगळा खटाटोप करूनही मला अनेकदा तोटाही सहन करावा लागत होता. त्या वेळी गावातील अनेकांनी मला हा नाद सोडून उसाची लागण करण्याचा सल्ला दिला. तो तर सोपा मार्ग होता. मी ठरवलं होतं, आपण या सोप्या मार्गाने जायचं नाही. मला हे ठाऊक होतं. आज जरी यात नुकसान होत असलं, तरी पुढे माझा जम बसू शकेल. काही चुका मला नेमकी माहिती नसल्याने झाल्या होत्या. त्या चुका मी पुढे होऊ दिल्या नाहीत. कुठल्या मालाला कुठे व कधी चांगला भाव मिळतो, याचा माझा अंदाज चुकला होता. चुका या सगळ्यांच्याच होतात. मी मात्र माझी चूक कबूल करून दुरुस्त करतो. त्यात मला काहीच कमीपणा वाटत नाही. जोवर आपला जम बसणार नाही, तोवर आपण जे बोलतो, त्यावर कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. अशा वेळी मी स्वतःसाठी एक आचारसंहिता तयार केली. जो कोणी जे काही बोलतो, ते ऐकून घ्यायचं, त्यातून काही आपलं चुकत असेल तर लगेच मान्य करायचं. त्यात काही लोक आपली निंदा करण्यासाठी आपल्याला काही बोलतात, हे मला कळत होतं. तरी मी त्यांनाही उलट बोलायचो नाही. त्यांचंही ऐकून घेत असे. चार - सहा वर्षांत गावातील एकही माणूस असा राहिला नाही, की ज्याने माझी निंदा केली नाही, टवाळी केली नाही. माझ्या बायकोचा मात्र माझ्यावर विश्‍वास होता, त्यामुळे इतरांनी काहीही म्हटलं तरी त्याची मला फार चिंता नव्हती. कारण ज्याला स्वगृही मान मिळत नाही, त्याला दुनियेत मान मिळूनही उपयोगाचा नाही. याच एका बळावर मी माझं काम करीत राहिलो.

काही दिवस असे निघून गेले. एक दिवस असा उगवला. तो सोनेरी पावलांनी माझ्या दारी आला. फुलांसाठी परदेशी मोठी बाजारपेठ मिळाली. माझा माल परदेशी जाऊ लागला. माझ्या गुलाबाला जागतिक प्रदर्शनात पाहिलं बक्षीस मिळालं. सगळीकडे माझा गौरव होऊ लागला. गावातीलही काही लोक लाजेखातर हारतुरे घेऊन आले. ज्यांचे मी प्रहार झेलले आहेत, ते आज हार घेऊन आले होते. इतका त्यांच्यात बदल कसा काय झाला? त्याला एकच कारण, तेही उघड आहे. माझ्या मालाचा गौरव सगळ्या जगभर झाला. माझ्या शेतात उगवलेला एका गुलाबाने जगात नाव कमवलं. हा मातीचा गुण आहे. त्यात माझी मेहनतही आहे. माझ्या मेहनतीला दाद मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. अशी अपेक्षा मी धरली तर चूक काय? उसाची शेती फसली आहे, सगळे कर्जबाजारी आहेत. साखर कारखान्यांचे लिलाव बोलले जात आहेत.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: