औषधी वृक्ष लागवडीतून साधा ग्रामसमृद्धी
डॉ. दिगंबर मोकाट, गणेश भुवड, डॉ. संजय भावे
Sunday, July 29, 2012 AT 12:00 AM (IST)
औषधी वृक्ष लागवड करताना त्याची निवड, झाडाचा आकार, येणारी फुले, त्याचा कालावधी, औषधी उपयोग, कुठली झाडे कुठे लावावीत याविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे. लागवड करताना परदेशी वृक्षांची लागवड न करता देशी वृक्षांची लागवड केल्यास जैवविविधता टिकविण्यासाठी मदत होते.
सृष्टीचे सौंदर्य खुलविण्यासाठी व संपन्नता आणण्यासाठी वृक्ष लागवड हा चिरकाली उपाय आहे. ओसाड, उघडीबोडकी झालेली गावे, गाव परिसर, शहरे, कंपन्या, शाळा, महाविद्यालये, शेती इत्यादी ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने वृक्ष लागवड करावी. ही लागवड करताना औषधी उपयोग असलेल्या वृक्षांना प्राधान्य द्यावे. हे वृक्ष सृष्टीसौंदर्यात भर घालण्याबरोबरच मनुष्याचे ढासळलेले आरोग्य सुधारण्यासाठी मदत करणारे आहेत. म्हणूनच ग्रामसमृद्धीसाठी औषधी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. औषधी वृक्ष लागवडीमधून आपणास दृश्य स्वरूपातील फायदे लगेचच मिळणार नाहीत; परंतु झाडे लावल्यानंतर लगेचच आपणास काही दिवसांत अदृश्य फायदे मिळण्यास सुरवात होते. मातीचे संवर्धन, पाणी संवर्धन, ऑक्सिजन निर्मिती, कार्बन- डाय- ऑक्साइड शोषून घेण्याची प्रक्रिया, जैविक खतासाठी पालापाचोळा, पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने तयार होतात. या वृक्षांपासून फळे, फुले, पाने; तसेच डिंक, धागे, रंग मिळतात.
औषधी वृक्षांची निवड ः
औषधी वृक्ष लागवड करताना त्याची निवड, झाडाचा आकार, येणारी फुले, त्याचा कालावधी, औषधी उपयोग, कुठली झाडे कुठे लावावीत याविषयीचे ज्ञान आपण माहीत करून घेणे आवश्यक आहे. लागवड करताना परदेशी वृक्षांची लागवड न करता देशी वृक्षांची लागवड केल्यास जैवविविधता टिकविण्यासाठी मदतच होणार आहे. वृक्षांची वैशिष्ट्ये, उपयुक्तता इत्यादीनुसार कुठली झाडे कोठे लावावीत याविषयी तज्ज्ञांकडून माहिती घ्यावी. 1) रस्त्याच्या दुतर्फा औषधी वृक्ष लागवड करताना बहावा, कांचन, सप्तपर्णी, कदंब, सुरगी, कोकम, भेरलीमाड, वड, करमळ, ताम्हन, काटेकोरांटी, सावर, पळस, करंज, आंबा, शिरीष, कवठ इत्यादी झाडांची लागवड करावी. लागवड करताना रस्त्याच्या बाजूला किती जागा आहे याचा विचार करावा. रस्त्याच्या दुतर्फा लागवड करताना उत्तर-दक्षिण लागवड शक्यतो टाळावी. यामुळे सभोवतालच्या शेतात सायवड (सावली) पडून संबंधित शेतकऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी मध्यम उंचीचे वृक्ष जसे टेटू, सोनचाफा, पुत्रंजिवा, सीताअशोक, वायावर्ण, बेल, समुद्रफळ, अग्निमंथ, चंदन, रक्तचंदन, बहावा, जांभूळ इत्यादी वृक्षांची लागवड करावी.
