Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

तीव्र पाणीटंचाईतही पिके जगवण्यासाठी प्रयत्न
-
Friday, August 10, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: agro special

जयराम सुपेकर

शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. वेळेवर पाऊस नाही, खते उपलब्ध होत नाहीत, मजूर मिळत नाही. बाजारभावाचा भरवसा नसल्याने उत्पन्न समाधानकारक नाही. अशी काहीशी परिस्थिती. मात्र, हिंमत हारतील ते शेतकरी कसले? कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारे जिगरबाज शेतकरी असतातच. पुणे जिल्ह्यातील कुतवळवाडी (ता. बारामती) या जिरायती, दुष्काळी पट्ट्यातील धाडसी व कल्पक शेतकरी कुंडलिक दत्तात्रेय कुतवळ यांचे उदाहरण असेच म्हणावे लागेल. तीव्र पाणीटंचाई स्थितीत अत्यंत कमी पाण्यावर त्यांनी आपली पिके जगवण्याचा प्रयत्न केला आहे. कुतवळ म्हणाले, की गेल्या दोन वर्षांत आमच्या भागात पाऊसच पडलेला नाही, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. उपलब्ध स्रोतांमधून शेती पिकवण्याची धडपड सुरू आहे. पिण्यासाठीही आमच्या भागात पाणी नाही.

सध्या कुतवळवाडीत पाण्यासाठी शासनाचा टॅंकर येतो. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. कुतवळ यांनी आपल्या विंधन विहिरीतून मिळणाऱ्या पाण्याच्या जोरावर खरबूज, दोडका व मिरचीचे पीक घेतले आहे. सुपे- सासवड (जि. पुणे) मार्गालगत कुतवळवाडीच्या हद्दीत अवघ्या सहा घरांची मचालेवस्ती आहे. या वस्तीवर कुतवळ यांचे सुमारे चार एकर क्षेत्र आहे. पूर्वी घेतलेल्या दोन विंधन विहिरींचे मिळून सध्या रोज सुमारे चार हजार लिटर पाणी त्यांना मिळते. हे पाणी त्यांनी एका गादीसारख्या दिसणाऱ्या सपाट प्लॅस्टिक पेपरच्या टाकीत साठविले आहे. येथे अर्धा अश्वशक्तीचा वीजपंप बसवून त्याद्वारे अर्धा इंच पाइपने हे पाणी त्यांनी उचलले आहे. अर्धा इंची पाइप थेट शेतातील ठिबक सिंचनाच्या पाइपला जोडला आहे. लॅटरल अंथरूण पिकांच्या मुळाला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याची बचत होते. लॅटरलला प्रत्येक ठिकाणी नळ ठेवल्याने पिकाच्या क्षमतेनुसार प्रत्येक ओळीला पाणी सोडता येईल अशी योजना त्यांनी केली आहे. सुरवातीला कुतवळ यांनी रोपवाटिका तयार केली, त्याद्वारे रोपे तयार केली. कुतवळ म्हणाले, की सध्या मिरची, दोडका व कलिंगड ही पिके शेतात उभी आहेत. पाण्याची बचत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेतात प्लॅस्टिकच्या पिशव्याही ठिकठिकाणी पुरल्या आहेत. सुमारे दीड फूट बाय दहा इंच आकाराच्या काळ्या रंगाच्या या प्लॅस्टिक पिशव्या पुणे येथून 65 ते 80 रुपये दराने आणल्या आहेत. अशा सुमारे दोन हजार पिशव्यांचा वापर त्यांनी केला आहे. पिशवीच्या खाली छिद्र पाडले आहे, त्यामुळे शेताला दिलेले पाणी सर्वत्र न पसरता केवळ पिकांच्या अवतीभवती राहील असे त्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांमध्ये खरबुजाचा तोडा सुरू होणार आहे.

याच पद्धतीने जवळच सहा गुंठ्यांत दोडका केला आहे. वेलींच्या वाढीसाठी बांबू, वासे व तारेपासून मांडव तयार केला आहे. या वेलींची वाढ चांगली झाली आहे. त्यापासून सुमारे तीन आठवड्यात मालाचे उत्पादन सुरू होऊन काही हजारांचे उत्पन्न मिळू शकणार आहे. संकरित मिरचीची सुमारे एक हजार रोपे आहेत. शेताच्या जवळच अभयारण्य असल्याने पिकांना हरणांचा त्रास होतो. त्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी कुतवळ यांनी पिकांभोवती माशांची जुनी जाळी टाकली आहे, त्यामुळे कमी खर्चात चांगले कुंपण तयार झाले आहे. रोपवाटिका तयार करून पिशवीत रोपे वाढविली, त्यामुळे पाण्याची बचत झाली, तण उगवले नाही. कुतवळ यांना पत्नी सौ. कमल, मुलगा गणेश, मुलगी माधुरी यांची मोठी मदत मिळते.

संपर्क - 9673502537


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: