आपणच जबाबदार आहोत, हे ठाऊक नाही
-
Saturday, July 28, 2012 AT 01:45 AM (IST)
इरगोंडा पाटील
माझी नोकरी फिरतीची आहे. पगार चांगला आहे. गावी आई असते. ती एकटीच आहे. पाच एकर शेती आहे. बागायती आहे. शेतीत तसं उत्पन्न चांगलं निघतं. हंगामाप्रमाणे पिकं घेतो. गावात मोठ्या प्रमाणात उसाचं पीक घेतात. आईने सुरवातीपासून ऊस लावला नाही. तिला वाटतं उसामुळे रानाचा कस कमी होतो. उसाला पाणीही भरपूर लागतं. भाजीपाला पिकवते. उसापेक्षा करार अधिक आहेत. पण यातून रोज ताजा पैसा मिळतो. आता शहरातील व्यापारी शेतावर येऊन भाजीपाला घेऊन जातात. आईबरोबर मी लहान वयापासून कामं करीत आलो आहे. त्यातून एखादी वस्तू विकावी कशी हे मी शिकलो. आपली वस्तू वाईट असू नये. ही तर खबरदारी घेत आलो आहे. विक्री करण्याची कला मला लहान वयापासून अवगत झाली. यात बोलावं कसं हे कळावं लागतं. आपली वस्तू विकताना आपण नेमक्या शब्दात कसं बोलावं हे महत्त्वाचं असतं. ही कला आहे. ही जरी कला असली तरी ती कला साध्य करता येतं असं नाही, ती जन्मजात देणगी आहे. काहींनाच हे जमले. इतरांना हे जमणार नाही. मला जसं कळू लागलं, तसं एक कळलं, ज्याला वस्तू विकता येते तेच मोठे होतात. वस्तू तयार करणं वेगळं, वस्तू विकणं वेगळं आहे. जे मोठे आहेत त्यातील वस्तू विकणारे खरे हुशार आहेत. गावात आमचं बघून इतरांनीही भाजीपाला लावला. त्यांना आमच्या इतकं यश मिळालं नाही. त्यांना गिऱ्हाइकं टिकवून ठेवता आली नाहीत. एकदा गिऱ्हाईक आलं की ते पुन्हा आलं पाहिजे. तसं त्यांना जमलं नाही. आता हे ठाऊक नाही. गिऱ्हाइकाला कधीच फसवायचं नाही. त्यांना वाटत आलं आहे. फसवून भरपूर नफा कमवता येतो. असं घडत नसतं. असं त्यांना कोणी शिकवलं नाही. त्यामुळे त्यांना फार काळ आपला धंदा चालवता आला नाही. झटपट पैसा कमवायला गेले. कायमची कमाई त्यांनी घालविली.
शेतीचा कारभार आई बघते. आईनेच मला सांगितले. तुझं वय अजून लहान आहे. याहून मोठ्या क्षेत्रात जा. त्यासाठी अनुभव घेतला पाहिजे. अनुभव घेण्यासाठी मी मोठ्या कंपनीत नोकरी मिळविली. त्यासाठी मी शिक्षण घेतलं. जग फार मोठं आहे. याची मला जाणीव झाली. मोठ्या कंपनीत काम करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यांनी मोठी बाजारपेठ निर्माण केलेली असते. हा मोठेपणा टिकवून ठेवण्यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. आपला माल इतरांपेक्षा चांगला असला पाहिजे. इतरांपेक्षा तो स्वस्तही असला पाहिजे. हे त्यांनी सूत्र ठेवले आहे. त्यामुळे जो माल विकत घेतो त्याला समाधान मिळते. शिवाय आपण मोठ्या कंपनीचा माल वापरतो याची त्यांना प्रतिष्ठा मिळते. ज्या कंपनीत आपण काम करतो, त्यावरून आपली समाजात पतही ठरते. कंपनीने समाजात नाव कमावलेले असते. त्याचा फायदा अनेकदा होतो. मी कंपनीच्या कामासाठी प्रवास करतो. माझा परिचय करून दिला की मला मान दिला जातो. कारण मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीस समाजात मोठे स्थान आहे. ते त्यांनी निर्माण केलं आहे.
आईने मला एकदा सांगितले होते, ज्याचं चांगलं चाललं आहे, त्याच्याबरोबर आपण चाललं पाहिजे. त्यामुळे आपलेही आपोआप चांगले चालते. जे अपयशी आहेत त्याच्याबरोबर कधीच चालायचं नाही. अपयशी माणसं सतत नकारात्मक बोलतात, त्याचा परिणाम होतो. तो होऊ द्यायचा नसेल तर अशांपासून दूरच राहिले पाहिजे. आई जे लहान वयात बोलायची तेच वेगळ्या भाषेत मला शिकवलं आहे. मला जे शिकता आलं ते सगळ्यांना शिकता आलं नाही. ते जर शिकता आलं तर कुणीच मागे राहणार नाही. जे मागे आहेत यात नशिबाचा भाग नाही. याला आपणच जबाबदार आहोत. आपणच जबाबदार आहोत, हे आपणास ठाऊक नाही.