2) शाळा - महाविद्यालये व गावाच्या सभोवताली आकर्षक फुले येणाऱ्या, फळे देणाऱ्या झाडांची निवड करावी. उदा. कांचन, ताम्हन, बकुळ, नागकेशर, मुचकुंद, टेंभुर्णी, भोकर, अर्जुन, हिरडा, आवळा, बेहडा, चिंच, अटकी, करमळ, कोकम, मोईन, मोह, आंबा, पायर, उंबर, पिंपळ, सीताफळ, रामफळ, बोर, अळू इत्यादी झाडे लावतात.
3) गाव - शहर परिसरातील मोकळ्या जागा, नद्या - नाले, कुंपणे, कचरा डेपो या ठिकाणी बाभूळ, खैर, पायर, उंबर, पिंपळ, कुंभा, शिवण, पाडळ, आपटा, चारोळी, धामण, चंदन, अर्जुन, किंजळ, ऐन, तुती, एरंडी, वनएरंड, पळस, कुडा, मोह, कडुनिंब, तिरफळ, करंज, बोर, शेवगा, कुंती, कढीपत्ता, नोनी, फणस, सप्तरंगी, नरक्या, खिरणी, वारस, पांगारा, आसाणा, धावडा, दालचिनी इत्यादी वृक्षांची लागवड केल्याने मोठ्या प्रमाणात पक्षी त्या परिसरात येऊन शेतातील कीड प्रतिबंधास मदत करतील.
बहुपयोगी वनवृक्ष ः
वृक्षावर आधारित ग्राम स्तरावर लघुउद्योग उभारता येतील, जसे तुती लागवडीपासून रेशीम उद्योग, नैसर्गिक रंगनिर्मिती, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादींसारखे व्यवसाय बचत गटांच्या माध्यमातून सुरू करता येतील.
1) पळस ः मध्यम आकाराच्या या पर्णझडी वृक्षास केशरी रंगाची आकर्षक फुले येतात. बी, डिंक, फुले इत्यादींचा वापर मूत्रविकार, कृमीविकार इत्यादींमध्ये केला जातो. फुलांपासून नैसर्गिक रंग, पानांपासून पत्रावळी, मुळाच्या धाग्यापासून आकर्षक वस्तू इत्यादींसाठी वापर केला जातो. लाखेचे किडे वाढविण्यासाठी या वृक्षाचा वापर होतो. लागवड बियांपासून रोपे तयार करून करतात.
2) बकुळ ः मध्यम आकाराच्या या सदाहरित वृक्षास वर्षातून दोन वेळा सुगंधी फुले व रुचकर फळे येतात. फुले, खोडाची साल, फळे औषधी निर्मितीसाठी वापरतात. फुलांचा वापर जुनाट दमा, कफ कमी करण्यासाठी; खोडाची साल व फळे दंतविकार, मुखदुर्गंधी इत्यादींमध्ये वापरतात. फुलांपासून सुगंधी द्रव्यही काढता येते. या वृक्षाचे लाकूड टणक असते. लागवड बियांपासून रोपे तयार करून करतात.
3) बहावा ः हा मध्यम आकाराचा पर्णझडी वृक्ष असून, यास पिवळ्या रंगाची आकर्षक फुले येतात. शेंगांमधील मगज कृमी पाडण्यासाठी, पोटाच्या विकारात वायू कमी करण्यासाठी वापर केला जातो. रोपे बियांपासून केली जातात.
4) समुद्रफळ ः मध्यम उंचीच्या या सदाहरित वृक्षास लागवडीसाठी जमीन चांगली लागते. फुले झुपक्याने लाल रंगाची येतात. फळांचा उपयोग कृमिनाशक, कफ आणि टॉनिक म्हणून केला जातो. तोंडाच्या विकारात फळाच्या काढ्याने गुळण्या करण्याने आराम मिळतो. पाने व खोडाच्या सालीचा उपयोग जुलाब, अतिसार विकारांत केला जातो. सुंदर दिसणाऱ्या या वृक्षाची लागवड बियांपासून रोपे करून केली जाते.
5) अंकोल ः शास्त्रीय भाषेत "अलाजियम साल्वीफोलियम्' या नावाने या मध्यम आकाराच्या वृक्षास ओळखले जाते. पर्णझडी असलेला हा वृक्ष दहा मीटरपर्यंत वाढतो. फांद्यांचा शेवट काट्याच्या आकारात होत असल्याने हे झाड दिसण्यास सुंदर वाटते. फळांचा वापर पोट साफ होण्यासाठी, थंडावा निर्माण करण्यासाठी, डोळ्यांच्या विकारात, मासिक पाळीच्या विकारात साल वापरली जाते. लागवड बियांपासून रोपे करून केली जाते.
6) खिरणी ः "मनिलकारा हेक्सान्ड्रा' या शास्त्रीय नावाने या वनस्पतीस ओळखले जाते. चिकू कलमे बांधण्यासाठी या झाडाच्या रोपांचा वापर करतात. आठ ते नऊ मीटर वाढणाऱ्या या वृक्षास डिसेंबर - जानेवारीत फळे येतात. फळांचा वापर अपचन, पौष्टिकतेची औषधे इत्यादींमध्ये करतात. लागवड बियांपासून रोपे करून केली जाते.
7) लोंध्र ः "सिम्प्लोकॉस रॅशीमोसस्' या शास्त्रीय नावाने या वृक्षास ओळखतात. लहान आकाराच्या या वृक्षास पिवळ्या रंगाची सुवासिक फुले येतात. खोडाची साल व खोड औषधात वापरले जाते. सालीचा वापर जुलाब, अतिसार, पौष्टिकतेच्या औषधात केला जातो. हत्तीपाय फिलेरिया, यकृताच्या विकारातही सालीचा वापर होतो. खोडाचा वापर जखमा बऱ्या करण्यासाठी करतात. लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते.
8) पारिजातक ः "नाईट जस्मिन' या लहान आकाराच्या वृक्षास शास्त्रीय भाषेत "निकॅन्थस् अब्रोरेस्ट्रिस' या नावाने ओळखले जाते. सुगंधी केशरी रंगाचे देठ असलेली पांढरी फुले अतिशय मोहकता परिसरात निर्माण करतात. जुलाब, धुपणी, अल्सर इत्यादी विकारांत याचा वापर केला जातो. ताप, कृमीविकार, सांधेदुखी इत्यादींमध्ये पानांचा वापर औषधे बनविण्यासाठी केला जातो. लागवड बियांपासून अथवा खोडाच्या छाटांपासून केली जाते.
9) काळा कुडा ः छोट्या आकाराच्या या वृक्षास शास्त्रीय भाषेत ......................."ऱ्हायटिया टिंगटोरिया' असे म्हटले जाते. पाने हिरवी काळसर रंगाची असतात. कृमीविकार, जुलाब, अतिसार, गॅस, शुक्रवृद्धी इत्यादी विकारांत खोडाची व मुळाची साल व बी वापरतात. बियांस "इद्रजव' असे म्हणतात. लागवड बियांपासून रोपे करून केली जाते.
10) अग्निमंथ किंवा ऐरण ः या मध्यम आकाराच्या वृक्षाची पाने, मुळे, साल औषधात वापरतात. सांधेदुखी, मातेचे दूध वाढविण्यासाठी, पोटाचे विकार, गॅस, ताप इत्यादी विकारांत वापरतात. दशमुळांतील हा एक वृक्ष दुर्मिळ होत आहे. लागवड खोडाचे छाट व बियांपासून रोपे तयार करून करतात.
वरीलप्रमाणे औषधी उपयुक्त वृक्षांची लागवड गाव परिसर, रस्ते, मोकळ्या जागा, शाळा - महाविद्यालये इत्यादी ठिकाणी झाल्यास आणि लागवडीचे आणि लागवडीनंतरचे व्यवस्थापन उत्तम केल्यास निश्चितपणे परिसराच्या सौंदर्यात भर पडेल.
संपर्क ः 02358 - 284013, 283655
(लेखक वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)