पुणे जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीचे आज नामकरण
-
Sunday, July 29, 2012 AT 12:00 AM (IST)
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची उपस्थिती; यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राचेही अनावरण
पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा "यशवंतराव चव्हाण भवन' असा नामकरण सोहळा आणि तैलचित्राचे अनावरण केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. 29) सकाळी दहा वाजता होणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पूर्वीचा वेलस्ली) रस्त्यावर सुमारे 40 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक इमारत बांधण्यात आली आहे.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्ता भरणे, उपाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचा प्रारंभ आणि बक्षीस वितरण होणार असून, हा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे साडेदहा वाजता होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गेल्या वर्षी 22 ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. मात्र निमंत्रण पत्रिकेमध्ये शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. याच्या निषेध म्हणून तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांनी जिल्हा परिषदेच्या गाड्या फोडल्या होत्या. या घटनेमुळे शरद पवार यांनी खा. आढळराव यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत न टाकल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेत उद्घाटन कार्यक्रमाला यायचे टाळले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नूतन इमारतीचे "यशवंतराव चव्हाण भवन' नामकरण कार्यक्रम पत्रिकेत सर्व खासदार आणि आमदारांची नावे प्रसिद्ध करण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.