कर्मदरिद्रीपणा सोडा!
-
Monday, August 13, 2012 AT 01:45 AM (IST)
राळेगणसिद्धी, हिवरेबाजारसारख्या गावांनी दुष्काळ निवारणात यश मिळविले आहे. हे मॉडेल राज्यभर राबविण्यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधीचा निधीही उपलब्ध केला आहे. तरीही प्रश्न सुटत नाही, दुष्काळ मिटत नाही, असे निराशाजनक चित्र मोसमी पावसासाठी तडफडणारा महाराष्ट्र अनुभवतो आहे.
एखाद्या समस्येवरचे उत्तर नीट ठाऊक आहे, मात्र प्रभावी अंमलबजावणीच्या नावाने रडारड आहे, असे लक्षावधी विषय आपल्या देशात भिजत पडले आहेत. दुष्काळाचे तसेच आहे. गावाच्या पाणलोटाचा विकास, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन, त्याचा व्यावसायिक पद्धतीने तयार केलेला ताळेबंद, पाण्याच्या उधळमाधळ करण्यावर निर्बंध याने दुष्काळावर मात करता येऊ शकते आणि जगभरात तशी उदाहरणे आहेत. आपल्याकडे राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या गावांनी त्यात यश मिळविले आहे. हे मॉडेल राज्यभर राबविण्यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधीचा निधीही उपलब्ध केला आहे. तरीही प्रश्न सुटत नाही, दुष्काळ मिटत नाही असे निराशाजनक चित्र मोसमी पावसासाठी तडफडणारा महाराष्ट्र अनुभवतो आहे. कर्मदरिद्रीपणा म्हणतात तो हाच!
पाऊस पडला की गाव शिवारात कोसळणारे पाणी ओढ्या, वगळीतून वाहत नद्यांना जाऊन मिळते. तिथून ते धरणांत किंवा समुद्रालाच अर्पण होते. हे पाणी वाहून जाऊ द्यायचे आणि पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी द्या, म्हणून सरकारकडे तोंड वेंगडायचे या परावलंबी प्रवृत्तीनेच घात केला आहे. गावाचा विकास त्यामुळेच थबकला आहे. गावात रोजगार न उरल्याने रिकाम्या हातांनी शहरांकडे धाव घेतली आहे. त्यातून झोपडपट्ट्या, वाहतुकीवरील ताण, गुन्हेगारी असे अनेक प्रश्न तयार झाले आहेत आणि या साऱ्याच्या मुळाशी आहे पाणी!
पाण्याची कमतरता भासणारा भारत हा एकमेव देश या भूतलावर नाही. उलट सर्वाधिक पिण्यायोग्य पाणी असणाऱ्या देशांत आपली गणना होते. पाण्यामध्ये मानवी जीवन बदलण्याची, ते अधिक समृद्ध करण्याची क्षमता आहे. त्याची ही ताकद सगळ्यांनाच ठाऊक आहे. प्रश्न आहे तो पुढाकाराचा, कृतीचा. तिथेच आपले घोडे अडते. गावाच्या शिरावर पडणारे पाणी गावातच अडवले तर अनेक प्रश्न सुटतात. धरणांतून दुरून ते आणायचे म्हटले तर पाणी योजना उभाराव्या लागतात. त्यावर लाखो रुपये खर्चूनही प्रश्न सुटत नाही. ते खेचण्यासाठी लागणारी ऊर्जा, देखभाल असा खर्च कायमस्वरूपी सुरू होतो. शेतीसाठी पुन्हा तसाच खर्च करावा लागतो. हे टाळणे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मात्र त्यासाठी गावात हिवरेबाजारसारखी एकी हवी. गावाने जीव ओवाळून टाकावा असा कर्तृत्ववान, निष्कलंक सरपंच हवा. एक ठाम निर्धार, एक अर्थपूर्ण कृती गाव बदलू शकते. त्यासाठी माणसांनी आधी स्वतःला बदलायला हवे. फूट पाडणाऱ्या राजकारण्यांना खड्यासारखे दूर करायला हवे. पाणी अडविण्यापासून ते पाण्याच्या व्यवस्थापनापर्यंत काटेकोरपणा ठेवायला हवा. हे झाले तर या महाराज्यातील सारी दुष्काळग्रस्त गावे आदर्श होतील.