इस्राईलप्रमाणे कमी पाण्यावरील पिकांचा अभ्यास हवा
- (प्रतिनिधी)
Monday, July 30, 2012 AT 02:00 AM (IST)
उद्योजक मधुकरअण्णा मुळे : औरंगाबादेत "ऍग्रोवन कृषी उद्योजकता चर्चासत्रा'स उदंड प्रतिसाद
औरंगाबाद - शेतीचे संपूर्ण अर्थशास्त्र हे पावसावर अवलंबून आहे अन् हेच फार मोठे आव्हान आहे. इस्राईलप्रमाणे कमी पाण्यावर चांगले उत्पादन देणारी पिके कोणती आहेत, याचा अभ्यास करावा लागेल, असे मत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस, अग्रणी बियाणे उत्पादक व प्रसिद्ध उद्योजक मधुकरअण्णा मुळे यांनी येथे व्यक्त केले.
ऍग्रोवन'च्या वतीने कृषी उद्योजकता चर्चासत्राचे येथील तापडिया नाट्यमंदिरात रविवारी (ता. 29) आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी उद्योजक श्री. मुळे बोलत होते. अध्यक्षस्थानी दैनिक "सकाळ'च्या औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक जयंत महाजन होते. चर्चासत्रासाठी मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
श्री. मुळे म्हणाले, ""कापसासारखे पीक आहे. कापसाची रोपे बांधावर तयार करून पाऊस पडल्यानंतर लागवड करण्याचे प्रयोग केल्यास पीकवाढीचा कालावधी कमी होईल. शेतात प्रत्येक झाडाला द्यावे लागणारे पाणी देण्याची वेळ येणार नाही.'' ते म्हणाले, की कृषी उद्योजकता चर्चासत्रांमुळे फायदा होतो. "ऍग्रोवन' चांगले काम करत आहे. "ऍग्रोवन' हे दैनिक अतिशय सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत कृषी क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, मार्गदर्शन पोचविण्याचे काम करत आहे. केवळ नफा कमावणे हा उद्देश न ठेवता, महाराष्ट्रातील शेतकरी अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसा शेती करू शकेल, याविषयी सातत्याने प्रयत्नशील असणारे हे दैनिक आहे.
""आज शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामानुसार पिकांपासून बाजारभावापर्यंत सर्व माहिती "अग्रोवन'मधून दिली जाते. जगभरात शेतीच्या क्षेत्रात काय नवीन प्रयोग सुरू आहेत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करणे गरजेचे आहे, याविषयीचे अद्ययावत ज्ञान व मार्गदर्शन देण्याचे काम या दैनिकातून केले जाते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणतात शेतीला जोडधंदा असला पाहिजे. शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता, पीकपद्धतीत बदल करून ज्या पिकाला बाजार मिळतो, चांगला भाव मिळतो अशांचे उत्पादन घेतले पाहिजे आणि हेच काम "ऍग्रोवन' करत आहे. शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवण्याबरोबरच "ऍग्रोवन' शेतकऱ्यांच्या मालाबाबत अथवा अन्य बाबतीत जेव्हा प्रश्न निर्माण होतात, त्या वेळी त्यांना वाचा फोडण्याचेही काम करत आहे.'' दैनिक "ऍग्रोवन' आता हिंदीतूनही निघावे, अशी अपेक्षा श्री. मुळे यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकामध्ये कार्यकारी संपादक श्री. महाजन यांनी "ऍग्रोवन'च्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन "ऍग्रोवन'चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी केले.