"सेंद्रिय'चे घोडे अडलेलेच
-
Wednesday, August 15, 2012 AT 01:45 AM (IST)
राज्यात साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली असल्याचा दावा खात्याकडून केला जात असला तरी त्याला पुष्टी देण्यासारखा कसलाही पुरावा नाही. सेंद्रिय शेतीचा लाभ घेण्याइतकी सक्षमता महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आलेली नाही.
जग झपाट्याने सेंद्रिय खाद्यान्नाकडे वळते आहे. अनेक देश तसेच शेतीमध्ये उतरलेल्या बड्या कंपन्या त्याची दखल घेऊन सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करीत आहेत. सेंद्रिय उत्पादन, त्याचे ब्रॅंडिंग, विपणन अशा अनेक पातळ्यांवर नवनवे मानदंड निर्माण होत आहेत. त्याचा गाजावाजा होत नसला तरी अनेक पातळ्यांवर काही ना काही सुरू आहे. आमीर खानच्या "सत्यमेव जयते' कार्यक्रमामुळे सेंद्रिय खाद्यान्नाकडे लोकांचा ओढा वाढतो आहे, असे सेंद्रिय धान्ये आणि भाज्यांची विक्री करणाऱ्या केंद्र चालकांचे म्हणणे आहे. सेंद्रिय हा काही तरी नवाच प्रकार आहे अशी शहरी लोकांची धारणा झालेली दिसते आहे. या वातावरणाचा लाभ घेण्याइतकी सक्षमता मात्र महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आलेली नाही. असे का होते आहे? या संधीपासून शेतकऱ्याला का वंचित ठेवले जाते आहे? या प्रश्नांची उत्तरे आपल्या धोरणकर्त्यांना देता येणार नाहीत इतका सारा अंधार पसरला आहे.
महाराष्ट्राच्या कृषी खात्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीचा विषय हा अधेमधे चघळण्यापुरता उरला आहे. या राज्यातील हजारो ज्ञात-अज्ञात शेतकरी निष्ठेने सेंद्रिय शेतीच्या पताका खांद्यावर घेऊन वाटचाल करीत असताना कृषी खाते त्याला भरीव पाठिंबा देण्याऐवजी दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानते आहे. सेंद्रिय शेतीचे या राज्यात काय चालू आहे, असा प्रश्न कोणी त्रयस्थाने विचारला तर त्याला नेमके उत्तर देणे कोणालाच शक्य नाही. राज्यात साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली असल्याचा दावा खात्याकडून केला जात असला तरी त्याला पुष्टी देण्यासारखा कसलाही पुरावा आपल्याकडे नाही. या आकडेवारीच्या बळावर खात्याने दिल्लीत जाऊन एक पुरस्कारही पदरात पाडून घेतला असली तरी शेजारी राज्यांपेक्षा या क्षेत्रात आपण खूपच मागे आहोत आणि हे कृषी खात्यातला कोणीही अधिकारी नाकारू शकणार नाही. सेंद्रिय म्हणजे काय, येथपासून अनेक प्रश्नांचा उलगडा आपल्याला झालेला नाही. शेतकरी आपापल्या परीने काही तरी प्रामाणिकपणे करत असले तरी "सेंद्रिय'ची नेमकी व्याख्या त्याच्यापर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे आपण जे करतो तेच खरे सेंद्रिय आणि दुसरा जे करतो ते सेंद्रिय कसे नाही हे सांगण्यातच अनेकांची शक्ती वाया जाते आहे. त्यात काही जणांनी आपली घराणी स्थापन करून बुवाबाजीही सुरू केली आहे. त्यातून सेंद्रियचे अनेक पंथ स्थापन होऊन गोंधळाची नवी व्यवस्था तयार होऊ पाहते आहे. हे थांबवणे सरकारच्याच हातात आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे गवगवा होत असलेले, पण बासनात गुंडाळून ठेवलेले सेंद्रिय शेतीचे धोरण बाहेर काढावे लागेल. आपल्या कृषिमंत्र्यांना तशी प्रेरणा मिळो, अशी अपेक्षा करू या!