Last Update:
 
फुलोरा

माझा दोष जरी नसला तरी शिक्षा झाली
इरगोंडा पाटील
Thursday, July 26, 2012 AT 12:00 AM (IST)
दवंडी - 25

मला कोणताही आधार नव्हता. जवळची नाती होती. आपल्याकडे काही नसेल, तर जवळची नातीही जवळ करीत नाहीत, हा अनुभव मला आला. असा अनुभव सगळ्यांना येत नाही. ज्यांना असा अनुभव येतो, त्यांनाच केवळ मी काय म्हणत आहे, ते कळेल, इतरांना कळालं तरी त्याची जाणीव होणार नाही. यात त्यांचा काही दोष नाही. मला कळू लागल्यापासून कळू लागलं, की आपल्याजवळ काहीतरी हवं. वडील एकुलते होते. मीही एकुलता आहे. वडिलांची वडिलोपार्जित दहा एकर बागायती शेती होती. त्यांच्या वडिलांनी आपल्या कष्टातून ती कमावली होती. ते तर केवळ श्रम घेऊन गावात जगायला आले होते. त्यांनी केवळ राबून नशीब काढलं. त्यांनी जी स्वप्नं बघितली, ती खरी ठरली. त्यांनी उशिरा लग्न केलं. त्या वेळी त्यांची चाळिशी उलटून गेली होती. कष्ट करून शेती घेतली. घर बांधलं. गावातील लोक बोलू लागले, बायकोशिवाय घराला घरपण येत नाही. त्यांना ते पटलं नाही, तरी लोकांना त्यांनी मान दिला. गावात एका गरिबाची मुलगी होती. कष्टाळू होती. तिचं लग्न झालं होतं. नवरा अकाली वारला. तेथे काही आधार नाही, त्यामुळे ती आई-बापाकडे येऊन राहिली. आई-बापही हातावरच पोट असणारेच होते. तिला आधार हवा होता. आई-बापाखेरीज कोण आधार देणार! त्यांनीच तिला जन्म दिला होता. गावाची एक पद्धत आहे. लग्न होऊन गेलेली कुठलीही मुलगी नवरा सोडून परत आली नाही. एवढंच नाही, तर गावात सून म्हणून आलेली कुठलीच मुलगी नवरा सोडून परत माहेरी गेली नाही. याचा अर्थ नवरा - बायकोत काही भांडणं होत नाहीत असा नाही. भांडणं होतात. अशी भांडणं मिटविणारे गावात आहेत. जरी लग्न होऊन गेलेल्या मुलीला त्रास असेल, तर पंच त्यांच्या गावी जाऊन वाद मिटवितात. त्यामुळे ताटातूट होत नाही, आजवर झालेली नाही. या मुलीचा नवरा अकाली वारला. तिला सासरी राहणं कठीण होतं. तिला गावी परत आणण्याचा पंचांनीच निर्णय घेतला. जरी ती गावी परत आली, तरी तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती. कारण, त्या काळी पंचांचा इतका वचक होता. असं कुणी जर वागलं, तर त्याची काही धडगत नाही. गावात एकदा नाचक्की झाली, तर गावात राहणं कठीण होतं. अशा वातावरणात माझ्या वडिलांच्या वडिलांनी गावात पत निर्माण केली. केवळ श्रम विकून ते मोठे झाले. गावच्या पंचांचा मान राखून त्यांनी त्यांची चाळिशी उलटल्यावर लग्न केलं. तेही नवरा वारल्यावर गावात परत आलेल्या विधवेशी लग्न केलं. त्या काळी खानदानी लोक असं लग्न करीत नसत. वडिलांचे वडील काही खानदानी नव्हते. जो जगायला आला आहे, त्याला कुठली आली पत; पण प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर माणसाची पत वाढते, हा अनुभव त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांना सतत कामं मिळत गेली. काम करणाऱ्यालाच सगळे काम सांगतात. ज्याच्याकडे भरपूर काम आहे, त्याच्याच मागे सगळे लागतात. तसंच त्यांचं झाले. दिवस कसा उगवतो, कसा मावळतो, हे काही त्यांना कळलं नाही. वयाच्या आठव्या वर्षी गावात आले. चाळिशी कधी गाठली हे काही त्यांना कळलंच नाही. दिवस इतके झटपट निघून गेले. कामातल्या माणसाला दिवस कसा जातो, हे काही कळत नाही. दिवसभर कष्ट करायचे. रात्री पडल्यावर कधी झोप लागते, हे काही त्यांना कळायचं नाही. सतत कामातच असल्याने वाईट नाद लागायचा प्रश्‍नच नाही. ज्यांच्याकडे रिकामा वेळ असतो; या वेळेचं काय करायचं, हे ज्यांना कळत नाही, त्यांनाच नाना प्रकारचे वाईट नाद लागतात. कामातल्या माणसाला कामाशिवाय जगल्यासारखंही वाटत नाही.

अशा बापापोटी माझ्या वडिलांचा जन्म झाला. त्यांनी आयुष्यात काहीच केलं नाही. जे काही होतं, तेही त्यांनी घालवलं. कारण त्यांना दुसरं कोणतंच काम नव्हतं. त्याच्या बापाने जे नाव कमावलं होतं, ते नावही त्यांनी गमावलं. अशा बापापोटी माझा जन्म झाला, त्यामुळे मला कोणीच जवळ करीत नाही. यात लोकांचा दोष नाही. दोष माझाही नाही. माझा दोष जरी नसला, तरी शिक्षा मलाच झाली.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: