कोल्हापुरात पालेभाज्यांची आवक वाढली
-
Tuesday, August 07, 2012 AT 03:00 AM (IST)
राजकुमार चौगुले
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवी (ओली) मिरची, ढोबळी मिरची, गवारीचे दर तेजीत राहिले. वांगी, टोमॅटोची वाढलेली आवक या सप्ताहातही कायम राहिली. पालेभाज्यांची आवक देखील वाढली होती. त्यात विशेष करून कोथिंबीर, मेथीच्या आवकेत सातत्य होते. कोथिंबिरीची 20 ते 22 हजार, तर मेथीची 24 ते 25 हजार पेंढ्यांची आवक होती. कोथिंबीर व मेथीस शेकडा 200 ते 500 रुपये दर मिळाला. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर चिकू, सीताफळ, डाळिंबाची आवक सातत्यपूर्ण होती.
या सप्ताहात बहुतांशी ठिकाणी पावसाच्या सरी झाल्या; पण भाजीपाला उत्पादक प्रदेशात जोरदार पाऊस नसल्याने भाजीपाल्याच्या काढणीत फारसा अडथळा आला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. येथील बाजार समितीत जिल्ह्याचा पूर्व भाग, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागासह कर्नाटकच्या उत्तर भागातून भाजीपाल्याची दैनंदिन आवक होते. या भागात पावसाचे प्रमाण कमी होते. यामुळे पालेभाज्यांच्या काढणीवरही फारसा परिणाम झाला नाही. यामुळेच वांगी, टोमॅटोसारख्या फळभाज्यांची आवक या सप्ताहात वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
बाजार समितीत कांद्याची आवक स्थिर आहे. या सप्ताहात दररोज चार ते पाच हजार पोती कांद्याची आवक झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याच्या लागवडीवर परिणाम होणार आहे. सध्या बाजार समितीत येणारा कांदा हा शिलकी आहे. सातारा, पुणे भागातून कांद्याची आवक होत आहे. कांद्यास 30 ते 85 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.
फळांमध्ये चिकू, सीताफळ, डाळिंबाची आवक सातत्यपूर्ण आहे. चिकूची दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. चिकूस शेकडा 50 ते 550 रुपये दर मिळाला. सोलापूर भागातून डाळिंबाची दररोज एक ते तीन हजार डझनांची आवक झाली. डाळिंबास डझनास 65 ते 350 रुपये दर होता. सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागातून डाळिंबाची काही प्रमाणात आवक सुरू आहे. पेरूची दररोज वीस ते पंचवीस डाग आवक झाली. पेरूस शेकडा 200 ते 450 रुपये दर होता. तासगाव भागातून सीताफळाची दोनशे ते तीनशे डझन आवक होती. पन्नास नगांच्या सीताफळांच्या ढिगास 80 ते 1050 रुपये भाव मिळाला.