Last Update:
 
मुख्य पान

दुग्धक्रांतीतून इस्राईलची प्रगती...
डॉ. राजेंद्र सरकाळे
Sunday, July 29, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: israel,   farmer,   milk,   agrowon
पाण्याचे नियोजन, ग्रीन हाऊसचा वापर, फळे, फुले व भाजीपाल्याचे मर्यादित क्षेत्रात जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पन्न घेऊन निर्यातीद्वारे इस्राईलने जगाची बाजारपेठ काबीज केली.आहे. याच बरोबरीने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसायही येथील शेतकऱ्यांनी स्वतःचा ठसा उमटविला आहे.

शंभर वर्षापूर्वी पूर्व युरोपमधून आलेल्या ज्युईश लोकांनी इस्राईलमध्ये दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करण्यास सुरवात केली; परंतु त्या वेळी या व्यवसायामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. यामधील मुख्य अडचणी अशा होत्या, की इस्राईलमध्ये त्या वेळी असणाऱ्या स्थानिक गाईंची दूध देण्याची आनुवंशिक क्षमता अतिशय कमी होती, तसेच युरोपमधील भरपूर दूध देणाऱ्या गाई, इस्राईलमधील हवामानात टिकू शकणार नव्हत्या. त्यामुळे दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी स्थानिक हवामान आणि परिस्थितीमध्ये टिकाव धरून जास्त उत्पादन घेण्यासाठी इस्रायली लोकांनी स्थानिक गाईंमध्ये संकरीकरणाद्वारे आनुवंशिक गुण सुधारले. यासाठी त्यांनी स्थानिक गाईंचा डच जातींच्या वळूचा संकर केला. अशा प्रकारे बऱ्याच पिढ्या पुन्हा संकर करून चांगली आनुवंशिकता असणाऱ्या गाईंची निवड केली. या संशोधनातून जास्तीत जास्त दूध देणारी व तेथील हवामानात स्थानिक गाईप्रमाणेच टिकाव धरणारी सशक्त व निरोगी इस्रायली फ्रिजीयन गाईची निर्मिती केली. सन 1955-60 च्या दरम्यान इस्राईल गाईपासून सरासरी 3500 लिटर दूध मिळत असे. आज त्यांनी प्रति वेतास 13,000 लिटर दुधापर्यंत मजली मारली आहे. आज दरवर्षी दरडोई इस्राईलमध्ये 180 लिटर दुधाचा खप आहे.

...असा आहे दुग्ध व्यवसाय ः
इस्राईलमध्ये दक्षिणेकडे मृत समुद्राच्या परिसर, मध्य भागातील म्हणजे निमदुष्काळी आणि उत्तर भागातील अति पाऊस पडणाऱ्या ठिकाणची दुग्ध व्यवसाय पाहायला मिळतो. सगळीकडे डेअरीची उभारणी व व्यवस्थापन सर्व ठिकाणी सारखी आहे, मात्र हवामानानुसार नियोजनात थोडेफार बदल केले आहेत. इस्राईलमध्ये डेअरी व्यवसाय किबूझ आणि मोशावच्या माध्यमातून केला जातो. एका डेअरी फार्ममध्ये सरासरी 75 ते 391 दूध देणाऱ्या गाई असतात. मृत समुद्राकडील दुष्काळी भागात आम्ही पाहिलेल्या डेअरी प्रकल्पामध्ये 300 गाई होत्या. या भागात केवळ 100 ते 200 मि.मी. पडतो. वर्षभर वातावरण कोरडे आणि तापमान 30 अंश सेल्सिअसपासून उन्हाळ्यात 45 अंश सेल्सिअसपर्यंत असते. किबूझ पद्धतीने शेती करणारे शेतकरी मिळणाऱ्या उत्पन्नाचे समान वाटप करतात.

