Last Update:
 
प्रादेशिक

जुलैपूर्वी बोजा टाकलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जवाटप
- (प्रतिनिधी)
Tuesday, August 14, 2012 AT 02:15 AM (IST)
Tags: farmers,   lone,   seeds,   usmanabad

भूम, जि. उस्मानाबाद - सात-बारा उताऱ्यावर 31 जुलैपूर्वी बोजा टाकलेल्या शेतकऱ्यांनाच पीककर्ज देण्याचा निर्णय मराठवाडा ग्रामीण बॅंकेतर्फे घेण्यात आला आहे.

सध्या भूम तालुक्‍यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, बहुतांश शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत चलनाचा तुटवडा झाल्याने नाबार्डकडून तालुक्‍यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांमार्फत पीककर्ज देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तालुक्‍यात बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, मराठवाडा ग्रामीण बॅंकेच्या शाखा आहेत. मराठवाडा ग्रामीण बॅंकेच्या माणकेश्‍वर, भूम, पाथरुड या गावांत शाखा आहेत. नाबार्डच्या आदेशाप्रमाणे या तिन्ही गावांतील शाखांकडे तालुक्‍यातील संलग्न शेतकऱ्यांनी पीककर्ज मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, तलाठी, ग्रामसेवकांचे नाहरकत प्रमाणपत्रेही दाखल केली आहेत.

मराठवाडा ग्रामीण बॅंकेने 31 जुलैपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी सात-बारा उताऱ्यावर बोजा ओढला आहे, अशांनाच पीककर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. 31 जुलैनंतर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार केला जात नाही, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

या संदर्भात मराठवाडा ग्रामीण बॅंकेच्या पाथरुड व माणकेश्‍वर येथील शाखांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की वरिष्ठ कार्यालयाने 31 जुलैपर्यंत सात-बारा उताऱ्यावर बोजा टाकणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करावे, असा आदेश काढला आहे. त्यामुळे 31जुलैनंतर पीक कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बॅंक असमर्थ आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: