पोटाच्या तक्रारींपासून कायमच्या मुक्ततेसाठी
-
Friday, August 03, 2012 AT 02:00 AM (IST)
सध्याच्या फास्टफूडच्या काळात आहारपद्धती ढासळत आहे. जीवनक्रम बदलल्याने, कष्ट कमी पडत आहेत. यामुळे पोटाच्या तक्रारींचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आपण घेतलेल्या आहाराचे पचन करून शरीरघटकांमध्ये रूपांतर करणारा भाव म्हणजे अग्नी होय. आयुर्वेदानुसार या मंद झालेल्या अग्नीमुळेच बहुतांश रोग होतात.
1) अजीर्ण - अन्न बिलकूल घ्यावेसे न वाटणे, भूक न लागणे, जेवल्यानंतर पोट गच्च होणे, गॅसेस होणे, करपट ढेकर येणे, कडकडीत भूक न लागणे अशी अजीर्णाची सामान्य लक्षणे दिसतात.
बद्धकोष्ठता, मूळव्याध - शौचास साफ न होणे किंवा बद्धकोष्ठता हा सर्वसामान्यतः होणारा त्रास होय. जेवणाच्या वेळा अनियमित, जागरण, बाहेरचे खाणे, कडधान्य, मांसाहार यांचे अतिसेवन यामुळे हा त्रास उद्भवतो. हा त्रास सतत चालू राहिला तर व्यक्ती मूळव्याध या भयानक व्याधीने ग्रस्त होते. मूळव्याधीमध्ये शौचाच्या जागी कोंब असणे व शौचावाटे रक्त पडणे असे दोन प्रकार असतात.
2) आम्लपित्त - आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी. छाती व घशामध्ये जळजळ, तोंड कडू वा आंबट होणे, मळमळ, उलटी, डोके दुखणे, पोटशूळ अशी लक्षणे दिसतात. आम्लपित्ताचा त्रास सतत होत राहिल्यास पित्ताच्या तीक्ष्ण गुणामुळे आमांश व लहान आतड्याच्या ठिकाणी व्रण उठतात. यामध्ये पोटामध्ये तीव्र प्रमाणात दुखते.
3) आमांश - पोटामध्ये मुरडा होऊन व फार कुंथूनही केवळ चिकट शौचास होणे याला आमांश/आव पडणे म्हणतात. यामध्ये रोग्यास सतत शौचाची भावना होते. जेवल्यानंतर लगेच शौचास जावे लागते. शौचास जाऊन आल्यानंतरही समाधान होत नाही.
4) यकृत विकार - आमांशाचा त्रास सतत होत राहिल्यास त्याचा यकृतावरही परिणाम दिसून येतो. कावीळ, जलोदर, लिव्हर सिरॉसिस हे प्रामुख्याने आढळणारे यकृत विकार आहेत. पोटामध्ये पाणी साठणे, त्यामुळे पोटाचा आकार मोठा होणे, सतत तहान लागणे, भूक नसणे, चालताना दम लागणे, हातापायांमध्ये थकवा येणे, तोंडावर व पायावर सूज येणे अशी लक्षणे जलोदरामध्ये दिसतात.
5) पित्ताशयात खडे - यकृतामधून स्रवणारे पित्त हे पित्ताशयामध्ये साठते. तेथून ते अन्नपचनाच्या वेळी लहान आतड्यांमध्ये येते. या पित्तामधील द्रवता कमी झाल्यास पित्ताशयामध्येच पित्ताचे खडे बनतात. पोटामध्ये उजव्या बरगड्यांखाली दुखणे व पोट सतत फुगल्यासारखे वाटणे अशी लक्षणे यामध्ये दिसतात. अपेंडीसायटिस, पॅंक्रियाहायटिस यांचाही पोटाच्या विकारांमध्ये समावेश होतो.
6) ग्रहणी - अग्नीची पचन करण्याची शक्तीच कमी झाल्यामुळे किंवा ग्रहणी अवयवाची सारकिट्टूविभजन प्रक्रियाच व्यवस्थित न झाल्यामुळे अशा रुग्णास पुढे ग्रहणी/संग्रहणी हा आजार उद्भवतो. यामध्ये कधी जुलाब तर कधी मलावरोध किंवा सतत जुलाब होणे, जेवल्याबरोबर शौचास लागणे, सतत तोंड येणे, ताप, कमालीची अशक्तता, अंग जड वाटणे, पोटात दुखणे, आव पडणे, मळमळ, अनुत्साह, कधी कधी शौचावाटे रक्त पडणे अशी लक्षणे या आजारांमध्ये दिसतात.
डॉ. सत्यन गुजर