डेअरीमधील संपूर्ण गोठा गॅल्व्हनाईज पाइपने उभारले आहेत. गोठ्याची उंची 25 ते 30 फूट ठेवून हवा खेळती राहण्यासाठी चारही बाजूंनी लोखंडाच्या पाइपचे हलकेसे कंपाउंड करून उघडे ठेवले जातात. गोठ्यावर सिमेंट, ऍस्बेस्टॉस प्रकारातील दर्जेदार पत्रा बसविला जातो. छतावरून अल्पसा सूर्यप्रकाश व हवा मिळावी म्हणून अंतरा-अंतरावर कप्पे ठेवून पत्रे बसविले जातात. या देशात सूर्यप्रकाश जास्त असल्याने वीजनिर्मितीसाठी ठिकठिकाणी सोलर पॅनेल बसविलेले असतात. गोठ्यात थंडपणा राखण्यासाठी 20 फुटांवर पंखे बसविले असतात. तसेच फॉगर्सद्वारे पावसासारखे बारीक थेंब धुक्‍याच्या स्वरूपात सोडले जातात. याचबरोबरीने गरजेनुसार गाईंना धुतले जाते. येथील गोठ्यात आपल्यासारख्या गाई बांधल्या जात नाहीत. साधारणपणे 300 गाईंच्या गोठ्यामध्ये दोन भाग करून एका भागात 150 व दुसऱ्या भागात 150 अशा प्रकारे गाई गोठ्यात मुक्तपणे फिरण्याची व्यवस्था केली आहे. दोन्ही गोठ्यांच्या मध्यभागी गाईंना चारा, खाद्य खाता यावे म्हणून सुमारे 30 फुटांचा गाळा ठेवला जातो. या ठिकाणी सकाळी ट्रॉलीद्वारे खाद्य पसरले जाते. खाद्य दिल्यानंतर आपापल्या शेडच्या बाजूला सुमारे तीन फूट उंचीवर बसविलेल्या लोखंडी कंपार्टमेंटमधून गाई पाहिजे तेवढे खाद्य खातात. गाईने कप्प्यामधून तोंड बाहेर काढल्यानंतर कप्पा आपोआप बंद होतो. चारा, खाद्य खाणे, फिरणे, पाणी पिणे अशी त्यांची मुक्तपणे प्रक्रिया चालू असते.

गाईंचे सुधारित व्यवस्थापन ः
गाईंना अनुभवातून धारा काढण्याच्या वेळा माहिती असल्याने त्या वेळी पान्हा फुटतो आणि शेडच्या लगत असलेल्या मिल्किंग मशिनकडे गाई ठरलेल्या वेळी जातात. काही गाई आजारी असल्यास किंवा काही कारणाने दूध काढणाऱ्या यंत्राकडे न गेल्यास त्याची कारणे शोधली जातात. गाईंच्या हालचाली, आजारपण, खाल्ले जात असलेले खाद्य ही सर्व माहिती वेळोवेळी संगणकाला पुरविली जाते. येथील गोठ्यात गाईंची दिवसातून तीन वेळा धार काढली जाते. इस्राईलमध्ये एकूण असणाऱ्या गोठ्यांपैकी काही पूर्णतः साध्या पद्धतीने म्हणजेच माणूस नियंत्रित आहेत. तर काही ठिकाणी रोबोंचा वापर केलेला आहे. डेअरी कोणत्याही प्रकारातील असली तरी डेअरी व्यवस्थापनासाठी खूप कमी म्हणजे दोन ते तीन माणसे पुरेशी होतात. बहुतांशी कामे यंत्राद्वारे केली जातात. दुष्काळी भागात पाहिलेल्या डेअरीतील गाईंची प्रति वेतास कमी म्हणजे दुधाची उत्पादकता 10,000 लिटर तर मध्यम दुष्काळी भागातील डेअरीत तीच उत्पादकता 11,000 लिटर आणि रोबोटिक डेअरीमध्ये दुधाची उत्पादकता 13,000 लिटरपर्यंत नेण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. नवनवीन संशोधन करून पुढील पाच वर्षांत प्रति गाय दूध उत्पादकता 18 हजार लिटर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सर्व गाईंची धार दूध काढणी यंत्राद्वारे काढली जाते. दुधाचे पुढील वितरण स्वयंचलित "मिल्क डिस्ट्रीब्युटर'द्वारे केले जाते. गाईंना खाद्य म्हणून हिरवा चारा न देता गव्हाच्या काडापासून तयार केलेले उत्कृष्ट मूरघास बारीक करून "मिक्‍स रेशन'च्या स्वरूपात गाईंना दिले जाते. त्यास "टीएमआर'असे म्हणतात. मूरघासामध्ये "टीएमआर'चे प्रमाण 30 ते 35 टक्के आणि अन्नधान्यापासून बारीक केलेला व बहुतांशी अन्नद्रव्ये असलेल्या खुराकाचे प्रमाण 65 टक्के असते.

गोठ्यात ज्या ठिकाणी गाई खाद्य खाण्यासाठी उभ्या राहतात फक्त तेवढाच भाग सिमेंट कॉंक्रिट अथवा फरशी बसवून टणक केला जातो. इतर ठिकाणी संपूर्ण गोठ्यात फक्त माती असते. माती असणाऱ्या भागातील जागेत गाईचे शेण, मलमूत्र तसेच ठेवले जाते. ठराविक कालावधीनंतर हे कुजलेले शेण शेतीसाठी वापरण्यात येते. काही गोठ्यात गाई खाद्य खाताना ज्या ठिकाणी उभ्या राहतात त्या ठिकाणी फरशीवर असलेले शेण व मूत्र पाइपद्वारे धुऊन गोठ्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या टाकीत साठविले जाते. त्यावर व्यवस्थित प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाते. या गोठ्यात माश्‍या दिसत नाहीत.
गोठ्यामध्ये दूध देणाऱ्या, दूध न देणाऱ्या (भाकड) आणि गाभण गाईंची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था केली जाते. गाईंचा भाकड काळ फक्त 45 ते 50 दिवसांचा असला तरी भविष्यात भाकड गाईंचे मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घ्यावयाचे असल्याने भाकड गाईंचेही व्यवस्थित संगोपन केले जाते. वासरांचे संगोपन वेगळ्या गोठ्यामध्ये केले जाते. वासरांना पहिले दूध प्रयोगशाळेत तपासणी करून दिले जाते. सुरवातीस वासरांना कृत्रिम दूध पाजले जाते.

इस्राईलमध्ये प्रति लिटर दुधास सर्वसाधारणपणे 38 ते 40 रुपये दर दिला जातो. नवीन डेअरी उभारावयाची झाल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. प्रति लिटर दुधास येणारा खर्च विचारात घेऊन शासन दुधाचे दर ठरविते. संपूर्ण दूध उत्पादन शासनाच्या मालकीचे असल्याने शेतकऱ्यास खासगी दूध विक्री करता येत नाही. लोकांची दुधाची वाढीव गरज भागविण्यासाठी शासन नवीन डेअरीस परवानगी न देता असणाऱ्या डेअरीच्या विस्तारीकरणास चालना देते. शासनाने दुधाची मागणी व उत्पादनाचा व्यवस्थित मेळ घातल्याने दुधाचे दर कधी पडत नाहीत आणि दूध कमी - जास्त होत नाही. शासनाने दूध उत्पादन, विक्री, प्रक्रिया, संशोधन व विकास यासाठी स्वतंत्रपणे इस्राईल डेअरी बोर्डाची स्थापना केली आहे. बोर्ड वेळोवेळी शासनास दुग्ध व्यवसायासंदर्भात माहिती पुरवीत असल्याने शासनास त्वरित निर्णय घेणे सुलभ होते.

दूध काढणीसाठी स्वतंत्र यंत्रणा
गाईंची धार काढणाऱ्या यंत्रामध्ये फ्लोमीटर जोडल्याने सडातून दूध येण्याचे प्रमाण, सडातून किती वेळात दूध येते तसेच कासदाह रोगाचे निदान अगोदर करता येते. त्याचबरोबर सडास एखादा रोग असल्यास सहजासहजी समजून येते. गाईच्या गळ्यात "ऍक्‍टिव्हिटी मीटर' बसविल्याने गाईच्या सर्वसाधारण हालचाली, गाईचे आजार, संगणकाला कळविले जातात. त्याचबरोबर गाईच्या गळ्यात बसविलेल्या विशिष्ट टॅगद्वारे गाई दररोज खाद्य किती खाते, खाल्लेल्या खाद्याचे व्यवस्थित पचन होते का? स्वतःसाठी खाल्लेल्या खाद्यापैकी किती खाद्य वापरले आणि खाल्लेल्या खाद्याचा दुधासाठी किती वापर केला जातो त्याची सर्व माहिती संगणकाला पुरविल्याने खाद्याचे व इतर सर्व बाबींचे नियोजन करणे सोपे जाते.

काही गोठ्यात यंत्रमानव खाद्य देण्यापासून ते गाईंची धार काढण्यापासून सर्व कामे करतो. यंत्रमानवाच्या सर्व यंत्रणा संगणकाला जोडलेल्या असतात. धार काढण्याच्या ठिकाणी एका पाठोपाठ गाई येऊ लागल्या की यंत्रमानव धार काढण्यास तत्पर असतो. धार काढण्यापूर्वी यंत्र मानव गाईची कास व सड स्वच्छ धुऊनच धार काढतो. एखादी गाय आजारी असल्यास व पुन्हा धार काढण्यास उभी राहिल्यास यंत्रमानव धार काढण्यास नकार देतो. एवढे करूनही गाय पुढे न गेल्यास यंत्रमानव गाईला हळूवार चापट मारतो, चापट मारल्यानंतर गाय त्वरित पुढे जाते. धार काढताना चुकून गाईच्या सडातून रक्त आल्यास यंत्रमानव धार काढणे लगेचच थांबवितो आणि तशी सूचना संगणकाला देतो. खाद्य खाणे, शेण व दूध काढणे, ही कामे यंत्रमानव करीत असला, तरी पशुवैद्यकाकडून गाय, वासरांची वेळोवेळी तपासणी केली जाते. आपल्याकडील डेअरीत इस्राईलसारखा रोबोटिक यंत्रमानवाचा वापर करण्याची आवश्‍यकता नाही. मात्र आवश्‍यकता आहे ती गाईच्या योग्य प्रकारे संगोपनाची आणि नियोजनाची.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: