Last Update:
 
ऍग्रो गाईड

हिरवळीच्या खतासाठी कोणती पिके निवडावीत?
-
Saturday, August 04, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: agro guide

- एस.डी. पाटील, येवला,जि.नाशिक
सें द्रिय खतात, शेणखत, कंपोस्ट, खाद्य अखाद्य पेंडी, गांडूळ खत इत्यादीचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खते पिकांना जास्त प्रमाणात लागतात. परंतु आपण त्याचप्रमाणात देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणे काळाची गरज आहे. जमिनीमध्ये वनस्पतीची हिरवी पाने किंवा जमिनीमध्ये हिरवी पिके वाढवून पीक फुलोऱ्यात असताना त्याच जमिनीमध्ये नांगरणीच्यावेळी गाडतात.

हिरवळीच्या खताचे प्रकार
जागच्याजागी वाढविलेले हिरवळीचे खत - हिरवळीच्या खतासाठी ताग, धैंचा, मूग, गवार, चवळी, ज्वारी, मका, सूर्यफूल, बरसीम या पिकांची निवड केली जाते. ही पिके मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून लावतात. पीक फुलावर येण्याअगोदर जमिनीमध्ये गाडतात. हिरवळीच्या खतासाठी द्विदल पिकाची निवड करावी, कारण त्याच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीतील जिवाणू हवेतील नत्र स्थिर करून ठेवतात. ही पिके कमी पाण्यावर येणारी असावीत, त्याची मुळे खोल जाणारी असावीत. हिरवळीच्या पिकापासून जास्तीत जास्त हिरवी पाने मिळावीत, पिकांचे अवशेष जमिनीमध्ये लवकरात लवकर कुजणारे असावेत. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते.

ताग - तागाचे बियाणे हेक्‍टरी 50 ते 60 किलो लागते. हे शेतात पावसाळ्याच्या अगोदर पेरावे. साधारणपणे 40 ते 50 दिवसांत (पीक फुलोऱ्यात अगोदर) 100 ते 120 सें.मी. पिकाची वाढ झाल्यावर जमिनीत गाडतात. त्यामुळे जमिनीत हेक्‍टरी 70 ते 80 किलो नत्र वाढते. या खताचा भात पिकासाठी वापर केल्यास उत्पादनात 60 ते 80 टक्के वाढ होते.
धैंचा - हे एक हिरवळीचे उत्तम पीक आहे. हे पीक क्षारपड जमिनीमध्ये आणि भात पिकांमध्ये घेता येते. त्यामध्ये नत्राचे प्रमाण 0.42 टक्के आहे. हे पीक जमिनीत गाडल्यानंतर पिकास हेक्‍टरी 60 ते 70 किलो नत्र मिळतो. त्यासाठी साधारण 20 ते 40 किलो बियाणे प्रति हेक्‍टरी पेरून पिकाची वाढ तीन चे चार फूट उंची झाल्यावर 40 ते 50 दिवसांत जमिनीमध्ये गाडतात. धैंचाचे हिरवळीचे खत वापरल्यामुळे भात उत्पादनात 20 टन वाढ दिसून आलेली आहे.

हिरव्या कोवळ्या पानांचे खत
ग्लिरिसिडीया, शेवरी, करंज, जंगली धैंचा, सुबाभूळ इत्यादी झुडपे आणि झाडांचा समावेश असून या झुडपाचा आणि झाडांची हिरवी पाने, फांद्या (कुजण्यासाठी योग्य असणारी) जमिनीत पसरून नांगरणीच्या वेळी गाडतात. ही झाडे आणि झुडपे शेताच्या बांधावर आणि पडीक जमिनीत लावून हिरवळीच्या खतासाठी वापर करावा.

हिरवळीच्या खतांमुळे होणारे फायदे
-जमिनीच्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रामुख्याने जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मात बदल होतो. सेंद्रिय पदार्थ वाढल्यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्म जीवजंतूंची वाढ होते. जमिनीची जडणघडण योग्य होऊन जमिनीची जलधारणाशक्ती वाढते जमिनीची धूप कमी होते.
-रासायनिक गुणधर्मामध्ये जमिनीची पोत सुधारून स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅंगेनीज, लोह इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
-द्विदल हिरवळीचे पीक घेतल्याने जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढते. हा नत्र पुढील पिकास उपलब्ध होतो.
-हिरवळीची पिके ही अन्नद्रव्ये जमिनीच्या खालच्या थरातून घेतात आणि गाडल्यानंतर त्यातील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात.
-द्विदल पिके मातीचे कण घट्ट धरून ही पिके शेतात उभी असताना जोराचा पाऊस आला तर मातीची कमी प्रमाणात धूप होते. मात्र तृणवर्गीय पिकातून पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाते.
: श्री. कांबळे, 8275376948
कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,
जिल्हा सांगली


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: