आला पावसाळा... त्वचेला सांभाळा!
-
Friday, August 03, 2012 AT 02:15 AM (IST)
शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे परिश्रमांवर मांगल्याचे शिंपण करणारा मित्रच. पाऊस-पाण्याची तमा न बाळगता शेतकरी वर्ग अतिशय आनंदाने शेतीच्या कामांमध्ये स्वत:ला झोकून देतो. पण पावसाळा फक्त उल्हास आणि तजेलाच घेऊन येतो असे नाही.... तर तो घेऊन येतो अनेक प्रकारचे त्वचारोग आणि आजारपणसुद्धा. या आजारांवर मात केल्यास आपण शेतीची कामेही नीट करू शकतो आणि सुखद पावसाचा आनंदही घेऊ शकतो.
डॉ. अमित करकरे
चिखल्या (कॅन्डीडा) - पावसाळ्यात सर्वांत जास्त त्रास देणारा त्वचाविकार म्हणजे बुरशी-संसर्ग. कॅन्डीडा हा बुरशीच्या कुटुंबातील जंतू आपल्या त्वचेवर थोड्याफार प्रमाणात वर्षभर हजर असतो. पावसाळ्याच्या दिवसांत एक तर हवेतील आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या सततच्या घामामुळे त्वचा ओलसर राहिल्याने त्याच्या संख्येत बेसुमार वाढ होते. विशेषतः शरीराच्या घडी पडणाऱ्या भागात जसे जांघेत, गुडघ्याच्या मागे, कंबरपट्ट्याचा भाग, काख आणि मुख्यत्वे करून पायाच्या बोटांमध्ये याची वाढ सर्वांत जास्त प्रमाणात होते. बोलीभाषेत आपण याला चिखल्या असे म्हणतो. दोन बोटांच्या मध्ये खाज येते, लाल होते, प्रसंगी त्वचा फाटल्यासारखीसुद्धा होते. बुरशीचा प्रादुर्भाव घालविणारी पावडर सतत त्या त्वचेवर टाकत राहिल्याने जंतूंची वाढ थांबते, जखम कोरडी राहते आणि खाज आटोक्यात येते.
नायटा -
बुरशी आणि जिवाणू यांच्या संयुक्त संसर्गातून पायाच्या त्वचेचा होणारा हा आजार सर्वांत जास्त लोकांमध्ये दिसून येतो. ज्या लोकांचे पाय जास्तीत जास्त वेळ पाण्यात बुडालेले असतात (जसे भात लावणीच्या वेळी) अशांमध्ये याचा विशेष प्रादुर्भाव आढळून येतो. हा आजार अतिशय वेगाने पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांपैकी आहे. याने बाधित व्यक्ती ज्या पाण्यात उभी असेल त्याच पाण्यात उभे राहून आपण शेतीचे काम करीत असू, तर त्याची लागण आपल्यालाही होऊ शकते. एखादा संसर्ग झाल्यावर पायावरील त्वचा लालसर होऊन त्याचे फुगीर चट्टे निर्माण होतात. याला प्रचंड प्रमाणात खाज सुटते आणि त्यात जिवाणूंचा संसर्ग झाल्यास पू सुद्धा होऊ शकतो. अगदी अंगाला लागून राहणारे घट्ट कपडे/ पायमोजे घातल्याने घर्षण होऊन यात वाढ होतेच, पण कपड्यांमार्फत इतरांना संसर्ग होण्याची शक्यतासुद्धा वाढते.
केस आणि डोक्याच्या त्वचेवर होणारे परिणाम : डोक्यावरील केस व त्याखालील त्वचासुद्धा या काळात अत्यंत नाजूक बनते. भिजून आल्यावर डोके कोरडे न केल्यास डोक्यावरही बुरशीच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. ज्यांना कोंडा होण्याची सवय आहे, अशा प्रकृतीच्या माणसांना तर याचा नेहमीच त्रास होतो. डोक्यात प्रचंड खाज सुटते, जिवाणूंचा हल्ला झाल्यास डोक्यात पू असलेले बारीक-बारीक फोड येतात व त्यातून खाजवल्यास रक्तही येऊ शकते. कोंडा आणि जास्त प्रमाणात निर्माण होणारी मृत त्वचा यांमुळे घट्ट पोपडे पडल्यासारखे डोक्यात पिवळसर रंगाचे कीटण जमा व्हायला लागते. त्याला एक प्रकारचा घाणेरडा वास येतो. भांग पाडणे मुश्कील व्हायला लागते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे केस अतिप्रचंड प्रमाणात गळू लागतात. याकरिता केस/ डोके सतत कोरडे ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
मधुमेही व्यक्तींनी घ्यावी विशेष काळजी :
ज्या व्यक्तींना डायबेटिस (मधुमेह) आहे त्यांनी तर पायांची विशेष काळजी घ्यायला हवी. रोज न चुकता पायाचा कोपरा अन् कोपरा निरखून पाहावा. जेणेकरून छोटीशी जखमही अगदी पहिल्या अवस्थेत लक्षात येईल. अशा व्यक्तींच्या पायांतील संवेदना कमी झालेल्या असतात व त्यामुळे जखम झाल्याचे दुःख जाणवत नाही. न दुखल्यामुळे बरेच दिवस जखम लक्षातही येत नाही आणि त्या जखमेत माती, चिखल आणि घाम साचून हमखास जंतुसंसर्ग होतो. वेळीच काळजी न घेतल्यास गॅंगरीन होऊन पायाचा काही भाग कापून टाकण्याची वेळ येऊ शकते. हे टाळण्यासासाठी रोज घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवावेत. मऊ सुती कापडाने नीट कोरडे करावेत. बोटांच्या फटीतील पाणी नीट टिपून घ्यावे. डॉक्टरांच्या शिफारशीनुसार औषध एका कापसावर घेऊन त्याचा हलका हात पायांवरून फिरवावा जेणेकरून छोटीशी जखम असल्यास त्यावर प्रतिबंध होईल. जखम झाली असल्यास डॉक्टरांकडून इलाज करून घ्यावा. जखमा लवकर भरण्यासाठी हळदही अत्यंत गुणकारी ठरते.
पावसाळ्यात घ्या त्वचेची काळजी -
पावसाळा म्हटलं, की शेतीच्या कामानिमित्त भिजणं आलंच. सततच्या भिजण्यामुळे होणारे त्वचाविकार टाळण्यासाठी काही साधे उपाय आपण नक्कीच करू शकतो. अगदी काही मिनिटे लागणाऱ्या या गोष्टी नियमित केल्यामुळे जवळपास 80 ते 90 टक्के त्वचारोग आपण टाळू शकतो.
1) आपल्यासोबत संपूर्ण कोरड्या झालेल्या कपड्यांची एक जोडी सतत बाळगा. शेतातील काम संपल्यानंतर लगेच स्वच्छ होऊन कोरडे कपडे घाला. जेणेकरून आपल्या दमट कपड्यात फार वेळ राहावे लागणार नाही.
2) ओल्या चपला वापरल्याने पायांच्या बोटांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात शक्यतो प्लॅस्टिकच्या चपला वापराव्यात. कारण त्या पुसून कोरड्या करता येतात.
3) बूट वापरण्यापेक्षा चपला वापरणे जास्त सोयीचे असते. बंद बुटाच्या दमटपणात पाय कोंडलेले राहतात. पाय कोरडे असणे हे त्वचारोग टाळण्याचा सर्वांत सोपा उपाय आहे.
4) सॉक्स किंवा बूट घालण्याचे प्रसंग आल्यास पाय दमट राहून घाम येण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी क्लोट्रायमाझोल असलेली औषधी पावडर बूट घालण्याआधी मुबलक स्वरूपात पायाला लावावी, जेणेकरून घाम आणि त्यामुळे साचणारे धूलिकण यांना प्रतिबंध होऊ शकेल.
4) मातीतून, चिखलातून अथवा पाण्यातून काम करून आल्यावर अंघोळ करताना फक्त साबण बरोबरच अंग घासायच्या दगडाने त्वचा स्वच्छ करावी. त्यामुळे त्वचेच्या फटींमध्ये, भेगांत व सुरकुत्यांत लपलेले जंतू-कण निघून जाण्यास मदत होते.
5) पाय स्वच्छ घासून धुतल्यावर थोडे कोमट पाणी घेऊन त्यात दोन झाकणे शिफारशीत जंतुनाशक टाकून त्यात पाय 10 मिनिटे बुडवून ठेवावेत. यामुळे त्वचा निर्जंतुक होते.
7) अगदी अंगाला घट्ट चिकटून बसणारे कपडे शक्यतो टाळावेत. मोकळे कपडे वापरल्याने हवा खेळती राहून त्वचा कोरडी राहण्यास होते.
8) या काळात अंतर्वस्त्रांनासुद्धा इस्त्री करावी. त्यामुळे दमटपणा तर जातोच पण कडक इस्त्रीच्या त्या उष्णतेमुळे कपड्यांवर वाढू लागलेले जंतूही मरून जातात.
9) पायाची आणि हाताची नखे कापावीत. त्यात माती अडकून जंतूंची वाढ सतत होत असते. यामुळे नख-विष बांधण्याचा धोका संभवतो.
10) जाहिरातीत दाखविलेल्या मलमांचा परस्पर वापर करू नये. आपण केलेल्या अंदाजापेक्षा वैद्यकीय निदान वेगळे असू शकते. थोडीसुद्धा शंका वाटल्यास जवळच्या दवाखान्यात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.