कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता द्यावा
-
Tuesday, August 07, 2012 AT 03:30 AM (IST)
कोल्हापूर (प्रतिनिधी) : साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होताना साखरेचे दर कमी होते, तरीही कारखान्यांनी पहिला हप्ता चांगला दिला. सध्या साखरेचे दर वाढत असल्याने साखर कारखान्यांनी गेल्या गळितातील दुसरा हप्ता देण्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. 5) येथे पत्रकारांशी बोलताना केले. यंदा राज्यात उसाचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे 2012-2013 च्या गळीत हंगामात उसाला चांगला दर मिळणार याची खात्रीही श्री. पवार यांनी व्यक्त केली.
श्री. पवार म्हणाले, ""गेल्या वर्षीचा (2011-12) गळीत हंगाम सुरू करताना कारखान्यांनी प्रति टन उसाला चांगला दर जाहीर केला. अनेक कारखान्यांनी प्रति टन उसाला ठरलेला हप्ता दिला आहे; मात्र याच वेळी साखरेचे दर कमी असल्याने अनेक कारखान्यांना ठरलेला दरही देता आला नाही. सध्या साखरेच्या दरात वाढ होत आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी उसाला चांगला दर मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे राज्यासह देशातील उसाला मोठा फटका बसला आहे, त्यामुळे उपलब्ध उसाला जादा दर देऊनच तो खरेदी करावा लागणार असल्याची जाणीव खासगी कारखान्यांसह सहकारी कारखान्यांनाही ठेवावी लागणार आहे. जो कारखाना जादा दर देईल त्याच कारखान्याला शेतकरी ऊस देतील, अशी शेतकऱ्यांचीही मानसिकता झाल्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात उसाला चांगला दर देण्याशिवाय पर्याय राहणार नाही.''
देशासह महाराष्ट्रात ऊस उत्पादनात घट झाली; मात्र कोल्हापूर विभागात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढले असल्याचेही त्यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.