विदर्भ, कोकणात मॉन्सून सक्रिय
-
Saturday, July 28, 2012 AT 02:15 AM (IST)
पुणे- कोकण व विदर्भात मॉन्सून सक्रिय असून अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होत आहे. रविवारी सकाळपर्यंत या दोन्ही विभागांतील मॉन्सूनची सक्रियता कायम राहून अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोकण व विदर्भात सर्वदूर पाऊस झाला. कोकणात कणकवली येथे 178 मिलिमीटर, तर विदर्भात गोंदिया येथे 198 मिलिमीटर पाऊस कोसळला. उर्वरित भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यालगतच्या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे व मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा त्याच्या मूळ स्थानाकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वारे भूभागावर सरकल्याने त्यांचाही जोर कमी होण्यास सुरवात झाला आहे. अरबी समुद्रातील किनारी कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता ओसरलेली आहे. यामुळे येत्या तीन दिवसांत म्हणजेच सोमवारपर्यंत राज्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.
शुक्रवारी (ता.27) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये - कोकण - कणकवली 178, वैभववाडी 123, राजापूर 115, कर्जत 30.7, पनवेल 20.1, खेड 21, रत्नागिरी 42.9, संगमेश्वर 66, लांजा 60, देवगड 24, सावंतवाडी 86, कुडाळ 32, दोडामार्ग 86; मध्य महाराष्ट्र ः चंदगड 195, राधानगरी 130, गगनबावडा 120, आजरा 69, इगतपुरी 12, यावल 10.2, मुळशी 12, वेल्हे 11, बार्शी 10.1, महाबळेश्वर 12.2, शाहूवाडी 45, भुदरगड 42
मराठवाडा - पराळा 13.6, पन्हाळा 10.6, हादगाव 14, भोकर 38, किनवट 20, सोयगाव 10;
विदर्भ -गोंदिया 198.2, तिरोडा 91.5, अहेरी 93, एटापल्ली 84.1, चामोर्शी 73, गोरेगाव 72.3, सिरोंचा 68, राजुरा 52.2, वाशीम 16.6, मानोरा 11.6, चिखलदरा 20, मोर्शी 22, वरुड 16.2, दारव्हा 13, कारंजा 22, देवळी 16, नागपूर 28.5, कामठी 29.6, रामटेक 30, पार्शीवणी 40.5, मौंढा 31, काटोल 26, सावनेर 32.4, भंडारा 50.2, मोहाडी 52.2, तुमसर 60, लखानी 26, आमगाव 86.2, सडकअर्जुनी 40, मूळ 27.6, कोपर्णा 30.8, बल्लारपूर 51.6, पोंभुर्णा 57, जिवती 34.2, धानोरा 35, मुलचेरा 66.