Last Update:
 
राजकीय

राष्ट्रवादीचा अजेंडा "मुंबईसह महाराष्ट्र'
- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, August 02, 2012 AT 02:30 AM (IST)
Tags: mumbai,   rashtrawadi congress,  

मुंबई, : संयुक्‍त महाराष्ट्रात मुंबईचा समावेश झाला तरी कॉंग्रेसने राजकीय नकाशावर मुंबईचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही हाच कित्ता गिरवत मुंबईसाठी स्वतंत्र अध्यक्ष देण्याची परंपरा कायम ठेवली. मात्र, यामुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष यांच्यात समन्वय राहत नसल्याने मुंबईतला पक्षाचा कारभार राज्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या अखत्यारीत आणावा, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्‍त केली आहे.

मुंबईला स्वतंत्र अध्यक्ष आणि स्वतंत्र कारभार नसावा, अशी स्पष्ट भूमिका या नेत्यांची आहे.

मुंबईत सहा जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्हाध्यक्षांचा कारभार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या अखत्यारीत येतो. मात्र, मुंबईचा कारभार मुंबई अध्यक्षांच्या कक्षेत येतो. शिवसेना, मनसे या पक्षांत मुंबईसह महाराष्ट्रात जिल्हाप्रमुख हे पद असले तरी मुंबईसाठी स्वतंत्र अध्यक्ष अथवा प्रमुख नाही. मात्र पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीशी सुसंवाद राहावा म्हणून मुंबईतल्या राष्ट्रवादीचा कारभार प्रदेशाध्यक्षांच्या कक्षेत आणण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे.

मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्यात कोणत्याही प्रकारचा सुसंवाद नाही. त्यातच मुंबईत प्रदेश कार्यालय असल्यामुळे शहरातल्या सर्व जिल्हाध्यक्षांचा राज्याच्या प्रदेश कार्यालयासोबत सतत संपर्क असतो. त्यामुळे, सर्व जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांच्या अखत्यारीत आणल्यास कोणताही वेगळा परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यभरासाठी देण्यात येणारा पक्ष संघटनांचा कार्यक्रम मुंबईसाठीदेखील लागू राहील. त्यावर प्रदेश कार्यकारिणीचे नियंत्रण राहील.

संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कॉंग्रेसने "मुंबई कॉंग्रेस' असे नाव बदलून "मुंबई विभागीय कॉंग्रेस' असे नाव ठेवले. मात्र, प्रदेश कॉंग्रेस आणि मुंबई कॉंग्रेस यांचे कामकाज आणि कारभाराचे स्वतंत्र अधिकार दिले. राष्ट्रवादीनेही त्याच धर्तीवर मुंबई विभागीय राष्ट्रवादीची स्थापना केली. मात्र, यामध्ये बदल करून मुंबई विभागीय राष्ट्रवादीचा कारभार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या अखत्यारीत आणावास अशी भूमिका राष्ट्रवादीच्या ज्येष्ट नेत्यांची आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: