Last Update:
 
ऍग्रो प्लस

सेंद्रिय आणि रासायनिक यांचा मेळ हवा
-
Wednesday, August 15, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: agro special

शाश्‍वत शेतीस प्रोत्साहनाची गरज
शेतीतील उत्पन्न वाढविल्याशिवाय ती कोणी करणार नाही आणि शेतीशिवाय देशाची प्रगती अशक्‍य आहे. कृषी उत्पादन वाढविण्याच्या हेतूने हरितक्रांतीच्या दरम्यान सुरू झालेला रासायनिक खतांचा आणि कीडनाशकांचा वापर पुढे वाढत गेला. शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती यांच्याद्वारे सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होऊन जमिनीचे जे आरोग्य जपले जात असे, त्याकडे दुर्लक्ष झाले. मित्रकीटकांची जोपासना होऊन निसर्गतः किडींचे नियंत्रण व्हायचे, तेही कमी झाले.

हरितक्रांतीत अन्नधान्य उत्पादन अनेक पटींनी वाढले; मात्र दुर्लक्षित झालेल्या गोष्टींमुळे उत्पादनवाढीचा दर मात्र कमी झाला. त्याचबरोबर जमीन, पाणी आणि हवा या मूलभूत साधनसंपत्तीचा ऱ्हास झाला. अन्नपदार्थांचा दर्जा खालावला व शेतीच्या उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाली. देशात झालेल्या हरितक्रांतीमुळेच आपले 1950मध्ये असलेले 50 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन आज 250 दशलक्ष टनांपर्यंत पोचले.

त्याचबरोबर फळे, भाजीपाला, दूध, मांस, मासे आणि अंडी यांच्या उत्पादनातही भरीव वाढ झाली. अर्थात, हरितक्रांती काही फक्‍त रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वापरामुळे झाली नाही, तर त्यात अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण, सिंचन क्षेत्रातील वाढ, दुबार पिकांखालील वाढलेले क्षेत्र, मशागत आणि पीक लागवडीचे सुधारित तंत्र यांचाही सिंहाचा वाटा होता. एक हरितक्रांती, श्‍वेतक्रांती किंवा नीलक्रांती झाली म्हणजे आपले सर्व प्रश्‍न सुटले असे मुळीच नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि प्रतिडोई उत्पन्नात होत असलेल्या वाढीमुळे अधिकाधिक सकस आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. यामुळेच अलीकडील काळात जगभरातून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या अन्नपदार्थांची मागणी वाढत आहे. आपण फक्त देशांतर्गत लोकसंख्येचा विचार केला तरी 2030पर्यंत आपल्याला अन्नधान्याचे उत्पादन 355 दशलक्ष टनांपर्यंत, मांस 15 दशलक्ष टन, मासे 16 दशलक्ष टन, अंडी 57 दशलक्ष टन, भाजीपाला 180 दशलक्ष टन आणि दुधाचे उत्पादन 180 दशलक्ष टनांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास न होऊ देता शेतीची उत्पादकता सतत वाढती ठेवावी लागणार आहे.

राज्यात 83 टक्के शेती कोरडवाहू असून, शासनाने कोरडवाहू शेती अभियान राबविण्याचे निश्‍चित केले आहे. त्याद्वारे मृद-जल संधारण, शेततळे, सूक्ष्म सिंचनाद्वारे कोरडवाहू शेतीस किमान संरक्षित सिंचनाची सुविधा पुरविणे, कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, फलोत्पादन, शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण व त्यासाठी आर्थिक स्थैर्य देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. यात सेंद्रिय शेतीचा देखील समावेश असला पाहिजे. त्यासाठी सेंद्रिय निविष्ठा शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याची योजना असावी किंवा शेतकऱ्यांना स्वतः ही निविष्ठा तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. शेतकऱ्यांना जैविक खते रास्त किमतीत उपलब्ध करून द्यावी. याद्वारे त्वरित शंभर टक्के सर्व शेती सेंद्रिय होईल असे नाही; मात्र काही शेतकरी प्रायोगिक स्वरूपात ही शेती करण्यास तयार होतील. आगामी काळात ग्राहकांचा आग्रह सेंद्रियचा राहील. जमीनही चांगली राहणे गरजेचे आहे. एकूण विचार करता सेंद्रिय शेतीचे मार्केटिंग, प्रमाणीकरणाची गरज आहे. शासन, स्वयंसेवी संस्थांनीही त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज
हरितक्रांतीपूर्वी मिश्रशेतीमध्ये मुख्य पिकाबरोबर कडधान्य पिकांचा समावेश होता. सिंचन सुविधा कमी प्रमाणात होत्या, त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि आरोग्य चांगले होते. हरितक्रांती झाल्यानंतर सिंचन सुविधा वाढल्या; तसेच नत्र खतांचा वापर, संकरित वाणांतून उत्पादनात वाढ मिळाली; परंतु या गोष्टींचा कालांतराने अतिरेक होऊन पिकांची उत्पादकता हळूहळू कमी होत गेली. याचे मूळ कारण म्हणजे जमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य. वाढत्या लोकसंख्येबरोबर जमिनीवर वाढत चाललेला भार अबाधित ठेवण्यासाठी आणि जास्त उत्पादनाबरोबर जमिनीची सुपीकता, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी निव्वळ सेंद्रिय किंवा निव्वळ रासायनिक शेती करून भागणार नाही. यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. काळानुरूप पिकांना आवश्‍यक असणारी मुख्य अन्नद्रव्ये तसेच दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्यांची तसेच इतर हितकारक अन्नद्रव्यांची गरज वाढत चालली आहे.

शेतीमध्ये सध्या सेंद्रिय भरखतांचा अपुरा पुरवठा आहे. विकत घ्यावयाचे असल्यास खर्चात वाढ होते. सध्याच्या शेतकऱ्यांकडील शेणखताची प्रत खराब आहे. असे शेणखत जमिनीत मिसळल्यास तणे, हुमणी आणि वाळवीचा प्रादुर्भाव; तसेच अपायकारक बुरशींची वाढ होते. चांगले कुजलेल्या शेणखताचा पुरवठा किंवा त्यापासून तयार केलेल्या गांडूळ खताचा चांगला पर्याय आहे. या सर्वांचा उपयोग हा जमिनीचा जैविक आणि भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी होऊ शकतो. मात्र, हे खत अन्नद्रव्यांचा मुख्य स्रोत होऊ शकत नाही, कारण एक टन शेणखतामध्ये 5.6 किलो नत्र, 3.5 किलो स्फुरद आणि 7.8 किलो पालाश असते. शेतकऱ्याला निव्वळ सेंद्रिय खताद्वारे पिकांचे उत्पादन सुरवातीला कमी येईल, नंतर चार ते पाच वर्षांनी जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारून उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे. केवळ सेंद्रिय शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यास ही शेती परवडणारी नाही; मात्र सेंद्रिय शेतीमुळे क्षारपड जमिनींची सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य पूर्वस्थितीत येईल.

अन्नधान्य उत्पादनाबरोबरच जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. या पद्धतीत सेंद्रिय खते 35 ते 40 टक्के, जैविक खते 10 ते 15 टक्के आणि रासायनिक खतांचा 40 ते 50 टक्के वापर केल्यास जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात. रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होतो. पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल. अपुरा सेंद्रिय खतांचा पुरवठा असलेल्या ठिकाणी हिरवळीची पिके घेऊन जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते. माती परीक्षणानुसार संतुलित अन्नद्रव्यांच्या वापराने जमिनीची सुपीकता टिकते. जमिनीचे आरोग्य सुधारून पिकांच्या उत्पादनात वाढ होते. देशातील कृषी विद्यापीठांत 30 वर्षांच्या प्रयोगाअंती निष्कर्षांतून सिद्ध झाले, की एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले. निव्वळ सेंद्रिय किंवा रासायनिक शेती न करता एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन केल्यास शाश्‍वत उत्पादनात वाढ होऊन जमीन, मानवाचे आरोग्य सुधारेल आणि वातावरणासही फायदा होईल.

डॉ. अजितकुमार देशपांडे, डॉ. अनिल दुरगुडे
मृद्‌ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

सेंद्रिय - रासायनिकच्या समन्वयातून शेती फायदेशीर
आजच्या सेंद्रिय शेतीचा उगम रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांतून झाला आहे. यासाठी पूर्व इतिहास अभ्यासणे गरजेचे आहे. हरितक्रांतीनंतर रासायनिक खतांची उपलब्धता झाली. याच्या वापरातून पीक उत्पादनात वाढ मिळते, हे लक्षात आल्यानंतर जगभर रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. ही उत्पादनपातळी सतत 25 वर्षे मिळत राहिल्याने ही पद्धत स्थिरावली. त्यानंतर मात्र उत्पादनामध्ये घसरण सुरू झाली. मग शेतकऱ्यांनी उत्पादन पातळी राखण्यासाठी शिफारशीपेक्षा जादा प्रमाणात रासायनिक खतांचा वापर सुरू केला. काही काळानंतर त्याचाही उपयोग न झाल्याने शेतकरी भांबावला. त्याच दरम्यान सेंद्रिय शेतीला चालना मिळाली. रासायनिक खते, कीडनाशकांवर मोठ्या प्रमाणात करावा लागणारा खर्च वाचत असेल तर या मार्गाने जाणे उत्तम, या आशेने अनेक जण त्याकडे आकर्षित झाले; परंतु पुढील टप्प्यात घटणारी उत्पादन पातळी पाहिल्यानंतर सुरवातीला ज्या वेगाने शेतकरी या पद्धतीकडे वळले, त्याच वेगाने ते परत जुन्या रासायनिक पद्धतीकडे परत जात असल्याचे चित्र दिसते. गेली 15 वर्षे खासगी यंत्रणांमार्फत सेंद्रिय शेतीचा प्रसार चालू होता. पुढे हेच काम सरकारी (केंद्र व राज्य) पातळीवर सुरू झाले आहे. खरे म्हणजे शेतीचा शास्त्रीयदृष्टीनेच अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे.

पहिल्या काळात पीक उत्पादनात ज्याप्रमाणे वाढ मिळत होती, ती आता का मिळत नाही? या प्रश्‍नाचे उत्तर विज्ञानाच्यादृष्टीने शोधावे. रासायनिक खतातील अन्नांश पिकापर्यंत पोचविण्याचे काम जमिनीतील सूक्ष्म जिवांना करावे लागते. सूक्ष्म जिवांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या वाढीसाठी आणि ते करत असलेल्या कामासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हा कर्ब ज्या प्रमाणात वापरला जातो, त्या प्रमाणात त्याचे पुनर्भरण केले नाही, तर त्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. याचे दुष्परिणाम दिसण्यास किमान 25 वर्षांचा कालावधी जावा लागतो, असे स्पष्ट मत एका शास्त्रज्ञाने आपल्या पुस्तकात मांडले आहे. यानंतर मिळणारे दुष्परिणाम हे रसायनांच्या वापराचे नसून, जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या घटणाऱ्या प्रमाणाचे आहेत, त्यामुळेच सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा आहे. ही गोष्ट लक्षात येण्यासाठी भू-सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय अभ्यासावा. सेंद्रिय पदार्थांचे योग्य पुनर्भरण झाल्यास जमिनीच्या सुपीकतेत कोणतीही घट न होता आजही 1960प्रमाणे अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्‍य आहे, हे प्रत्यक्ष शेतात केलेल्या कामातून आत्मविश्‍वासपूर्वक सांगू शकतो. सेंद्रिय कर्बाच्या व्यवस्थापनाचा प्रचलित मार्ग म्हणजे शेणखत, कंपोस्टचा वापर. ही शेतीतील सर्वांत मोठी चूक आहे, असे मला वाटते. मागील 23 वर्षांच्या काळातील माझ्या अभ्यासाप्रमाणे जमीन सुधारणा करताना प्रथम पीक अवशेषांचे पुनर्भरण, त्यानंतर बिनानांगरणीची शेती आणि आता तणांच्या व्यवस्थापनातून सेंद्रिय कर्बाचे पुनर्भरण या मार्गाने गेल्याने जमिनीची सुपीकता आणि उत्पादनपातळी वाढते. उत्पादनाचा दर्जाही वाढून उत्पादन खर्च घटत चालला आहे. प्रत्येक नव्या पद्धतीचे काही गुण आणि काही दोष असतात. सर्व दोष लगेच लक्षात येत नाहीत, त्यासाठी काही काळ जावा लागतो. दोष लक्षात आल्यानंतर ती पद्धतच बाद ठरविण्यापेक्षा दोष बाजूला करण्याचे काम केले पाहिजे. रासायनिक आणि सेंद्रिय शेती, या दोन्ही पद्धतींतील चांगले गुण एकत्र करून समन्वयित शेती करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे, असे मी गेल्या 25 वर्षांचा शेतीशास्त्राचा अभ्यासक आणि प्रत्यक्ष शेतीतील अनुभवांवरून सांगू शकतो.

- प्र. र. चिपळूणकर, प्रगतिशील शेतकरी, कोल्हापूर

रासायनिक, जैविक, सेंद्रिय असा हवा समन्वय
प्रत्येक वनस्पती अनेक रसायने तयार करणाऱ्या जैवरासायनिक कारखान्यांचा समूह आहे. जीवरसायन निर्मितीसाठी विविध 16 अन्नघटकांचा उपयोग होतो. अनेक वर्षे एकाच जमिनीत विविध पिके घेऊन तिची अन्नद्रव्य पुरवठा क्षमता कमी होत चालली, त्यामुळे शास्त्रज्ञांनी रासायनिक खतांच्या माध्यमातून अन्नघटक पुरविण्याचे शोध लावले, विक्रमी उत्पादन घेण्याचे तंत्र शोधले. अनेक फायदा शेतकऱ्यांना झालाही; परंतु पीक उत्पादनातील काही मूलभूत बाबींकडे मात्र दुर्लक्ष झाले. सेंद्रिय व जैविक खतांकडे दुर्लक्ष करून केवळ रासायनिक खतांद्वारे अन्नपुरवठा करण्याच्या तंत्रज्ञानाचा अवलंब होऊ लागला. परिणामी उत्पादनात घट होऊन आजची अवस्था निर्माण झाली आहे. शाश्‍वत उत्तम प्रतीच्या उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विचार केला पाहिजे. जमिनीच्या सुपीकतेचे प्रकार, मुळांचा विस्तार, कार्य तसेच उत्पादित अन्न पिकातच वेगवेगळ्या भागांत साठण्याचे कार्य आणि हवामानाच्या निरनिराळ्या घटकांचा या बाबींवर होणारा परिणाम यांचा विचार महत्त्वाचा आहे.

जमिनीच्या सुपीकतेचे तीन प्रकार आहेत. यातील भौतिक सुपीकतेचा विचार केल्यास मातीच्या कणांची रचना द्राक्ष घड किंवा एरंडीच्या घडासारखी असते. पिकाची मुळे या कणांतील पोकळीत जाऊन पाण्यात विरघळलेले अन्नघटक शोषतात. हे अन्नघटक शोषण्यासाठी पोकळीत प्राणवायू असणे आवश्‍यक असते. जमिनीची भौतिक सुपीकता वाढविणे व ती टिकवून ठेवण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्‍क्‍यापेक्षा जास्त हवे असते; मात्र चुकीच्या पद्धतीने पाणी, खत व्यवस्थापन केल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.3 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाले आहे, त्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकता खालावली आहे. परिणामतः जास्त रासायनिक खते घालूनही उत्पादनवाढ दिसून येत नाही. जैविक सुपीकता खालावत जाण्याचे कारण म्हणजे जमिनीत सेंद्रिय खतांचा कमी व रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आणि चुकीच्या मशागत पद्धती हे होय. जैविक सुपीकता सुधारल्यास जमिनीत शिल्लक राहिलेली मुळे (पिकाची, तणांची), काडीकचरा, पालापाचोळा जिवाणूंच्या मदतीने कुजविला जातो. गांडुळांची संख्या वाढून जमिनीत ह्युमसचे प्रमाण वाढते, परिणामी सेंद्रिय कर्ब वाढतो. या बाबींमुळे जमिनीतील रासायनिक खतांची मात्रा कमी करण्यास मोठी मदत होते. जमिनीचे पृथक्करण करून रासायनिक सुपीकतेचा अंदाज घेता येतो. पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा पुरवठा करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. सेंद्रिय व जैविक खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचा अति वापर व सिंचनाची अयोग्य पद्धत यामुळे जमिनीच्या अन्नघटक पुरवठा करण्याच्या क्षमतेसोबत जमिनीच्या सामूवरही परिणाम होतो. साडेसहा ते साडेसात दरम्यान सामू असल्यास पीकवाढीस आवश्‍यक अशा अन्नघटकांचे मुळांद्वारे सहज शोषण होऊ शकते.

जमिनींच्या तिन्ही प्रकारांचा विचार करता त्यांचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन केल्यास मुळांची कार्यक्षमता वाढते, शिवाय जास्त पाण्याचा निचरा होतो. जमिनी आवश्‍यक पाणी साठवून पिकाच्या गरजेनुसार मुळावाटे पुरवठा करतात. म्हणून केवळ रासायनिक, सेंद्रिय वा जैविक खतपुरवठा करून चालणार नाही; तर तीनही पद्धतींचा एकात्मिक समन्वय गरजेचा आहे. या तंत्राचा अवलंब केल्यास कोरडवाहू शेतीसह सर्व शेतीच्या उत्पादनखर्चात बचत होऊन उत्पादन तिपटीने वाढेल असा विश्‍वास वाटतो.
- डॉ. ज्ञानदेव हापसे, ज्येष्ठ ऊस पीक शास्त्रज्ञ


सेंद्रिय शेतीसाठी अजून संशोधन हवे
सेंद्रिय शेती करायची म्हणजे प्रामुख्याने रासायनिकऐवजी सेंद्रिय खते, सेंद्रिय कीडनाशके, सेंद्रिय संजीवके या तीन बाबी विचारात घ्याव्या लागतात. मी माझ्या कसबे सुकेणे (जि. नाशिक) येथील द्राक्षबागेत 1998 ते 2004 या कालावधीत सलग सहा वर्षे कोणतेही रासायनिक घटक न वापरता जाणीवपूर्वक सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले आहेत. त्यातून सलग सहाही वर्षे एकरी 12 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. यात सर्वप्रथम खतांच्या बाबतीत सांगायचे, तर सलग सहा वर्षे एका चार एकरांच्या बागेत वाढणारे गवत व खास पेरणी करून मिश्रधान्य वाढवून ते पुन्हा कापून वरंब्यावर आच्छादन म्हणून टाकले. शेणखतही दिले. एप्रिल व ऑक्‍टोबर छाटणीनंतर वेलीची खाली पडणारी पाने आणि काड्या यातील अन्नघटकांची तपासणी केली. एकरी बारा टन उत्पादन येण्याच्या उद्दिष्टासाठी खतांतील जे घटक आवश्‍यक असतात, त्यापैकी 50 टक्के घटक या खाली पडणाऱ्या पाने व काड्यांतून मिळतात. हे अवशेष जमिनीला परत देता येतात. रासायनिक कीडनाशक एकदा फवारले, की त्याची आठ, दहा, 15 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी लागते. त्या तुलनेत सेंद्रिय कीडनाशकांची अधिक वेळा फवारणी करावी लागते. उदाहरणार्थ गोमूत्राचा थ्रीप्स, उडद्या, अळी यांच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो. त्याची एक दिवसाआड फवारणी करावी लागते. कडुनिंबावर आधारित कीडनाशकांचेही चांगले परिणाम मिळतात, त्यांची फवारणीही एक ते दोन दिवसाआड केली तर किडींवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळते. सलग सहा वर्षे सेंद्रिय शेतीच्या काळात ऑक्‍टोबर छाटणीमध्ये महिन्यातून एक ते दोन आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी घेत गेलो, कारण या काळात सेंद्रिय बुरशीनाशकांपैकी सक्षम पर्याय उपलब्ध नव्हता. संजीवक म्हणून फक्त जिब्रेलिक ऍसिडचा वापर केला.

माझ्या सलग सहा वर्षांच्या या अनुभवानंतर काही निष्कर्षांप्रत आलो आहे. माझ्या मते सेंद्रिय शेती पद्धतीत संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या तुलनेने 30 टक्के कमी उत्पादन मिळते. द्राक्षमण्यांचा आकार 13 ते 14 मिलिमीटर मिळतो. फवारणीच्या संख्येत तसेच मजुरीच्या खर्चात तुलनेने वाढ होते. या सहा वर्षांच्या काळात मला सेंद्रिय उत्पादनासाठी खास अशी मार्केटिंगची साखळी जोडता आली नाही. रासायनिक शेतीच्या तुलनेत या मालाचा आकार छोटा म्हणून मागणीही व दरही कमी मिळाले. सन 1998 ते 2004 या काळात सेंद्रिय मालाच्या निर्यातीलाही वाव नव्हता, त्यामुळे 2004 नंतर केवळ सेंद्रियऐवजी सेंद्रिय व रासायनिक अशा एकात्मिक पद्धतीकडे वळलो. खरे म्हणजे रासायनिक पद्धतीपेक्षाही सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या द्राक्षांना उत्तम चव व गंध होता. मण्यात साखर व रंगही अधिक चांगला होता. रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या द्राक्षांच्या तुलनेत सेंद्रिय मालाला दुप्पट, तिप्पट बाजारभाव मिळाले आणि डाऊनी रोगाला प्रतिबंधक जाती द्राक्ष उत्पादकांना उपलब्ध झाल्या, तर सेंद्रिय पद्धतीला चालना मिळेल. कीटकनाशके व बुरशीनाशके यांमध्ये अजून संशोधन होऊन सेंद्रिय पद्धतीची कीडनाशके उपलब्ध झाली तर पुढील काळात मी निश्‍चित पूर्णपणे सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादन घेण्याकडे वळेन.
वासुदेव काठे, प्रयोगशील शेतकरी, कसबे सुकेणे, जि. नाशिक

एकात्मिक पद्धतच फायदेशीर ठरेल
सध्या सेंद्रिय शेती हा महत्त्वाचा चर्चिला जाणारा विषय आहे. सेंद्रिय शेतीचे समर्थक सेंद्रिय शेतीच योग्य आहे असे सांगताना रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते यांचा वापर अयोग्य असल्याचे म्हणतात. सेंद्रिय शेतीचा अवलंब पुरातन काळापासून ते आजपर्यंत आपल्या देशात कमी - अधिक प्रमाणात केला जातो. सद्य परिस्थितीचा विचार करता सर्वत्र रासायनिक खते व कीडनाशके यांच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा आहे. रासायनिक कीडनाशके व खतेच केवळ मनुष्य व पर्यावरणास हानिकारक आहेत असे म्हटले जाते. रसायने विषारी असली तरी त्यांचा योग्य व समंजस वापर करावयाच्या सूचना अनेकजण लक्षात घेत नाहीत. भारतात कीडनाशकांचा वापर अन्य देशांच्या तुलनेने खूप कमी व काही ठराविक पिकांवरच केला जातो. शेती क्षेत्राशी संबंधित नसलेल्या व्यक्तीच बहुतांशी सेंद्रिय शेतीबद्दल बोलताना दिसतात.

पिकावरील कीड व्यवस्थापनासाठी शासन व शास्त्रज्ञ नेहमी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करण्यास सांगतात. यामध्ये मशागतीय, यांत्रिक, जैविक आदी पद्धती वापरून जर कीड आटोक्‍यात येत नसेल, तरच रासायनिक कीडनाशकांचा वापर करावयाचा असतो. त्याचबरोबर जी कीडनाशके पर्यावरणास कमी हानिकारक आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीमुळे काही प्रमाणात रासायनिक कीडनाशकांचा अयोग्य वापर करण्यात येतो. अशा प्रकारच्या काही घटनांचा उल्लेख करून सर्वच रासायनिक कीडनाशके वाईट आहेत असा प्रचार केला जातो.

सेंद्रिय शेतीतही कीड व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्या लागतात. सद्य परिस्थितीचा विचार केल्यास सेंद्रिय शेतीमध्ये कीड व्यवस्थापनाच्या सर्व पद्धती प्रतिबंधात्मक आहेत. यामध्ये वनस्पतिजन्य अर्काचा वापर केला जातो. अशा पद्धतींना काही किडी उदा. घाटेअळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, पिठ्या ढेकूण आदी दाद देत नाहीत. अशा वेळी रासायनिक कीटकनाशकांचा आधार किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास घ्यावा लागतो. सेंद्रिय शेतीत ज्या उपाययोजना कीड नियंत्रणासाठी सांगण्यात येतात, त्या प्रत्यक्षात उपलब्ध होण्यात अडचणी येतात. तसेच, त्यांची योग्य प्रकारे चाचणी होणेही गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीत कीड व्यवस्थापनाच्या अंगाने संशोधनही खूप मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. जनुकीय तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या पिकांचा सेंद्रिय शेतीमध्ये समावेश करावा, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

सर्व बाजूंनी विचार करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा वापर फायदेशीर ठरेल. गरज पडल्यासच रासायनिक पद्धतीकडे जावे. यामुळे मानव व पर्यावरणास कमीत कमी हानी पोचेल आणि कृषी उत्पादनात वाढ होईल.

पृथ्वीतलावरील कोणतीही बाब ही पूर्णतः चांगली किंवा वाईट नाही. कोणत्याही बाबीचा संतुलित वापर केल्यास मानवास तो निश्‍चितच फायदेशीर आहे. सद्य परिस्थितीचा विचार केल्यास सेंद्रिय शेती हेच योग्य आणि रासायनिक शेती अयोग्य असे म्हणता येत नाही. शेती किफायतशीर व शाश्‍वत करण्यासाठी सेंद्रिय शेती, रासायनिक पद्धती आणि आधुनिक जैव तंत्रज्ञान यांची एकमेकांत सांगड घालून त्यांचा एकात्मिक वापर करणे हिताचे ठरणार आहे.

डॉ. बी. बी. भोसले,
प्राचार्य - कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर



 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: