Last Update:
 
फुलोरा

उपकाराची फेड करायचे राहूनच जाणार आहे
-
Thursday, August 02, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: fulora

माझी चार एकर शेती सदा कसतो. तो तसा भूमिहीन होता. मजुरी करीत होता. माझी बदलीची नोकरी होती. एक मुलगी आहे. ती नोकरी करते. पगार चांगला आहे. मुलगी सहा महिन्यांची असताना तिची आई वारली. सदाची बायकोही त्यावेळीच बाळंत झाली होती. कष्टामुळे निरोगी होती. मी तिच्याकडे मुलीला सांभाळायची जबाबदारी दिली. मला वाटलं होतं, ती वरून दूध देईल, मुलीचा सांभाळ करेल. ती आपल्या मुलीबरोबर माझ्याही मुलीला अंगावरच दूध पाजत होती, हे काही मला ठाऊक नव्हतं. नोकरीमुळे मी बाहेरच असायचो. भावकीत लोक बोलत होते. लहान मुलाला सांभाळायला बाई पाहिजे, दुसरं लग्न कर. मी अजून तिशीही ओलांडली नव्हती. असं लहान मुलं दुसऱ्याकडे टाकून कसं चालेल, असंही मला बोलत. पण मुलगी आनंदी होती. सदाच्या बायकोने तिला लळा लावला होता. माझे आई - वडीलही मी लहान असतानाच वारले होते. त्यांचा चेहराही मला आठवत नाही. आजी होती. तिने माझा सांभाळ केला. तीही अलीकडे वारली. ती वारल्यावर मी लग्न केलं. बायकोही एकाकी वारली. मुलीचा सांभाळ कसा करावा, हा माझा प्रश्‍न मिटला. नोकरीत पगार चांगला मिळू लागला. माझी शेती मी सदाकडेच कसायला दिली. माझ्या घरातच तो राहू लागला. मुलगी सातवीपर्यंत गावच्या शाळेत शिकेपर्यंत त्यांच्याकडेच होती. तिला त्यांचीच सवय झाली होती. तिला तिच्या आईची आठवण कधी झाली नाही. तिला चांगलं कळू लागलं त्या वेळी मी तिला तिची खरी आई कशी होती हे सांगितलं. तिचा एक फोटो माझ्याकडे होता, त्या वेळी तिचं वय माझ्या मुलीच्या वयाइतकंच होतं. तिला मी फोटो दाखवताच ती बोलली, हा माझा फोटो आहे. आरसा घेऊन आली. आरशातील प्रतिमा व फोटो तिने मला दाखवला. मला मुलीने विचारलं, माझाच फोटो आहे. आरशातील प्रतिमेशी तो इतका मिळताजुळता होता, की कुणीच फरक दाखवू शकणार नाही. जसजशी ती मोठी होऊ लागली, तसतसं तिला कळू लागलं. तिच्यावर सदाच्या बायकोने जे संस्कार केले, ते मीही करू शकलो नसतो. आपल्याहून वडीलधाऱ्यांशी ती फार आदराने बोलते.

गावामध्ये जे वृद्ध लोक आहेत, त्यांचा मुलीवर फारच लळा आहे. मुलगी चारचौघींत उठून दिसणारी आहे. पुढे तिचं चांगलं शिक्षण झालं. तिला आता चांगल्या पगाराची नोकरी आहे. यंदाच मी नोकरीतून निवृत्त झालो आहे. शेतात घर आहे. मी एकटाच आता शेतावर राहतो. शेती अजून सदाच बघतो. त्यानेही बरीच प्रगती केली आहे. गावात मजुरीसाठी आला. आता गावातील प्रतिष्ठित नागरिक बनला आहे. दोन मुलं आहेत. मुलगा गावचा पुढारी आहे. मुलीचं लग्न झालं आहे. त्याची अशी भावना आहे, माझ्यामुळे त्याची प्रगती झाली. चार एकर शेती कसायला दिल्याने त्याला आधार मिळाला. त्याने आता सोळा एकर शेती घेतली आहे. मुलगा पदवीधर आहे. शेतीमध्येच त्याचं लक्ष आहे. मी नोकरीवर असताना स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करून खात होतो, त्यामुळे आताही मी स्वतःचा स्वयंपाक स्वतःच बनवतो. माझा साधा आहार आहे. निरोगी आहे. सदाने आता शेती माझ्याकडे दिली, तरी तो सगळी मदत करतो. आजपर्यंत त्याने उलट शब्द कधीच उच्चारला नाही. गावात एक नंबरची शेती माझीच असायची. मेहनत सदाची होती. एकरी शंभर टन ऊस त्याने काढला आहे. जो मेहनत करतो, त्याला फळ मिळतं, असं आपण म्हणतो. मेहनत करणारे फारच अपवादाने मागे पडतात.

मुलीने मला सांगितलं आहे, शेती सदालाच द्यावी. एकदा मी सदाला हे बोललो. तो बोलला, मुलीच्या नावावरच शेती राहू द्या. त्याची मशागत माझ्यानंतरही माझा मुलगा करेल. त्यामुळे तर तिचा आमच्याशी संबंध राहील, ही त्यामागील त्याची भावना होती. मला ती प्रथम लक्षात आली नाही. आयुष्यात वाईट प्रसंग आले, त्यांची आठवण येऊ नये अशा घटना घडत गेल्या. चांगली माणसं भेटली, नाही तर कुठेतरी भरकटत गेलो असतो. एक रूखरूख वाटते, आपल्यावरील उपकाराची फेड न करताच, आपण निरोप घेणार आहोत.



 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: