Last Update:
 
राज्य

सांगली जिल्ह्यातील चारा डेपो आजपासून बंद
-
Tuesday, August 07, 2012 AT 02:15 AM (IST)

सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेले चारा डेपो मंगळवार (ता. 7)पासून बंद करण्याचे पुरवठादारांनी चारा डेपो चालकांना सांगितले आहे; मात्र अद्यापही दुष्काळी पट्ट्यात चाऱ्याची उपलब्धता होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरे कशी जगवायची, असा प्रश्‍न आहे.

जिल्ह्यात गतवर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे दहापैकी आठ तालुक्‍यांत टंचाई जाहीर करण्यात आली. टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर वाड्या-वस्त्यांवर टॅंकर सुरू करण्यात आले. चारा डेपो आणि छावण्याही सुरू करण्यात आल्या. टंचाईची मुदत 31 जुलैपर्यंत होती. यात आठवड्याची वाढ करीत ती 7 ऑगस्टपर्यंत नेली.

दरम्यान, टंचाईची मुदत आज संपणार असल्यामुळे पुढे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. अद्यापही दुष्काळी पट्ट्यात पाऊस नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे; परंतु टंचाईची मुदत संपल्याचे कारण पुढे करून काही पुरवठादारांनी चारा डेपो चालकांना चारा देण्यास असमर्थता दर्शवीत डेपो बंद करण्यास सांगितले आहे. दुष्काळी भागात अद्यापही चारा उपलब्ध नसल्यामुळे पशुधन वाचवण्याची अडचण शेतकऱ्यांपुढे आहे.

...तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरे बांधू
चारा डेपो बंद करण्याच्या हालचालीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी संघटनेचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष अशोक माने म्हणाले, की दुष्काळी भागात चाऱ्याचा प्रश्‍न अद्यापही गंभीर आहे. डेपो बंद करण्यात येऊ नयेत. डेपो बंद केले तर जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून बांधली जातील.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: