विलासराव देशमुख अनंतात विलीन
- (प्रतिनिधी)
Friday, August 17, 2012 AT 02:15 AM (IST)
लातूर - केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. विलासराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या 17 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
बुधवारी दुपारी त्यांच्या अंत्ययात्रेला बाभळगाव येथील त्यांच्या निवासस्थानापासून सुरवात झाली. तेथून जवळच असलेल्या त्यांच्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विलासराव देशमुख यांचा मोठा मुलगा आमदार अमित देशमुख यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
विलासराव देशमुख यांचे मंगळवारी (ता. 14) चेन्नईतील ग्लोबल रुग्णालयात निधन झाले होते. बुधवारी सकाळी त्यांना लातूरहून बाभळगावमध्ये आणण्यात आले होते. बाभळगावमधील दयानंद हायस्कूलच्या मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. लाखो नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, केंद्रीय मंत्री वायलर रवी, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार राजीव शुक्ला, खासदार गोपीनाथ मुंडे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष (आठवले गट) रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय निरुपम, मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. बाभळगावमध्ये सुमारे पाच लाख नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. बॉलिवूडमधीलही अनेक मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली होती. त्यामध्ये दिग्दर्शक साजिद खान, करण जोहर, अभिनेता विवेक ओबेरॉय अशा अनेकांचा समावेश होता.
लातूर जिल्हा हळहळला
लातूर आणि विलासराव देशमुख हे समीकरण सर्वश्रुत होते. 1980च्या दशकात जिल्ह्याच्या स्थापनेपासूनच विलासरावांनी लातूरकरांचे नेतृत्व केले. मंत्रिपद, अधिकाराचा कोणताही बडेजाव न ठेवता ते लातूरकरांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होत. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेकांच्या घरात चुलीच पेटल्या नाहीत. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच लातूर विमानतळापासून बाभळगावपर्यंत दुतर्फा लोक हजर होते. लातूरहून त्यांचे पार्थिव बाभळगावकडे नेत असताना अनेक लोक रस्त्यावरून पार्थिवासोबत चालत बाभळगावला गेले. अंत्यसंस्कारावेळी पावसाने हजेरी लावली होती. लातूर शहरातील बाजारपेठ, दुकाने आणि एकूणच व्यवहार बंद होते.
मोबाईल नेटवर्क जाम
बाभळगावात पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी झाल्यामुळे तेथील मोबाईल नेटवर्क जाम झाले. यामुळे एकमेकांना मोबाईलवर संपर्क करताना अनेकांची कसरत सुरू होती. या स्थितीत विलासरावांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांचा ओघ सुरूच होता. गर्दीचा ओघ वाढल्यामुळे काही ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.