Last Update:
 
मुख्य पान

डासांवर ठेवा नियंत्रण
-
Friday, August 03, 2012 AT 02:15 AM (IST)
Tags: agro special
साचलेल्या पाण्यात तसेच पाण्यातील वनस्पतींवर डासांच्या माद्या अंडी घालतात. डास चावल्यास विविध रोगजंतूंचे संक्रमण होते. डासांपासून प्राण्यांपासून मानवास होणाऱ्या आजारांचा प्रसार होतो. हे लक्षात घेऊन सामुदायिक स्तरावर डासांचे नियंत्रण केल्यास आजारांपासून सर्वांचीच सुटका होईल.
डॉ. आर. पी. कोल्हे, डॉ. एस. एच. सुरकर, डॉ. पी. डी. देशपांडे

1) मलेरिया -
ऍनोफिलीस जातीच्या डासांपासून मलेरियाचा प्रसार होतो. मलेरियाचा प्रादुर्भाव जुलै ते नोव्हेंबर महिन्यांत जास्त असतो. डासांच्या चावण्याव्यतिरिक्त मलेरियाबाधित रक्तपुरवठ्यातून सुद्धा याचा प्रसार होतो. वेळीच निदान व उपचार केल्यास आजार खात्रीशीर बरा होतो.
लक्षणे - थंडी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, घाम येतो. आजाराची लक्षणे दिसण्याचा काळ 12 ते 14 दिवस असतो.

2) डेंग्यू -
हा आजार एडीस इजिप्तीआ नावाच्या डासांपासून पसरतो. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. लक्षणांवरून तीन प्रकारात याचे वर्गीकरण होते, अ) डेंग्यू ताप ब) डेंग्यू हिमोरहेजीक ताप आणि क) डेंग्यू शॉक. मनुष्य-डास-मनुष्य असे डेंग्यूचे संक्रमणचक्र आहे. संक्रमित मनुष्याच्या रक्तातून हे विषाणू डासांमध्ये जातात, त्यांच्या लाळग्रंथींमध्ये वाढतात आणि पुन्हा अशा डासांच्या चावल्याने रोगप्रसार होतो. "डेंग्यू होमोरहेजीस ताप' हा प्रकार जास्त घातक आहे. यात साध्या डेंग्यू तापापेक्षा अधिक तीव्र ताप असतो. आजाराचा तिसरा प्रकार म्हणजे "डेंग्यू शॉक' हा गंभीर आजार आहे. यामध्ये रक्तदाब कमी होतो. डेंग्यूची लक्षणे आढळल्यास कुठलाही घरगुती उपाय न करता तातडीने वैद्यकीय उपचार करावेत.
लक्षणे - अचानक थंडी लागणे, अति ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू व सांधे दुखी, डोळ्यांत दुखणे, बद्धकोष्ठता, भूक न लागणे, पोटदुखी, पोटाचे स्नायू ताठरणे यासारखी लक्षणे दिसतात. कधी कधी शरीरावर व्रण उठतात. आजाराची लक्षणे दिसण्यास 3 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो.

3) हत्तीपाय (फिल्गरीआसिस) -
क्‍युलेक्‍स, एडीस, मानसोनी, ऍनोफिलीस इ. जातींचे डास या रोगप्रसार करतात. वृचेरीआ बॅनक्रोफ्टी, बृगी मालाय आणि बृगी टीमोरी नावाच्या परजीवींपासून डासांद्वारे हा आजार मनुष्यास होतो. शरीरातील लिंफ संस्थेला बाधित करण्याचे काम हे परजीवी करतात. सर्व वयोगटांतील माणसांना हा आजार होऊ शकतो.
लक्षणे - लिंफ संस्थेतील अडवणुकीमुळे सूज निर्माण होऊन पाय जाड झालेले दिसतात. यालाच हत्तीपाय रोग म्हणतात. लक्षणे दिसण्याचा काळ 8 ते 16 महिन्यांचा असू शकतो.

4) चिकनगुनिया -
एडीस इजिप्ताय, एडीस अल्बोपिक्तस नावाच्या डासांपासून हा आजार पसरतो. चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार आहे. वैद्यकीय निदान आणि उपचाराद्वारे सहज बरा होतो.
लक्षणे - ताप, सर्दी, डोकेदुखी, स्नायू आणि जोडांमध्ये तीव्र वेदना होतात. सांध्यामध्ये सूज येते. लक्षणे दिसण्याचा काळ चार ते सात दिवस असतो.

5) जपानी मेंदूज्वर -
हा जापनीज एनसेफालायटिस नावाच्या विषाणूपासून होणारा प्रमुख झुनेटिक आजार आहे. क्‍युलेक्‍स ट्रायटानिओरिंक्‍स नावाचे डास रोगप्रसारास मुख्य कारण आहेत. वराह आणि पाणपक्षी उदा. बगळे हे या विषाणूंच्या उत्पत्तीचे प्रमुख स्रोत आहेत. संक्रमित डास मनुष्यास चावल्यामुळे हा आजार होतो. साधारणपणे 3-14 वर्षातील मुलांना हा आजार जास्त होतो. माणसांमध्ये केंद्रीय मज्जासंस्थेवर या आजाराचा परिणाम होतो. बरेचदा योग्य अचूक निदानाअभावी उपचार अपयशी ठरतात. या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे लसीकरण होय. एकापासून दुसऱ्या माणसास हा आजार होत नाही.
लक्षणे - ताप, चक्कर, एनसेफालायटिस, पॉरालीसिस, झटके येतात. 4-14 दिवस विषाणूंची लागण झाल्यानंतर आजाराची लक्षणे दिसायला लागतात.

6) वेस्ट नाईल -
हा आजार जपानी मेंदुज्वराप्रमाणेच विषाणूजन्य असून, क्‍युलेक्‍स जातीच्या डासांपासून होतो. माणसांव्यतिरिक्त अनेक पशुपक्षी आणि कोंबड्यांमध्ये विषाणू संक्रमण होऊ शकते. आपल्याकडे या आजाराचा प्रादुर्भाव आढळला नाही, परंतु पक्ष्यांमधील तसेच काही प्राण्यांच्या सिरमीय परीक्षणातून वेस्टनाईल विषाणू भारतात असल्याचे सिद्ध झाले.
लक्षणे - ताप, डोकेदुखी, चक्कर येते. आजाराची लक्षणे दिसण्याचा काळ तीन ते सहा दिवस असतो.

...असे करा डासांचे नियंत्रण -
डास नियंत्रणासाठी अनेक पद्धती अवलंबिल्या जातात, परंतु पूर्णतः नियंत्रण होत नाही. आपण डास नियंत्रण करताना त्यांच्या प्रजनन स्थळांवर रसायने फवारून डास नियंत्रण करतो. परंतु काही दिवसांनी, त्याच ठिकाणी डासांची पुन्हा उत्पत्ती होते. त्यामुळे फक्त रसायने न फवारता डासांच्या प्रजननाच्या जागा नष्ट करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, गटारे नेहमी स्वच्छ ठेवावीत. पाण्याचे स्रोत नेहमी झाकलेले असावेत, जेणेकरून डासांचे प्रजनन होणार नाही. रासायनिक पद्धतीमध्ये मिनरल तेल, पॅरिसग्रीन आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो.
1) पॅरिसग्रीन - पॅरिसग्रीन अथवा कॉपर ऍसिटोअर्सेनाईट ही हिरव्या रंगाची पावडर पाण्यात विरघळत नाही. डासांच्या आळ्या ही पावडर खातात आणि विषबाधेमुळे नष्ट होतात. डास नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दोन किलो पॅरिसग्रीन 98 किलो चुन्याच्या भुकटीत मिसळून त्याची फवारणी डासांच्या प्रजनन स्थळांवर करावी. एक किलो पॅरिसग्रीन एक हेक्‍टर जागेसाठी पुरेसे आहे. या प्रमाणात फवारणी केल्यास मानव, मासे अथवा प्राण्यांना कुठलीही हानी नसते.
2) रासायनिक घटकांचा वापर - फेनीथ्रिऑन, क्‍लोरपायरिफॉस आणि टेमोफॉस ही रसायने डासांच्या आळ्या मारण्यासाठी वापरतात. डी.डी.टी. आणि एच.सी.एच. ही रसायने जास्त काळ वातावरणात राहिल्याने जलप्रदूषण होते. त्यामुळे यांचा वापर टाळावा.
3) जैविक नियंत्रण - पाण्यातील डासांच्या नियंत्रणाकरिता गप्पी मासे उपयुक्त ठरतात.

मॅलाथिऑन, प्रोपॉक्‍झर या रसायनांची वातावरणात फवारणी करून मोठ्या डासांवर नियंत्रण करता येते. आणखी काही उपाययोजनांवर संशोधन सुरू आहे, यामध्ये प्रजननास असक्षम डासांची (स्टराईल मेल मॉस्क्‍यूटो) निर्मिती करण्यात येत आहे. घरगुती उपाययोजनांमध्ये डास रोधक स्प्रे, मच्छरदाणी, क्रीमचा वापर करावा. त्यामुळे घरात असलेल्या डासांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळते.

डास नियंत्रणासाठी रसायने वापरण्याचे प्रमाण :
1) फेनथिऑन 22-112 ग्रॅम/हेक्‍टर
2) क्‍लोरपायरिफॉस 11-16 ग्रॅम/हेक्‍टर
3) टेमोफॉस 56-112 ग्रॅम/हेक्‍टर
4) मॅलाथिऑन 2 ग्रॅम/मी 2
5) प्रॉपॉक्‍झर 2 ग्रॅम/मी 2
टीप : वरील रसायनांची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी.

संपर्क : डॉ. आर. पी. कोल्हे : 9860196201
02169-244214.
(लेखक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: