Last Update:
 
मुख्य पान

राहुरीत कृषी बाजार माहिती केंद्राचे उद्‌घाटन
-
Sunday, July 29, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: rahuri,   agrowon,   nagar
राहुरी विद्यापीठ, (जि. नगर) प्रतिनिधी : शेतकऱ्यांना विविध बाजारपेठांतील आपल्या कृषिमालाची योग्य दराने विक्री करण्यासाठी देशभरातील बाजारपेठांचा अभ्यास न करता केवळ विद्यापीठाच्या या केंद्रास एक फोन करून आपला विक्री योग्य माल योग्य व परवडणाऱ्या दरात विक्री करता येणे शक्‍य होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागामध्ये कृषी बाजार माहिती केंद्राचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. हरी मोरे, कृषिभूषण सुरसिंग पवार, विभाग प्रमुख डॉ. दादाभाऊ यादव, डॉ. मधुकर धोंडे, केंद्र प्रमुख डॉ. धनंजय नावडकर, डॉ. विठ्ठल शेंडे, डॉ. अरुण गवळी, डॉ. वसंतराव पोखरकर, डॉ. भाऊसाहेब पागिरे, केंद्राचे प्रभारी डॉ. रोहित निरगुडे उपस्थित होते.

या केंद्राद्वारे संगणक व इंटरनेटच्या माध्यमांद्वारे देशभरातील 1607 आणि राज्यातील 228 बाजारपेठांमधील दररोजच्या शेतीमालाच्या बाजारभावाबद्दलची अद्ययावत माहिती विनाशुल्क उपलब्ध करून दिली जाणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल योग्य ठिकाणी व अपेक्षित दराच्या ठिकाणी पाठविणे शक्‍य होईल.

विद्यापीठाची हेल्पलाइन
सद्यःस्थितीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये शेतकरी 02426-243657 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून सुमारे 137 पिकांबद्दलचे दराविषयीची मागील दिवसांची माहिती मिळवू शकतील. सुमारे दोन महिन्यांनंतर शेतकऱ्यांना दरविषयक सद्यःस्थिती कळू शकेल, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कळविले आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: